‘‘वेगळं राहण्यामुळे थोडी ‘स्पेस’ मिळाली. माझ्या आणि सासूबाईंच्या मनाकडे मी बाहेरून पाहू शकले. माझ्या सुंदर घराच्या कल्पनेप्रमाणे घर मांडताना अनेक छोटय़ाछोटय़ा वस्तूंत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतील हे माझ्या लक्षातही आलं नसणार. त्यातूनच गाठी बसत गेल्या गैरसमजुतीच्या. पण आता सुटू लागल्या आहेत.’’

 

‘‘सासूबाईंशी कसं वागायचं मला कळतच नाही मावशी. काहीही केलं तरी मी वाईटच असते. कंटाळले आता,’’ तन्वी म्हणाली.
तन्वी माझ्या मैत्रिणीची, रजनीची सून, तेजसची पत्नी. तेजसच्याच कंपनीत ‘फायनान्स’ला असलेल्या तन्वीबद्दल लग्नाआधी, ‘‘एवढी शिकलेली सून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल,’’ असं रजनी म्हणाली होती. तेजस आणि त्याच्या बाबांमुळे रजनीला त्यांच्या लग्नात रुसवेफुगवे करणं जमलं नव्हतं. मात्र तन्वीच्या माहेरच्यांपाशी तक्रारींचा पाढा वाचून रजनी त्यांना अवघड करायची. वेळ आल्यावर तन्वी स्पष्ट बोलायची, मात्र शक्यतो इश्यू न करता सोडून द्यायची.
लग्नानंतर दोघेही ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी लंडनला गेले. दरम्यान तेजसच्या बाबांचा हार्ट अ‍ॅटॅकने अचानक मृत्यू झाल्यावर भारतातच राहण्याचा रजनीचा हट्ट आणि तिला एकटं ठेवायचं नाही हा तन्वीचा निर्णय. त्यामुळे दोघं भारतात परतले आणि अद्वैतच्या जन्माची चाहूल लागली. त्यामुळे या काळात सासू-सुनेचं नातं ठीकठाक राहिलं. अद्वैत थोडा सुटा झाल्यावर मात्र परिस्थिती झपाटय़ानं बदलली. तन्वीच्या प्रत्येक गोष्टीला रजनीनं नावं ठेवणं रोजचंच झालं.
‘‘मावशी, सासूबाईंचं एकटेपण मला समजतं. पण हल्ली जास्त होतंय. बाबांना सांगायच्या तशाच मोलकरीण, महिला मंडळातल्या बायका, शेजारी, वॉचमन कुणा ना कुणाबद्दल तेजसला तक्रारी सांगत राहतात.’’ तन्वी सांगायची.
‘‘तो तिचा स्वभावच आहे गं. बापलेक दोघंही तिच्या तक्रारी मनावर घ्यायचे नाहीत.’’
‘‘तेजस दुर्लक्षच करतो. मलाच वाटतं, त्या एकटय़ा झाल्यात, दिवसभर अद्वैतला सांभाळून कंटाळत असतील. त्यानं आईशी बोललं पाहिजे. पण सासूबाईंचा संवाद म्हणजे तक्रारीच.’’
‘‘रजनी तुझ्याशी बोलत नाही का?’’
‘‘बोलतात, पण निम्म्या तक्रारी तर माझ्याबद्दलच असतात. इतरांच्या तक्रारींवर बहुतेक माझ्याकडून त्यांना लॉजिकल सल्ले दिले जातात. त्यामुळे माझ्यापाशी तक्रारी करण्यात मजाच येत नसणार. तेजस ऐकून घेतो आणि नंतर माझ्याकडे चिडचिड करतो. त्याची इथे परतायची इच्छा नसताना मी पटवून आणलं. तरी मुलगाच आपला. सुनेशी वैर.’’ तन्वी हसून गप्प झाली. तिचं दुखावलेपण जाणवून मी तिच्या पाठीवर थोपटलं तेव्हा म्हणाली, ‘‘मावशी, खरं सांगू का, नोकरी आणि अद्वैत यांच्यामधून आम्ही दोघं एकमेकांच्या वाटणीलाच येत नाही. शनिवार-रविवारी आठवडय़ाची कामं. फिरायला, शॉपिंगला आम्ही सासुबाईंनाही नेतोच. रोजचा जो थोडा वेळ कधीतरी मिळतो नेमक्या तेव्हाच यांच्या तक्रारी सुरू होतात. घरात असल्यावर तेजसनं सतत त्यांच्याचकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग रात्री आम्हीही वैतागलेल्या मूडमध्ये राहतो. गेल्या तीन वर्षांत आम्ही दोघांनी मोकळेपणी गप्पा मारलेल्या आठवत नाहीत. बाहेर भेटूनही पाहिलं पण त्यात मजा नाही. स्वत:च्याच घरात जीव गुदमरतो. एवढं करून जरा काही झालं की ‘तुमच्या राज्यात मला ना स्वातंत्र्य, ना सत्ता. मी वेगळीच राहते आता.’ हे त्यांचं पालुपद असतंच.’’ तन्वीचा त्रागा जाणवत होता.
