प्रदीप नणंदकर pradeepnanandkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ‘लातूर पॅटर्न’चा बोलबाला राज्यभर झाला, तो आजही दहावी-बारावी परीक्षार्थीच्या पालकांना भुलवतो आहे.. पण या भूलभुलैयात सारासार विचार करण्याची शक्ती हरवते आहे का?

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला की राज्यभरातील ‘जागरूक’ पालकांचा अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी लातूरकडे लोंढा सुरू होतो. अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये, शिकवणीवर्ग, अभ्यासिका, वसतिगृहे हे सगळेच ‘हमखास यशाची हमी’ देणाऱ्या चकचकीत पाटय़ा रंगवून मागील वर्षीच्या निकालाचे जाहिरात फलक झळवतात. विविध माध्यमांतून आकर्षक जाहिराती करून विद्यार्थी व पालकांना संभ्रमित करून टाकतात. यंदाही असेच झाले. पण बातमी निराळीच आली. या वर्षी अकरावीच्या प्रवेशाची यादी जाहीर होण्यापूर्वीच उस्मानाबाद जिल्हय़ातील कळंब तालुक्यातील देवळाली गावातील अक्षय शहाजी दवेकर या ९४.२० टक्के दहावीला गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांने लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळेल की नाही या भीतीने आत्महत्या केली अन् शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा सर्वत्र चर्चिला जाऊ लागला. दहावीला इतके चांगले गुण घेतल्यानंतरही त्या परिसरातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांला प्रवेश मिळेल की नाही ही चिंता वाटणे ही परिस्थितीच चिंताजनक आहे.

शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, सगळेच जण या घटनेमुळे हादरून गेले आहेत. पारंपरिक पद्धतीने शिक्षणाकडे पाहिले जाते. अपेक्षांचे ओझे नव्या पिढीच्या मानगुटीवर लादले जाते. त्याची क्षमता आहे की नाही याचा विचार करण्याची उसंतच पालकांना नाही अन् त्यातूनच शिक्षणाचा खेळखंडोबा होतो आहे.

आपल्या पाल्याच्या आयुष्यातील दहावीची परीक्षा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची जाणीव झालेला ‘जागरूक’ पालक पाण्यासारखा पसा खर्च करायला सिद्ध होतो आहे. ‘बेटा, शिकवणीवर्ग, अभ्यासिका, चांगले महाविद्यालय, स्वयंचलित दुचाकी, तुला जे हवे आहे ते दिले जाईल कारण आम्हाला त्या काळी या सुविधा मिळाल्या नाहीत. तुमच्या नशिबाने आर्थिक अडचण नाही पण शासकीय, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे गुण मिळविणे एवढेच तुला करायचे आहे. खासगी महाविद्यालयात भरावी लागणारी भरमसाट फी आम्ही देऊ शकत नाही व तू जर चांगले गुण घेतले नाहीस तर मात्र आयुष्यभर तुला पश्चात्तापात काढावे लागतील,’ असे उपदेशामृत घरोघरी मुलांना पाजले जाते. या अपेक्षांच्या ओझ्याने पाल्यांचे कंबरडेच मोडते.

शिक्षणाचा बाजार..

गेल्या ३५ वर्षांपासून लातूर, उदगीर, अहमदपूर या भागातील निवडक शाळा-महाविद्यालयांनी गुणवत्तेसाठी अथक परिश्रम घेतले. आपला भाग मागास, दुष्काळी आहे. या भागातील मुलांनी चांगले शिक्षण घेतले तरच त्यांचे आयुष्य घडेल या जिद्दीने तयारी केली जाऊ लागली. त्यातून दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत वर्षांनुवर्षे लातूरचा वरचष्मा राहिला. त्यानंतर परीक्षापद्धती बदलली. सीईटी, जेईई, नीट, एआयईईई, एम्स अशा विविध परीक्षेतही लातूरने आपला नावलौकिक टिकवला. या गुणवत्तेचे बाजारू मूल्य ज्यांनी मेहनत घेऊन चांगला निकाल दिला अशा शाळा-महाविद्यालयांनीही विनाअनुदानित तुकडय़ा काढून कोटय़वधींची माया जमवली. बहुमजली इमारती उभ्या केल्या. स्थानिक, खासगी शिकवणीचालकांबरोबर हैदराबाद, बंगलोर, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश येथील प्राध्यापकांनी लातूरचा बाजार फुलला.

वसतिगृहे, वातानुकूलित अभ्यासिका भरून वाहू लागल्या. खाणावळी, स्टेशनरी, पुस्तक विक्री अशी हजार कोटींचा टप्पा ओलांडणारी इंडस्ट्री म्हणून लातूरकडे पाहिले जाऊ लागले. ‘का भुललासी वरलिया रंगा’ हे या क्षेत्रातही सुरू झाले. शिकवणीचालकांच्या आपापसातील स्पर्धेमुळे सुरक्षिततेसाठी खासगी गुंडांची खंडणी सुरू झाली. गुंडांनीच पगारी शिक्षक ठेवून शिकवणीवर्ग सुरू केले. यातून शिकवणीचालकाचा खून दुसऱ्या शिकवणीचालकाने सुपारी देऊन केला. शिकवणीचालकाचे खंडणीसाठी अपहरण केले म्हणून दोन नगरसेवक अजून तुरुंगात आहेत. अपप्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत चालल्या आहेत. एकदा बाजार मांडल्यानंतर नीतिमत्ता व गुणवत्तेला पायपुसण्याचीही किंमत नसते हे मान्य करण्यावाचून पर्याय उरत नाही.

