गेल्या महिन्याभरातील प्रचाराची दिशा पाहता  महाराष्ट्राचे पुरोगामित्व किती बेगडी आहे याचे प्रचीती येते. ‘ काय चाललंय काय?’ या सदरात प्रशांत कुलकर्णी यांनी ‘बालनेता ’ या व्यंगचित्रद्वारे केलेले  भाष्य लोकसत्ता (८ ऑक्टोबर ) राजकारणाची दशा अधोरेखित  करणारे आहे. वर्तुळाकार प्रवासाप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत तीच आश्वासने, जातीपातीच्या  त्याच  अस्त्रांचा वापर, आरोप-प्रत्यारोप करताना घसरलेली पातळी, वस्त्रे बदलावीत इतक्या सहजतेने पक्ष बदलणारे नेते आणि त्यांच्या साठी अंथरल्या जाणारया पायघडय़ा पाहता राजकारणाची गंगा  किती मली झाली आहे हे कळते .
 हे कधीतरी बदलणार का ?  निवडणुकीतील प्रतिज्ञा पत्र ही जर केवळ धूळफेक ठरत असते तर हा खेळ बंद करणे सयुक्तिक ठरणार नाही का ? ‘बोटावरची शाई निघेपर्यंत लोकशाही – तदनंतर मात्र सरंजामशाही’ हीच लोकशाही अभिप्रेत आहे का ? वाईट याचे वाटते की , ज्या महाराष्ट्राला उज्वल परंपरा आहे असे वारंवार सांगितले जाते त्या महाराष्ट्रातील विचारवंत, साहित्यिक , महाराष्ट्रभूषण वा पद्मश्री बिरुदप्राप्त मंडळी गप्प का ? ही सर्व मंडळी राजकारण्यांची बटीक झाली आहेत का ? कृतीशून्य विचारवंत-तत्त्ववेत्ते महाराष्ट्राला काय दिशा देणार ?

प्रादेशिक पक्ष वा नेत्यांना यापुढे अभय नाही
‘नैतिकतेची निवडखोरी’ या अग्रलेखातील (६ऑक्टो.) ‘काँग्रेस काय किंवा भाजप काय. यातील कोणीही सत्ताधारी झाला की तळे राखेल तो पाणी चाखेल या न्यायाने सरकारी माध्यमांना जमेल तितका वाकवतो’ ही सर्वच सत्ताधाऱ्यांवरील टीका रास्त ठरणारी आहे.
‘मोहन भागवत यांचे विजयादशमीचे भाषण दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केले .. काहींना एकाच वेळी मस्तकशूळ आणि पोटशुळाने ग्रासले .. काँग्रेस आणि डाव्यांनी दूरदर्शनवर, माहिती आणि प्रसारण खात्यावर, नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली’ याबाबत या पक्षांनी एक बाब लक्षात घ्यावी की, मोदींना रोखा अशा कोणत्याही कार्यक्रमास डाव्या पक्षांनी किंवा यूपीए सरकारने प्राधान्य दिलेच नाही; त्या गाफीलतेचा परिणाम भोगणे आता त्यांना क्रमप्राप्त आहे.
त्याच पानावर, ‘प्रादेशिक पक्षांची अगतिकता’ हा श्री टेकचंद सोनवणे यांच्या लेखात (लाल किल्ला) ‘जेव्हापासून भाजप केंद्रात सत्तेत आला तेव्हापासून प्रादेशिक पक्षांची शक्ती क्षीण झाली आहे’ तसेच ‘प्रादेशिक अस्मिता जपण्याच्या नावाखाली राष्ट्रीय हिताकडे या सर्वच पक्षांनी दुर्लक्ष केले. येईल त्या लाटेवर झुलणाऱ्या या प्रादेशिक पक्षांमुळे राजकारण सतत अस्थिर होते’ अशी विधाने आहेत. हे खरे आहे. बऱ्याच अंशी हे पक्षच त्यांच्या आताच्या अगतिकतेला जबाबदार आहेत. प्रादेशिक पक्षांना त्यांच्या मर्यादांचे भान राहिले नाही आणि चार खासदारांच्या ‘बळावर’ पंतप्रधान म्हणून मिरविण्याची, अगदी बेडकाप्रमाणे अवास्तव फुगण्याची आणि ऊस मुळासकट खाण्याची हाव धरून त्यांनी वाजपेयी, मनमोहन सिंग सरकारांना भंडावून सोडले.
नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वेगळे वागतात, त्यामुळे ‘राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जोपर्यंत मोदींशी जुळवून घेतील तोपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना अभय आहे. थोडय़ाफार फरकाने सर्वच प्रादेशिक पक्षांची हीच स्थिती आहे’ हे पूर्वीइतके सोपे नसेल. प्रादेशिक पक्षांना अभय मिळालेच तर त्याची अधिकच किंमत चुकवावी लागेल आणि त्यातही ‘जुळवून घेण्याचा’ कितीही अटोकाट प्रयत्न केला तरी अभय मिळेलच याची कोणतीच खात्री नसेल, ते अभयछत्र कोणत्याही क्षणी नाहीसे होईल ही सतत भीती मात्र असेल.
– राजीव जोशी, नेरळ.

कन्नडिगांच्या जुलमाबद्दल नेमाडेंचे खडे बोल हवे होते
बसवराज कट्टिमनी प्रतिष्ठान आणि कर्नाटक सरकार यांच्यातर्फे यंदापासून देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भाषावाद, सीमावाद निर्माण होत असतील तर ते चुकीचे आहे, असे नेमाडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.. नेमाडे एक प्रथितयश साहित्यिक आहेत आणि त्यांची प्रदीर्घ साहित्यसेवा यांचा पूर्ण मान राखून असे म्हणावेसे वाटते, की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याऐवजी नाकारून मराठी बाणा दाखवून द्यावयास हवा होता. याचे कारण ज्या कंबार यांच्या हस्ते त्यांना तो देण्यात आला त्यांनी २०११ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बेळगावातील मराठी बांधव आणि महाराष्ट्राबद्दल आपल्या मनात असलेला तीव्र मराठीद्वेष व्यक्त केला होता. कंबार यांना याचा सोयीस्कर विसर पडला असेल, पण मराठी जनता ते कदापिही विसरणे शक्य नाही. वादग्रस्त सीमा भागातील मराठी जनता आपण कधीतरी महाराष्ट्रात येऊ, या एकमेव आशेवर गेल्या साठ वर्षांच्या दीर्घकाळात कर्नाटकात अत्याचार, दडपशाही, मुस्कटदाबी निमूटपणे सहन करीत आली आहे, हे कोणाला ठाऊक नसेल असे वाटत नाही. नेमाडे यांनी पुरस्काराचे आयोजक व जुलमी कर्नाटक सरकार यांना चार खडे बोल सुनावले असते तर ते निश्चित शोभून दिसले असते.  
– अनिल रा. तोरणे,  तळेगाव दाभाडे

चिकित्सक सीमोल्लंघनासाठी विजयादशमीचे निमित्त का?
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यापेक्षा सरसंघचालक विजयादशमीच्या दिवशी काय बोलले यावर तथाकथित बुद्धिवंतांनी लक्ष केंद्रित करावं अशा आशयाचं एक पत्र (लोकमानस : ७ ऑक्टो.) प्रसिद्ध झालं आहे. नुसतेच भाषण नव्हे तर विजयादशमीच्या प्रकाराचा मुळापासून तपास केला पाहिजे. आणि तो नुसत्या ‘तथाकथित बुद्धिवंतांनी’ नव्हे,  तर सर्वानीच केला पाहिजे.