एकदा अति कटकट झाल्यावर तेजस वैतागला आणि तन्वीच्या विरोधाला न जुमानता ‘ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं,’ असा त्यानं ठाम निर्णय घेतला. रजनीला धक्का बसला, वाईटही वाटलं, पण आता ‘नाही’ही म्हणता येईना. शेजारच्या इमारतीत पूर्वी घेऊन ठेवलेला फ्लॅट होताच. तेजसनं आईच्या पसंतीनं टीव्ही-फ्रीजपासून सगळा नवा संसार घेऊन दिला. सोबतीला बाई मिळाली. ‘अद्वैतला पाळणाघरात नको. रिक्षाकाकांना शाळेतून माझ्याकडे सोडू दे’ असं रजनीनंच ठरवलं.
‘‘आईला एकदा तिच्या ‘राज्यात’ मनासारखं आनंदानं राहू दे. नाहीच जमलं तर येईल परत. ती आपलीच आहे. आपण रोज जाऊ तिच्याकडे. पण एकदा हा प्रयोग करून पाहू.’’ प्रॅक्टिकल स्वभावाचा तेजस आईला ओळखून होता. त्यानं तन्वीला समजावलं. स्वत:च ओढवून घेतल्यामुळे रजनी वेगळी राहिली खरी, पण नातलगांना, मैत्रिणींना, तन्वीच्या माहेरी फोन करकरून ‘तन्वीमुळे तेजसनं मला घराबाहेर काढलं’, याचं रडगाणं गायलंच. मग नातलगांनी तेजसला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेजसनं वस्तुस्थिती स्पष्ट करून हस्तक्षेप थांबवला. रजनीचा स्वभाव सगळेच ओळखून होते.
रजनी त्यानंतर शक्यतो तन्वीच्या घरात गेली नाही. ती सुगरण. स्वयंपाकाची हौस. मुलाला आणि नातवाला प्रेमानं खाऊ घालायची, पण तन्वीसाठी कधी पाठवायची नाही. तन्वी मात्र केलेलं गोडधोड न चुकता सासूला द्यायला जायची. रजनी शब्दही न बोलता डबा घ्यायची, पण तिला ‘ये’ म्हणायची नाही. आरपार बघायची. तन्वीच्या पदार्थाना इतरांपाशी नावं ठेवायची. याचा ताण येऊन खूपदा तन्वी रडायचीसुद्धा. पण वाणसामान, रजनीची औषधं सगळं मनापासून जबाबदारीनं करायची.
एकदा रजनीकडे तिची वहिनी राहायला आली. एकत्र कुटुंबातल्या वहिनीला रजनीच्या नव्या संसाराचा हेवाच वाटला. तेव्हा रजनीला जवळ पण स्वतंत्र राहण्यातलं सुख उमजलं. आणि चमत्कार झाल्या सारखी वस्तुस्थिती समोर आली. दृष्टिकोन बदलला तशी ‘मला घराबाहेर काढलं’ची बोच कमी झाली. चिडचिड थांबली. महिला मंडळ, भिशी सुरू झालं. एकदा तेजस बाहेरगावी असताना आलेलं रजनीचं आजारपण तन्वीनं रजा घेऊन, मनापासून काळजी घेऊन निभावलं. तेव्हा तन्वीचा आपलेपणा रजनीला स्वत:शी तरी मान्य करायला लागला. आपल्या वेगळं होण्यात तन्वीचा हात नाही हे तिला मनातून माहीत होतंच. मग तन्वीशी गरजेपुरतं बोलू लागली. कधीमधी गोडाधोडाचा डबा तन्वीसाठी येऊ लागला.
