चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुशिक्षित तरुण-तरुणी ढोलपथकांमध्ये का जातात? आपल्या सरावाचा लोकांना त्रास होतो हे त्यांना कळत नाही? ढोलपथकं हे ‘सामाजिक कार्य’ म्हणावं काय?.. या प्रश्नांची ही काही उत्तरं.. 

गणेशोत्सवाची परंपरा पुण्यात सुरू झाली. तसाच तरुणाईला एकत्र आणणाऱ्या ढोलताशा पथकांचा पायंडाही पुण्यातच पडला. आज अनेक शहरांत, परदेशातही पथकं कार्यरत आहेत. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण झालेली ही पथकं गेल्या काही वर्षांत चर्चेचा विषय झाली आहेत. त्याचं कारण म्हणजे शहराच्या कानाकोपऱ्यात पथकांची वाढलेली संख्या, सरावाच्या दणदणाटाने होणारा त्रास, पोलिसांकडे होणाऱ्या तक्रारी, पोलिसांकडून घालण्यात आलेले निर्बंध.. त्यामुळेच उत्साही नाद निर्माण करणारी पथकं आत्मपरीक्षण करू लागली आहेत.

ढोलताशा पथकांना संघटित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ढोलताशा महासंघाची स्थापना झाली. महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर हे अनुभवी वादक. ढोलताशा पथकांच्या वाटचालीचे साक्षीदारही. ते म्हणतात, ‘ढोलताशा हे लोकवाद्य आहे. लोकपरंपरा ही सोपी असते. त्यासाठी विशेष असं शिक्षण घ्यावंच लागतं असं नाही. थोडा वेळ वादन ऐकलं, की आपणही त्यावर ताल धरू लागतो. त्याचं आकर्षण निर्माण होतं.’ सकारात्मक दृष्टीने ढोलताशा वादन ही एक प्रकारे नशा आहे. म्हणून तरुणाईचा पथकांकडे ओढा आहे, असं ठाकूर सांगतात. ‘पथकांवर होणारी टीका अनाठायी आहे. तरुणाई एकत्र येते, त्यांची ऊर्जा कामी येते हे विचारात घ्यायला हवं. किमान त्याची हेटाळणी तरी करू नये. बाकी ध्वनिप्रदूषणाबद्दल बोलताना बाकीचे प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभर आपण काय करतो याचाही प्रत्येकाने विचार करायला हवा. मुळात ही सगळी मुलं वादन आनंदापोटी करतात, कुणीही पैसे घेत नाहीत. शिक्षणासाठी मुले दत्तक घेणे, पूरग्रस्तांना मदत, शालेय साहित्य पुरवणे, नदी स्वच्छता अशी सामाजिक कामं करतात. त्यांची सामाजिक जाणीव टिकून आहे हे आपण बघणार, की फक्त त्यांना झोडपत राहणार?’ असा प्रश्नही ठाकूर उपस्थित करतात. ‘कितीही टीका झाली, तरी हजारो लोक मिरवणुकीच्या दिवशी वादन ऐकण्यासाठी येतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे समाजाने पथकांना झुगारलेलं नाही, कारण त्यांना नाद आवडतो. कलाकार म्हणून हे तरुण एकत्र आलेले असतात. त्यांच्यात व्यावसायिक वृत्ती नसते. एका अर्थाने ही चांगलीच गोष्ट आहे. ढोलपथकांचे व्यवस्थापन हा खरं तर अभ्यासाचा विषय आहे. पथकांच्या उलाढाली मोठय़ा असतात, असं लोकांना वाटतं. पण तसं नसतं. कित्येक पथकांना ‘धन्यवाद’मध्ये वादन करावं लागतं. या पथकांमधून नेतृत्व निर्माण झालेलं नाही, कारण तसा कोणाचा उद्देशही नसतो. ही वादनाची चळवळ आहे. या पथकांमुळे मिरवणुकीला शोभा येते, शिस्तबद्ध, लयदार वादन ऐकता येतं. अन्य उत्सवांमध्येही अलीकडे ढोलपथकं वादन करत असली, तरी त्याचं प्रमाण कमी आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याला विरोध होतोच. पथकांच्या बाबतीत तसंच काहीसं झालं. पथकं वाढली, तशी कमीही झाली. पण आता पथकांमध्ये आत्मचिंतन होत आहे. पूर्वी पथकात शंभर ढोल असायचे, ते आता चाळीस झाले आहेत. लोकांची चव बदलेल, निर्बंध येतील, तशी पथकंही बदलतील. जे चांगलं वादन करतील, तेच टिकतील,’ असंही ठाकूर सांगतात.

