|| देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जग बदलाच्या, समाजसेवेच्या ध्यासानं समाजकार्याच्या क्षेत्रात आलेल्या आजच्या ध्येयवेडय़ा तरुणांची ही व्यथा-कथा..

रंजन पांढरे या तरुणाने शिक्षण घेतले स्थापत्य अभियांत्रिकीचे. ते घेत असतानाच समाजकार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच तो गडचिरोलीतील ‘सर्च’ या प्रसिद्ध संस्थेशी जोडला गेला. शिक्षणानंतर तिथे कार्यकर्ता म्हणून काम केले. ‘बायफ’ संस्थेत पाणलोट क्षेत्र विकासासाठी काम केले. मग ‘आयआयटी, मुंबई’सोबत एका प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. रंजन आता गोंडवाना विद्यापीठात वैज्ञानिक अधिकारी असून आदिवासी तरुणांना बांबू कौशल्यविकासाचे धडे देतो. ‘सेवेचे हे क्षेत्र निवडून खरे तर धोकाच पत्करला होता, पण सलग चांगल्या संधी मिळत गेल्या म्हणून बरे झाले; अन्यथा काही खरे नव्हते,’ हे त्याचे वाक्य समाजकार्याच्या क्षेत्रातील अनिश्चिततेची जाणीव करून देते.

प्रवीण मोते हाही व्यवसायाने अभियंता. मनात समाजसेवेची आस. त्यामुळे नोकरी न करता स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ग्रामविकासाच्या संकल्पना राबवण्याचा निर्धार केलेल्या प्रवीणच्या संस्थेला प्रारंभीची चार वर्षे एकही काम मिळाले नाही. याच काळात घरच्यांनी त्याचे लग्नही लावून टाकले. संस्थेने मूळ धरेपर्यंत प्रवीणला सासऱ्याने सांभाळले. आता त्याची संस्था नावारूपाला आली आहे. सुरुवातीच्या संघर्षकाळात, समाजसेवेच्या नादी लागून हात पोळून घेणारे अनेक मित्र प्रवीणने जवळून पाहिले आहेत.

आशीष खाडे या तरुणाला वन्यजीवांविषयी प्रेम. त्यातून त्याने व त्याच्या काही मित्रांनी संस्था स्थापन केली. अडकलेल्या वन्यजीवांची सुटका कर, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार कर अशी कामे मोठय़ा उत्साहात सुरू झाली. तीही घरातील पैसे लावून. चार-पाच वर्षांनंतरही या संस्थेला कुणी अनुदान द्यायला तयार होईना. आशीष व त्याच्या मित्रांनी अनेक उंबरठे झिजवले. शेवटी घरच्यांनी ही फुकटची समाजसेवा बंद कर म्हणून बजावले. संस्था मोडीत निघाली. त्यात असणाऱ्यांनी कुठे कुठे नोकऱ्या शोधल्या. आशीषच्या नशिबात तीही नव्हती. अखेर त्याने बुटीबोरीला (जि. नागपूर) चप्पलनिर्मितीचा कारखाना टाकला. तो सुदैवाने बरा चालतो. आता आशीषच्या डोक्यातून सेवेचे भूत पूर्णपणे उतरले आहे. मात्र, आजही समाजसेवेच्या क्षेत्राकडे स्वप्नाळू नजरेने पाहणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी ही तीन उदाहरणे बोलकी ठरावीत.

सत्तरच्या दशकातले संकल्प

१९७० च्या दशकात समाजपरिवर्तनाच्या संकल्पाने राज्यातील अनेक तरुण समाजसेवा क्षेत्रात सहभागी झाले. लोहिया व जयप्रकाश यांच्या विचारांचे गारूड या साऱ्यांवर होते. त्यातले अनेक ‘समाजवादी’ म्हणून राजकारणात गेले, तर काहींनी समाजकारणाचा वसा स्वीकारला. नंतरची शिक्षित पिढी त्यांचा आदर्श ठेवून समाजसेवेच्या क्षेत्रात येण्यास धडपडू लागली. याच काळात ‘संस्थात्मक समाजसेवा’- ‘एनजीओ’ या संकल्पनेने चांगलेच बाळसे धरले. तसा प्रयत्न अनेकांनी केला आणि आजही करताहेत; पण यात यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. यात ज्यांनी यश मिळवले, त्यांची नावे सर्वाना ठाऊक असतात; पण अपयशी ठरलेल्यांचे काय? ते तरुण नंतर काय करतात? त्यांच्या जीवनाची घडी नीट बसते की नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले, की अनेक कथा समोर येतात. आदर्शवत वाटणारे समाजसेवेचे क्षेत्र किती खडतर आहे, याची जाणीव होते. आजही उच्चशिक्षण घेणाऱ्या अनेक तरुणांना हे सेवेचे क्षेत्र खुणावत असते. त्यांच्या डोळ्यांसमोर गडचिरोली, नंदूरबार व मेळघाट ही तीन नावे तरळत असतात. तरुण व्यवस्था बदलण्याच्या ईर्षेने यात सहभागीही होतात; पण अनेकांच्या पदरी निराशाच येते.