एके दिवशी तन्वी खुशीतच माझ्याकडे आली. म्हणाली, ‘अहो मावशी, काल मी स्वयंपाकघरातल्या सामानाची रचना थोडी बदलली. पूर्वी अशा हलवाहलवीनंतर आमचा वाद ठरलेला असायचा. सासूबाईंचं ठेवणं मला अस्ताव्यस्त वाटायचं आणि मी मस्त लावल्यावर त्यांना वस्तू सापडायच्या नाहीत. काल कुणाचीच लुडबूड नव्हती. तेव्हा मला जाणवलं की त्यांनाही माझ्या मतांची लुडबूडच वाटत असणार. त्यांनी त्यांच्या घरातल्या शोकेसमध्ये भरतकामाचे नमुने, बाटल्यांचा ताजमहाल, तारेच्या वस्तू जुनंजुनं कायकाय भरलंय. रंग उडालेलं डुगडुगतं फोल्डिंग टेबल हॉलमध्ये ‘असू दे’ म्हणून ठेवलंय. आम्ही एकत्र राहात असताना अशा वस्तू बाहेर काढणं शक्यच नव्हतं. ‘तुमच्या राज्यात’ असं जे त्या सारखं म्हणायच्या त्याचा अर्थ आत्ता कुठे मला उमगायला लागलंय.’’ तन्वी हसत म्हणाली.
‘‘तिला ‘राज्य’ हवं आणि तुला चांगुलपणा. ‘त्यांच्यासाठी कितीही केलं तरी मी परकीच, वाईटच’ हे दु:ख तूही कुरवाळलंस.’’ मी तन्वीला छेडलं.
‘‘खरं आहे. पण मला चांगुलपणा देणं त्यांच्या स्वभावात नसलं तरी आता त्या मला ‘आपली’ मानतायत नक्की. तेव्हा रोजच्या कटकटींमुळे तिघंही सतत करवादलेले असायचो. माझा हेतू चांगलं करण्याचा असूनही दरवेळी कुठे बिनसतं? माझं काय चुकतं? ते सापडायचंच नाही म्हणून त्रास जास्त व्हायचा. वेगळं राहण्यामुळे थोडी ‘स्पेस’ मिळाली. माझ्या आणि सासुबाईंच्या मनाकडे मी बाहेरून पाहू शकले. माझ्या सुंदर घराच्या कल्पनेप्रमाणे घर मांडताना अनेक छोटय़ाछोटय़ा वस्तूंत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतील हे माझ्या लक्षातही आलं नसणार. तेजस भारतात आईसाठी म्हणून परतला नाही, माझ्यामुळे आला यामुळेही त्या दुखावल्या असणार. तेजसला आर्थिक व्यवहारांचा आळस आणि मी जागरूक फायनान्सवाली. यातून आर्थिक निर्णय सुनेकडे आलेले त्यांना रुचत नसणार. ‘माझा मुलगा सुनेचं ऐकतो, तिच्यामुळेच माझ्यापासून दूर गेला’ हा समज धरून ठेवण्यामुळे त्यांच्या ईगोला आधार मिळत असणार हे जाणवलं. मग मनातला रागच गेला. त्यांच्या एकटेपणाचं मीही अति दडपण घेतलं. ‘चांगली सून’ होण्याच्या नादात त्यांना सगळीकडे सोबत नेण्याचा अट्टहास माझाच. मला आवडायचं ते त्यांच्यासाठी करायचे आणि ते आवडून घेऊन ‘तन्वी किती करते’ म्हणून त्यांनी कौतुक करावं अशी अपेक्षा करायचे. माझ्याच मनात असलेल्या अपेक्षांच्या गाठी अशा हळूहळू दिसल्या तसं उलगडत गेलं सगळं. भविष्यात कधीतरी एकत्र राहायची वेळ येईल तोवर आपापल्या घरात दोघींनाही पुरेसं स्वातंत्र्य मिळालेलं असेल. थोडय़ाफार कुरबुरी झाल्या तरी गुंते नक्की नसतील.’’
मोकळेपणी हसताना तन्वी एकदम उठली. ‘‘मावशी, तुम्ही भेटल्यावर देते तसं स्माईल मी सासुबाईंना हल्ली देत नाही हो. त्या आरपार पाहायला लागल्यापासून माझाही चेहरा त्यांच्यासमोर निर्विकार होतो.’’
‘‘मग आता गेल्यागेल्या तसं स्माईल दे. कदाचित तीही मोकळी होऊन हसेल. आणखी एक गाठ सुटेल.’’
‘‘.. आणि होताहोता एके दिवशी तुमच्याकडे माझं कौतुकही करतील..!’’ मिश्किलपणे डोळे मिचकावत तन्वी निघालीच.
neelima.kirane1@gmail.com