युवा वाद्य पथकाचा संस्थापक वैभव वाघनं पथक संस्कृतीचे साधक-बाधक मुद्दे मांडले. वादनाची आवड म्हणूनच तरुणाई पथकांकडे वळते. निव्वळ आकर्षणामुळे पथकात येणाऱ्यांचं प्रमाण आता बरंच कमी झालं आहे. पथकांवर टीका होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पथकांचा सराव.. तो बहुतेकदा निवासी परिसराच्या आसपासच होत असल्यानं रहिवाशांना आवाजाचा त्रास होतो. साहजिकच पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या जातात, वादन थांबवण्याचे प्रकारही होतात. सरावाचा त्रास होतो हे वादक म्हणून मान्यही आहे. अर्थात, लोकांना त्रास देणं हा काही पथकांचा उद्देश नाही. पण सरावासाठी जागा उपलब्ध नाही, त्यासाठी निश्चित धोरण नाही. त्याचाही विचार करायला हवा. या वर्षी वाद्यपूजनाच्या कार्यक्रमात संगीतकार अजय-अतुल यांनी जोरानं ढोल वाजवण्यापेक्षा ताल पढंत करा, असं सांगितलं. त्याचाही आता विचार सुरू झाला आहे,’ असं वैभव म्हणाला.

‘व्यावसायिक दृष्टीने ढोलताशा पथक चालवणं शक्यच नाही. कारण त्याच्या मागचं अर्थकारण.. ढोलताशांचा देखभाल खर्च, जेवणखाण, वाहतूक या सगळ्यावर होणारा खर्च मोठा आहे आणि त्या तुलनेत गणेश मंडळांकडून बिदागीही मिळत नाही. त्यालाही कारण आहे. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाचं अर्थकारण बिघडलं आहे. गणेश मंडळांना वर्गणी, जाहिराती मिळत नाहीत. त्यामुळे मंडळेही आर्थिक बाबतीत हात आखडता घेतात. पथकांचं सामाजिक कामही मोठं आहे. एक पथक सामाजिक काम करतं म्हणून बरीच पथकं सामाजिक कामांकडे वळली. त्याची आता चळवळ उभी राहिली आहे. खरं तर पथकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढे आलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. कोणत्याही क्षेत्रात होतं, तसंच नेतृत्वाच्या वादातूनच नवनवी पथकं निर्माण झाली. त्यातून प्रश्न निर्माण झाला. आता या प्रश्नांबाबत पथकांकडूनही गांभीर्यानं, सकारात्मक पद्धतीनं आत्मपरीक्षण होऊ  लागलं आहे. त्याचा परिणाम पथकांची संख्या घटण्यातही झाला आहे. येत्या काळात पथकांच्या भविष्याचा विचार के ला, तर मोठी सामाजिक चळवळ उभी राहू शकेल, त्यांच्यातून सामाजिक नेतृत्वही उदयाला येऊ  शकेल, असं वैभव सांगतो. पथकातल्या काही सदस्यांची ‘दिखाऊगिरी’ हा नक्कीच विचित्र प्रकार आहे. मिरवणुकीच्या दिवशी मोठाल्या माळा घालणं, गळ्यात पदकं घालणं, दाढी-मिश्या वाढवणं.. एक ना अनेक प्रकार. हे सगळं फेसबुक, इन्स्टाग्रामच्या सुरुवातीच्या काळात होत होतं. आता हा लोकांच्या चेष्टेचा विषय होऊ  लागल्यानं, लोक त्यावर थेट टीका करू लागल्यानं हे प्रकारही कमी होत आहेत,’ असं निरीक्षण वैभव नोंदवतो.