एका राजाने दुसऱ्या राजाचा पराभव केला यात साजरा करण्यासारखं काय आहे? आणि रावणाचे पुतळे जाळावे आणि रामाचा उदोउदो करावा इतका आपला इतिहास सरळसोट (जुन्या फिल्मी स्टाइलचा : काळ्या आणि पांढऱ्या अशा  दोनच रंगांत दिसणारा) आहे काय? आपण रामाला मर्यादापुरुषोत्तम मानतो; पण तू मला आवडतोस असं शूर्पणखेने म्हटल्यावर तिचे नाक कान कापून तिला पाठवून देणं हा रामायणकाळातला एकतर्फी प्रेमातला िहसाचारच नव्हे काय? आणि त्यात कोणता पुरुषार्थ आहे, असा प्रश्न आपल्याला पडत नाही. आणि आपल्या बहिणीचे असे हाल केल्यावर कोणता भाऊ चिडणार नाही? गर्भार सीतेला रामाने वनवासात धाडलं आणि तेही कोणीतरी केलेल्या क्षुद्र कुजबुजीवरून ! या प्रकारावर तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जो राजा आपल्या बायकोला न्याय देऊ शकला नाही तो जनतेला कसला न्याय देणार असा खरा प्रश्न आहे. आणि कुजबुजीवरून शिक्षाही रामराज्यातली न्यायाची कल्पना असेल तर रामराज्य न आलेलं काय वाईट असं जर असंख्य स्त्रियांना वाटलं तर त्यात गर काय? वेदविद्या शिकू पाहणाऱ्या शम्बुकाचा रामाने केलेला वध या विषयावर तर या देशातल्या दलितांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केले आहेत.
दुसरं म्हणजे विजयादशमीनिमित्त शस्त्रांची ‘पूजा करण्याचा’ प्रकार काय आहे? युद्धाचा गौरव आणि शस्त्रांची पूजा हा प्रकार फक्त शस्त्रास्त्रांचे कारखानदार, युद्धखोर सेनाधिकारी आणि विविध ‘सेनां’मधले राजकारणी यांना आवडेल; पण शस्त्रास्त्रांचा संबंध सर्वसामान्यांच्या जगण्यापेक्षा मरण्याशी असतो. त्यामुळे त्यात भव्यदिव्य काही आहे असं मानण्यापेक्षा एक अपरिहार्य बाब म्हणून ते विसरून जाणंच अधिक योग्य ठरेल. गौरव करायचा तर शांततेच्या प्रयत्नांचा करायला हवा. कलिंगच्या युद्धानंतर पश्चात्ताप पावलेल्या प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या चिन्हांना आपल्या स्वातंत्र्यलढय़ातल्या नेत्यांनी महत्त्वाचे स्थान दिले होते. मात्र हा सगळा ‘शांततेचा बुळेपणा’ करण्याऐवजी आपण शस्त्रधारी विजिगीषु वृत्तीचे पूजन केले पाहिजे, असे संघ परिवाराच्या विचारसरणीत पूर्वीपासून आहे. विजयादशमी साजरी करण्यामागे शस्त्रधारी विजिगीषु वृत्ती जनतेत रुजवण्याचा विचार आहे. त्यामुळे या वृत्तीचा विजय होऊ लागला तर आपल्या तिरंग्यातील रंगांपैकी दोन रंग नष्ट होऊन फक्त भगवा रंग दिसू लागेल आणि त्यावर त्रिशुळाचं चिन्ह येईल हे अशक्य नाही.
इतिहासाचा आणि पुराणांचा शोध घेण्याऐवजी शाहिरीत रमणाऱ्या आपण सर्वानीच या प्रकारातले बारकावे नीट तपासून पाहायला हवेत. आपल्यासमोर अनेक पद्धतीने नवनवं संशोधन रोज येत असतं; त्यावरून मअनेक विद्वान आपली मतं मांडत असतात. खुद्द रामायणावर अनेक प्रकारे संशोधन होत असतं. रामायणातली लंका नेमकी कुठे होती याबद्दल काही पुरावे वा आधार सुकन्या आगाशे यांनी अलीकडे दिले आहेत. त्याने रामायणाच्या भूगोलाबद्दलची प्रस्थापित समीकरणं बदलून जाऊ शकतात (द सर्च फॉर रावणाज लंका : पॉप्युलर प्रकाशन) त्यावर  वादविवाद आणि चर्चा होणं आवश्यक आहे.
खरं तर संघ विचारांची छाननी करणं हा एक मोठा विषय आहे. विद्वज्जनांनी यासंबंधीची आपली मतं जनतेसमोर आणली पाहिजेत. ते खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन होईल.
– अशोक राजवाडे, मालाड