प्रिया एक अभियंता तरुणी. शिक्षणानंतर तिने – घरच्यांचा विरोध असूनसुद्धा – एका स्वयंसेवी संस्थेत नोकरी पत्करली. तिथे दुर्गम भागात रोज १२-१४ तास काम, पिण्यासाठी अशुद्ध पाणी, गावात मिळेल ते जेवण. परिणामी ती आजारी पडली. पण निर्धार कायम होता. शेवटी आजार खूप बळावल्यावर घरच्यांनी तिला परत नेले. आता ती मुंबईत एका कंपनीत नोकरी करते. गगन व संदीप या तरुण अभियंत्यांच्या वाटय़ालाही एका संस्थेत काम करताना वाईट अनुभव आले. अखेर हे दोघे ‘स्वच्छतादूत’ म्हणून दुसरीकडे काम करू लागले आणि भ्रमनिरास झाल्यावर शहराकडे वळले.

सेवेच्या या क्षेत्रात वावरताना तुम्ही कुठे काम करता, याला खूप महत्त्व असते. तुम्ही जर वेश्या, तृतीयपंथीयांसाठी काम करत असाल, तर तुमच्या वाटय़ाला अनेकदा मानखंडना येते. ‘अच्छा, तुम्ही समाजसेवा करता का..?’ असा कुत्सित प्रश्न ऐकावा लागतो. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांची हे ऐकण्याची तयारी बरेचदा नसते. त्यामुळे अनेक जण परत फिरतात, असा रंजन पांढरेचा अनुभव आहे. आज कोणत्याही मागास जिल्ह्य़ात जा, तिथे ३० ते ४० स्वयंसेवी संस्था हमखास कार्यरत दिसतात. त्यातील किती संस्थांना शासन वा इतरांचे सेवा प्रकल्पांचे काम मिळते, हा कायम संशोधनाचा विषय असतो. चामोर्शीत (जि. गडचिरोली) एका तरुणाची संस्था काम मिळाले की सुरू असते; इतर वेळी हा तरुण शेती करतो. मूल येथील (जि. चंद्रपूर) रंजनाला संस्था काढूनही यश मिळू शकले नाही. ती व तिच्या यजमानांनी आता कंत्राटदारी सुरू केली आहे. ब्रह्मपुरीत (जि. चंद्रपूर) आशा वर्करला प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे प्रमुख रवींद्र जुनघरे यांनी काम मिळणे बंद झाल्यावर थेट राजकारणाचा रस्ता धरला आणि गावचे उपसरपंच झाले. विवेक गिरिधर हा असाच आशावादी तरुण. समाजसेवेचे स्वप्न भंगले. नोकरीचे वय निघून गेले. आता स्वयंसेवी संस्थांचे हिशेब लिहून गुजराण करतो. शिक्षण घेताना जग बदलण्याची भाषा करणारा निशांत माटे हा या क्षेत्रात अपयशी ठरल्यावर प्राध्यापक म्हणून स्थिरावला आहे. मात्र, अनेकांच्या वाटय़ाला हे स्थिरावलेपणही येत नाही.

संस्था स्थापन करत समाजपरिवर्तनाचे ध्येय ठेवणारे अनेक तरुण विदेश अथवा देशातून अर्थसाहाय्य होईल ही आशा बाळगून असतात. यात काही गैर नाही. मात्र, अलीकडच्या काळात- विशेषत: मोदी राजवट सुरू झाल्यावर अनेक संस्थांच्या नाडय़ा आवळल्याने आणि चौकशीचा ससेमिरा लागल्याने विदेशी अर्थसाहाय्याचा ओघ आटला आहे, असे निरीक्षण या क्षेत्रातील जाणकार मांडतात. परिणामी, अनेकांना संस्था बंद कराव्या लागल्या. आता केवळ पर्यावरण, वन्यजीव या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना थोडेफार अर्थसाहाय्य मिळते. इतर क्षेत्रांतील संस्थांना नाही. यवतमाळमध्ये बंजारा समाजात जनजागृती करणाऱ्या रूपेश राठोड या तरुणाची संस्था याच कारणाने बंद पडली. आता तो शेती करतो. त्याच्यातील ‘कार्यकर्ता’ तो विसरून गेला आहे.

