ग. बा. पोकळे ganeshpokale95@gmail.com
घरापासून दूर राहून राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारी बहुतेक मुले ही शेतकरी कुटुंबातली.. आपल्याला शिक्षणाचा वारसा नाही म्हणूनच आपण पुढे जाऊ शकत नाही का, असे वाटण्याचे, निराशेचे प्रसंग त्यांच्या प्रवासात येतात, कारण त्यांनी निवडलेला मार्गच गर्दीचा आहे..
अपेक्षांचे ओझे जास्त असले की, साधनांची कितीही पूर्तता झाली तरी यशापर्यंत पोहोचण्याचा काळ बऱ्याच अंशी अस्थिर झालेला असतो. ‘यश मिळावे’ ही अपेक्षा माफक आहे असे कधी म्हणताच येत नाही; कारण यशाची संकल्पना माफकतेच्या फार पुढे निघून गेलेली असते. यश ही सापेक्ष संकल्पना असल्यामुळेच, तिला अनेक फांद्या फुटलेल्या असतात. आणि या फांद्यांमुळेच बऱ्याचदा यशाच्या मार्गावरचा प्रवासी थकलेला, दमलेला, निराश झालेला, थांबलेला आणि कधी खचलेला-संपलेलाही पाहायला मिळतो. प्रामाणिक कष्टांनंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा बळावलेली असते. अशा प्रकारे निराशा बळावण्याचे काम बरीच क्षेत्रे करीतच आहेत त्यातील युवकांच्या अनुभवातले क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकायला आलो, त्याला आता पाच वर्षे पूर्ण होतायेत. या पाच वर्षांत चार-दोन सोडले तर सर्व मित्र हे स्पर्धा परीक्षा करणारेच भेटले. विद्यापीठात अभ्यासिका आहे ती विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. परंतु तिथे अभ्यास करणारे निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी विद्यापीठात न शिकता विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत शिकणारे आहेत, तर काही त्यातलेही नाहीत. परंतु इथे बसण्याचे कारण फक्त परिस्थिती. कारण बाहेर अभ्यासिकेत प्रतिमहिना ५०० तर कुठे ७०० रुपये द्यावे लागतात. खोलीचे भाडे दोघांना प्रत्येकी १५०० रुपये महिना आणि मेस १८०० ते २००० रुपये; म्हणजे जवळपास पाच हजार महिन्याला खर्च लागतो. त्यामुळे विद्यापीठात मित्रांसोबत वसतिगृहात राहायचे आणि या अभ्यासिकेत अभ्यास करायचा. म्हणजे या दोन्हींचा किमान तीन ते साडेतीन हजार खर्च वाचतो. हे फक्त औरंगाबादेतील विद्यापीठ परिसरातले झाले. अन्य शहरांतील मेस आणि खोलीभाडे वेगळेच!
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा माझा एक मित्र आहे. हा मूळचा बीड जिल्ह्यातला. त्याची घरची परिस्थिती म्हणाल तर चार एकर जमीन आहे, पण सर्व जमीन उमाठाची, जी फक्त कडधान्याचे पीक घेण्यासारखी आहे. पैसे मिळतील अशी कोणतीही पिके या तुकडय़ात घेता येत नाहीत. त्यातच या वर्षी तर घरही फिरले आणि वासेही फिरलेत. दोन रुपयांचे कुठे उत्पन्न मिळेल अशी आशा ठेवण्यासारखीसुद्धा परिस्थिती राहिली नाही.
या परिस्थितीतला मित्र मला सांगत होता, ‘‘नुकताच माझा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला. त्याची उत्तरतालिका आयोगाने जाहीर केली त्यात मला ४१ गुण मिळाले. आशा ठेवली होती ५० पडतील. पण नऊ गुण कमी पडले. बऱ्याच मित्रांना याच रेंजमध्ये गुण आहेत. परंतु मला दिलासा देण्यासाठी मित्र म्हणाले काही ताण घेऊ नको, येऊन जाईल रिझल्ट. परंतु मला खरी परिस्थिती माहीत आहे, आपला रिझल्ट एवढय़ा ४१ मार्कावर नक्कीच येणार नाही. काय करावं, खूप मेहनतीने गेली चार वर्ष अभ्यास करतोय, पण यश काही येईना. मी रिझल्ट पाहिल्यावर अक्षरश रूमवर जाऊन ढसाढसा रडलो. काय करणार, रडूच आवरलं नाही. आई दिवसभर शिवणकाम करते तर वडील विहिरी खोदण्याच्या कामाला जातात आणि मला महिन्याला सहा हजार कधी, तर कधी आठ हजार पाठवतात. काय सांगावं घरच्यांना हा प्रश्न होता.. मात्र आई ती आई आणि वडील ते वडील असतात. दिवसरात्र घाम गाळून कमावलेल्या पशांसोबत त्यांनी स्वाभिमानही कमावलेला असतो. त्यामुळे दोघेही म्हणाले काळजी करू नको, आम्ही आहोत. तू मोकळेपणाने राहा आणि त्याच जोमाने पुन्हा अभ्यासाला लाग. चार वर्ष गेलीत, आणि आणखी चार लागली तरी तू हबकून जाऊ नको. पूर्ण गळून गेलेला आणि हताश झालेला मी हे ऐकून पुन्हा उभा राहिलो आणि विचार करतोय नक्की यांच्या अपेक्षा पूर्ण करू यात.’’
..हे सांगताना माझ्या मित्राचा श्वास पूर्ण अस्थिर झालेला होता. नाही अस्थिर होणार तर काय? राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली ती ४९६ जागांसाठी; तर अर्ज करणारे विद्यार्थी होते ६,५०,०००! त्यात ही पूर्वपरीक्षाच होती. ही पहिली पायरी ओलांडली तरच मुख्य परीक्षेला पात्र आणि या दोन्हीत पात्र ठरले तरच मुलाखतीचे बोलावणे येणार आणि मग नोकरी लागणार. हे टप्पे पार करताना कित्येक ग्रामीण विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले. पण यशाने काही साथ दिली नाही.