फक्त परीक्षेसाठी?

परीक्षेतील गुण म्हणजेच यश आहे का? व्यक्तिगत इतर गुणांना काहीच महत्त्व नाही का? ते विकसित व्हावेत, मुलांना जे करायचे आहे ते करू देण्याचे स्वातंत्र्य कधी दिले जाणार? शिक्षणाची झापडबंद वृत्ती विद्यार्थ्यांला जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देऊ शकेल का? या व अशा प्रश्नांवर विचार करायला कोणालाही वेळ नाही. एकदा बारावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊ द्या, नंतर अन्य बाबींचा विचार करू असाच विचार बळावतो आहे.

दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळाल्यानंतर कला शाखेत प्रवेश घेऊन बारावीला ८७.३३ टक्के गुण घेऊन अर्थशात्र व सांख्यिकी विषयात बीएची पदवी मिळवल्यानंतर सध्या लातूर येथे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रियंका बोकील म्हणतात, दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण घेतल्यानंतर ठरावीक महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही या भीतीपोटी आत्महत्या करणे ही समाज म्हणून चिंतेची बाब आहे. एवढे गुण मिळवणे सोपे नाही. ६० टक्के गुण घेणारे हजारो विद्यार्थी आहेत. त्यांनी जगायचे की नाही? डॉक्टर किंवा इंजिनीयर या क्षेत्रात मिळणारे आर्थिक स्थर्य अन्य कोणत्या क्षेत्रात नाही या समजामुळे झापडबंद विचार केला जातो आहे. या समस्येवर पटकन तोडगा नाही मात्र दीर्घकाळाच्या सामूहिक प्रयत्नांतून याचे उत्तर नक्कीच सापडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मानसिक तयारी होते का?

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के व बारावीच्या परीक्षेत अपघात झाल्यानंतरही ८२ टक्के गुण घेतलेली केतकी पाटील बीटेक (आयटी) झाली व सध्या ती पुण्यात एका स्वयंसेवी संस्थेसाठी सल्लागार म्हणून काम करते आहे. केतकी म्हणाली, दहावी व बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणजे आपण यशस्वी झालो हा समज अर्धवट आहे. तो एक जीवनाचा टप्पा आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी या दोनच शाखांतील शिक्षण म्हणजे सर्वस्व हा समजदेखील चुकीचा आहे. आयुष्याचा टप्पा मोठा आहे. त्यात यशस्वी होण्यासाठी आपली मानसिक तयारी शिक्षणातून होते आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व संस्थेचे विद्यमान सचिव अनिरुद्ध जाधव म्हणाले, विद्यार्थी व पालकांचा सरसकट डॉक्टर, इंजिनीयर बनण्याचा कल वाढतो आहे हे दुर्दैवी आहेत. जीवनात अनेक क्षेत्रे आहेत त्याचा पर्याय म्हणून विचार केला पाहिजे. मेहनत, जिद्द, चिकाटी, गुणवत्ता याच्या बळावर जाऊ तेथे पाय रोवून उभे राहू हा आत्मविश्वास विकसित झाला पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो. तो जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होईल याकडे प्रचलित पद्धतीत लक्ष देण्यास वेळ नाही. हा व्यवस्थेचा पराभव असल्याचेही ते म्हणाले. पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, शासन, शिक्षक या सर्वानीच यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या वर्षी दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही १०० पैकी १०० गुण घेणारे तब्बल १६ विद्यार्थी लातूरचे आहेत. महाराष्ट्रात एखाद्या शहरात इतके विद्यार्थी अन्यत्र नाहीत. निकालातील हे सातत्य लातूरचे आकर्षण आहे. नेमक्या या ‘भूलभुलैयात’ विद्यार्थी, पालक अडकत असून सारासार विचार करणे हरवत चालले आहे.

एके काळी लातूरच्या शिक्षकांनी हाडाची काडे करून शिक्षणात लातूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. आता शिक्षकच एकमेकांची हाडे मोडण्यात गुंतलेले आहेत. पसा हाच शिक्षणाच्या बाजारातील केंद्रिबदू असल्यामुळे विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रिबदू असल्याचे भले कोणाचे म्हणणे असो. बाजारात या म्हणण्याला किंमत नसते अन् त्यामुळेच हजारो पाडसे बळी जात असताना पारधी मात्र निर्ढावलेल्या वृत्तीने याकडे पाहत असल्यामुळे अंतिमत: हित कोणाचे साधले जात आहे हे स्पष्ट आहे.

यश म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यात फारसे कोणाला स्वारस्य नाही. बाजाराच्या जाहिरातबाजीतून जे यश म्हणून बिंबवले जाते त्याच मृगजळाच्या पाठीमागे निष्पाप पाडसे धावत आहेत.

 

मराठीतील सर्व युवा स्पंदने बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur pattern of study ssc hsc examinees science colleges in latur zws
First published on: 27-06-2019 at 04:38 IST