‘समाजकार्या’चे शिक्षण       

सेवेच्या या क्षेत्रातील दुसरे उदाहरण ‘समाजकार्य’ या विषयात पदवी-पदव्युत्तर (बी.एस.डब्ल्यू./ एम.एस.डब्ल्यू.) शिक्षण घेऊन व्यावसायिकपणे कामे करणाऱ्या तरुणांशी संबंधित आहे. राज्यात अशा समाजकार्य महाविद्यालयांची संख्या ५२ आहे. त्यांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना नोकरीच्या संधी आहेत, पण त्यात अनिश्चितताही खूप आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये हे तरुण कुठे प्रवर्तक, कुठे समन्वयक, तर कुठे विकासदूत म्हणून काम करत असतात. ही नोकरी कंत्राटी पद्धतीची. ती करून आयुष्याला स्थैर्य लाभत नाही. यामुळे अनेक तरुण लग्नच करत नाहीत. मध्यंतरी ‘मागास क्षेत्र अनुदान निधी (बी.आर.जी.एफ.)’ ही योजना आदिवासी भागात राबवली गेली. ती अचानक बंद पडली आणि हजारो तरुण बेकार झाले. आता राज्य शासनाने ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ग्रामीण भागात अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात अनेक तरुण ‘व्यावसायिक समाज-कार्यकर्ते’ म्हणून काम करतात. या योजना किती काळ सुरू राहतील, हे सांगता येत नाही. समाजकार्याचे रीतसर शिक्षण घेतलेल्या तरुणांनी एखादी संस्था स्थापून व्यावसायिक पद्धतीने कार्य करणे अपेक्षित असते. मात्र, त्यात यशस्वी झालेल्या पदवीधरांची संख्या अत्यल्प आहे. वणी (जि. यवतमाळ) येथील आशीष काळे या पदवीधराने स्थापन केलेल्या संस्था उत्तम कामकरतात. मात्र, हे प्रत्येकाच्या वाटय़ाला येईलच असे नाही. संदीप सुखदेवे नावाच्या तरुणाने १०-१२ पदवीधरांना घेऊन संस्था स्थापन केली. पण कामेच मिळत नसल्याने त्यांनी कॅटिरगचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या संस्थेला सर्वेक्षणाची कामे मिळू लागली आहेत, पण त्यात सातत्य नाही.

तरुणांच्या समाजकार्य संस्थांना आधी विविध उद्योगांचा सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) निधी हा मोठा आधार असायचा. आता बहुतांश उद्योगसंस्थांनी त्यांच्या स्वयंसेवी संस्था स्थापल्या आहेत. त्यामुळे तो निधी मिळणे बंद झाले आहे. मध्यंतरी राज्य सरकारने राज्यातील सर्व मोठय़ा उद्योगांचा हा निधी थेट आपल्याकडे वळता करून ग्रामविकासाच्या योजना सुरू केल्या. त्यात पात्र तरुणांना कामे मिळाली; पण तरुणांच्या संस्थांना निधी मिळणे बंद झाले. मोठय़ा उत्साहात संस्था सुरू करणाऱ्या अनेकांमध्ये व्यवस्थापकीय कौशल्याचा अभाव असतो; त्यामुळे संस्था तगत नाही, असा अनुभव प्रवीण मोते सांगतो. गेल्या तीन दशकांत ‘ध्येयाने भारलेले समाजकार्य ते व्यावसायिक समाजसेवा’ असा प्रवास या क्षेत्राने अनुभवला. त्यात यश, कीर्ती मिळवणारे तरुण बोटांवर मोजण्याएवढे तर अपयशींची संख्या प्रचंड आहे.

devendra.gawande@expressindia.com

(या लेखात अपयश पदरी पडलेल्या तरुणांची नावे बदलण्यात आली आहेत.)

Web Title: Social services mpg
First published on: 04-07-2019 at 00:06 IST