पण करणार काय? फक्त ‘अभ्यास करायचाय आणि अधिकारी बनायचंय’ एवढय़ाच निकषावर विचार करून नाही चालत. या अधिकारी होण्यात बरेच टप्पे आहेत जे वारंवार निराशा वाटय़ाला आणतात. आपण कोणत्या परिस्थितीतून आलो, आपण कोणते शिक्षण घेतले, ते कुठे घेतले, कुठल्या शाखेत घेतले आणि आपली कौटुंबिक पाश्र्वभूमी काय या सगळ्या निकषांवर जणू आपले यश आधारित असते. सर्वच क्षेत्रांत अपवाद असतात याबद्दल दुमत नाही, परंतु हे समजून घ्यायलाच हवे की, या विद्यार्थ्यांची परिस्थिती त्यांच्या यश-अपयशाला बऱ्याच अंशी जबाबदार असते. सचिन तेंडुलकर जिज्ञासू, जिद्दी, मेहनती, सातत्य ठेवणारे होते त्यामुळे ते ‘भारतरत्न’पर्यंत पोहोचले; याबद्दल दुमत नाही. पण क्रिकेटसाठी प्रोत्साहित करणारा अजित तेंडुलकरांसारखा भाऊ पाठीशी होता, आचरेकरांसारखे गुरू भेटले, घरीदारी वातावरणही अनुकूल मिळाले म्हणून हे सगळे शक्य झाले हे कसे नाकारता येईल? अशी असंख्य उदाहरणे सापडतील जी प्रत्येक क्षेत्रात गर्दी करून उभी आहेत. राजकारण्यांच्या मुलाला राजकारणच आवडते, अधिकाऱ्याचा मुलगा अधिकारीच होताना दिसतो. डॉक्टर, गायक अशी असंख्य उदाहरणे देता येतील. अपवाद नक्की आहेत. परंतु कुण्याही पामराचा वारसा काय यावरून यशाच्या पायऱ्या मोजता येतात. कारण बऱ्याच क्षेत्रांत सामान्यांना यश मिळवण्यासाठी हयात जाईल अशी परिस्थिती असताना काही जणांना मात्र त्यामध्ये अगदी सहज प्रवेश मिळतो तो या वारशाने.
आज स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी घरापासून लांब राहणारे ९९.९९ टक्के विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. आता हे स्पर्धा परीक्षांकडेच का वळतात यावर प्रश्नचिन्ह आहे. अपवाद सोडले तर ते कुठलेच यांत्रिकी शिक्षण घेत नाहीत, वैज्ञानिक शाखेकडे वळत नाहीत. कला, चित्रपट, संगीत, क्रीडा या क्षेत्रांकडे तर त्यांनी साफ पाठ फिरवलेली आहे. जरा विचार केला तर लक्षात येईल की, या क्षेत्रांकडे पाठ फिरवण्याचे मुख्य कारण बहुधा आर्थिकच असावे. शिवाय कदाचित, आपली शैक्षणिक पाश्र्वभूमी बघून आपला या क्षेत्रात निभाव लागेल का ही भीतीही असू शकते. दिशाहीन असताना दिशा सापडण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते इतके कठोर असतात की, ‘हे सगळं सोडून दिलं पाहिजे,’ असे वाटण्याची वेळ किमान एकदा तरी येतेच. दशकभरापूर्वी तरी पदवी झाल्यावर या स्पर्धा परीक्षेसाठी मुले शहरात येत. आता बारावी झाली की लगेच शहर गाठतात. ‘स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचंय’ एवढेच मनात. आई अडाणी आणि वडीलही अडाणीच. त्यांचा हा मुलगा.
आशा कायम चांगल्या गोष्टींची असते. त्यामुळे सकाळी लवकर उठून पुस्तक वाचायची संधीच नसणारा, दारातल्या जनावरांचे शेणपाणी करून डेरीवर दूध ओतून शाळेत- कॉलेजात जाणारा विद्यार्थी जेव्हा ‘मला अधिकारी होण्यासाठी शहरात जायचंय’ म्हणतो, तेव्हा काबाडकष्ट करणारे आई-वडील व्याजाने काढून त्याला पैसे देतात. काय करणार ते तरी? पैसे देण्याशिवाय काहीच त्यांच्या हाती नसते. ‘आपण नाही शिकलो आता आपलं लेकरू तरी शिकावं’ हीच काय ती इच्छा! मुलगाही हुडबुद. कोणती पुस्तकं घ्यावीत, कुठले क्लास लावावेत, किती अभ्यास करावा, तो कसा करावा, यातलं काहीही माहीत नसताना वावरत असतो शहरातील अभ्यासिकेच्या भोवती. ‘अधिकारी व्हायचंय’ हे स्वप्न उराशी बाळगून तो शहरात आला असला तरी आजपर्यंतच्या त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीमुळे त्याला कायम अडचणीच येतात. पण ‘इतर सगळ्यांना सगळे मार्ग सोपे आहेत, मग आपलीच दैना का?’ ही खंत तर कळत्या वयापासूनची असते.. म्हणून मग स्पर्धा परीक्षांची तयारी! मात्र हा मार्ग इतका सरळ आणि सोपा नाही. तो गर्दीने प्रचंड जाम झाला आहे. श्वास घेण्यासाठीही मोकळीक राहिली नाही..
..श्वास अस्थिर होतोय.. अपयश सांगताना माझ्या मित्राचा झाला, तसा!