ज्ञानप्रबोधिनीच्या पथकातील सोहम केळकरनं आता पथकात जाणं कमी केलं आहे. आयुष्याचा वेगळा टप्पा सुरू झाल्यानं पथकापासून थोडं दूर गेल्याचं त्याचं म्हणणं आहे. पण तो अजूनही काही दिवस तरी पथकात जातो. ढोलताशा पथकाच्या निमित्तानं एवढे लोक एकत्र येतात, पण ज्या पद्धतीनं ही ऊर्जा ‘चॅनेलाइज’ व्हायला हवी, तशी होत नाही. गेल्या काही वर्षांत शहराचा पसारा वाढला, गणेशोत्सव मंडळं वाढली, तशीच ढोलताशा पथकंही वाढली. अर्थात पथकांची संख्या जशी वाढली, तशीच कमीही झाली. कारण पथक चालवणं तितकंसं सोपंही नाही. ‘बरीच पथकं त्यांच्या परीनं सामाजिक काम करतात. आताच काही दिवसांपूर्वी पूरग्रस्तांना पथकांकडून मदत करण्यात आली. काहींनी प्रत्यक्ष जाऊन मदत केली, काहींनी साहित्य संकलन केलं. पथकात येऊन काय साध्य होतं याचं हे उत्तर आहे. ढोलताशा पथकांच्या पलीकडेही पारंपरिक खेळांची संस्कृती आहे. त्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणून आम्ही आमच्या परीनं पथकांना बर्चीसारखे खेळ शिकवतो. पण हे प्रमाण वाढायला हवं आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांनीच पथकांना नियम करून दिले आहेत आणि त्याचं पालनही होत आहे,’ असं सोहमनं सांगितलं.

पूजा मल्लिगे ही तरुणी गेली दहा वर्ष शिवमुद्रा या पथकाशी जोडलेली आहे. पथकांमध्ये दिसणारा उत्साह, जोश पाहून तिलाही सहभागी व्हावंसं वाटलं. म्हणून अकरावीत गेल्यावर ती शिवमुद्रा पथकात सहभागी झाली. ‘सरावाचा रहिवाशांना त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून आम्ही थोडं दूर जाऊन सराव करतो. पोलिसांनी पथकांना घालून दिलेले नियम योग्यच आहेत, त्याला सहकार्य करायलाच हवं. पोलिसांकडूनही पथकांना सहकार्य मिळतंच,’ असं ती सांगते. ‘वजनदार ढोल वाजवण्याचा शारीरिक त्रास होतो.. पण त्याचं काही वाटत नाही. उत्साहाच्या भरात ते होऊन जातं. लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्रास होतोय हे अनेकदा लक्षातही येत नाही,’ असं पूजा सांगते. ‘ढोल वादनाचे काही फायदे होतात. आमच्या पथकातील एका बाईंना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यांचा हात आखडला होता. त्या पथकात सहभागी होऊन वादन करू लागल्यावर त्यांचा हात पूर्ववत झाला. डॉक्टरांनाही त्याचं आश्चर्य वाटलं. ढोलवादनामुळे शारीरिक क्षमतेत वाढ होते. त्याचा दैनंदिन कामात फायदाच होतो,’ असं पूजाला वाटतं.

कोणत्याही क्षेत्रात स्थित्यंतरं होतच असतात. तशीच ती ढोलताशा पथकांच्या बाबतीत होत आहेत. जे चांगलं आहे ते टिकतं, या न्यायाने ढोलताशा पथकांच्या बाबतीत काय होणार, ते येत्या काळात नक्कीच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व युवा स्पंदने बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Educated young male and female joining drummers group zws
First published on: 29-08-2019 at 03:55 IST