|| राम खांडेकर

आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार असताना यशवंतराव विरोधी पक्षनेते होते. नियमाप्रमाणे त्यांना सरकारी कर्मचारी मिळतील या आशेवर मी त्यांच्याकडे जात होतो. पण  दोन आठवडय़ांनंतर यशवंतरावांनीच सांगितले की, ‘तुम्ही सुट्टी वाया न घालवता अन्यत्र कुठेतरी प्रयत्न करा.’ जनता पक्षाच्या सरकारमध्ये यशवंतरावांवर नितांत श्रद्धा असलेले मोहन धारिया वाणिज्य मंत्री होते. माझी अडचण कळताच त्यांनी मला अतिरिक्त खासगी सचिव म्हणून घेतले.

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. त्यानंतर ५ नोव्हेंबरला मी डिक्टेशनसाठी यशवंतरावांकडे गेलो होतो. डिक्टेशन संपल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘आता तुम्ही मुंबईला केव्हा जाणार?’’ कारण इंदिराजी गेल्या त्याच दिवशी ते चार-पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात जाणार होते. वेणूताई गेल्यानंतर ते साहित्यिक आणि कलाकारांबरोबरच शक्य तितका काळ घालवीत होते. कधी ही मंडळी दिल्लीला त्यांच्या बंगल्यावर मुक्कामासाठी येत, तर कधी महाराष्ट्रात गेल्यावर यशवंतराव त्यांच्या घरी पाहुणचार घेत. माझ्या प्रश्नाला यशवंतरावांचे उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, ‘‘खांडेकर, आता मी दिल्लीत कशाला राहायचे याचाच विचार करतो आहे. इंदिराजी होत्या तोवर आमच्यात मतभेद असतानाही आम्ही एकमेकांना भेटून अनेक प्रश्नांवर चर्चा, सल्लामसलत करीत असू. आता राजीवजी तरुण पिढीतले आहेत. त्यांचे विचारही तसेच राहणार. ते मला कधी सल्ला विचारणार नाहीत आणि मी आपणहून देणारही नाही.’’

पुढे त्याच महिन्यात २२ तारखेला त्यांच्याकडे गेलो होतो. डिक्टेशन संपवून नाश्ता करताना मी  यशवंतरावांचा अतिशय घरोबा असलेल्या नाईक-निंबाळकर कुटुंबातील लक्ष्मीबाई निंबाळकरांचे निधन झाल्याचे त्यांना सांगितले व सांत्वनपर पत्र पाठवायचे आहे का म्हणून विचारले. यशवंतराव म्हणाले, ‘‘नुकताच मी पुण्यात गेलो असताना त्यांना भेटून आलो. त्यांचे हाल पाहवत नव्हते. असा मृत्यू कोणालाही येऊ नये.’’ हे बोलणे कदाचित यमदूताने ऐकले असावे. म्हणूनच केवळ दोनच दिवसांनी यशवंतरावांना मूत्रपिंडाच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि दोनच दिवसांत यशवंतराव वेणूताईंच्या भेटीसाठी लांबच्या प्रवासाला निघून गेले.

कराडला कृष्णाकाठी कर्तृत्ववान, सुसंस्कृत पुरुषास साजेसा अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात आला. या वर्षी १२ मार्चला मी कराडला गेलो असताना त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मनात विचार आला- आयुष्यभर जिने यशवंतरावांना साथ दिली तिची स्मृती इथे कुठेच नाही. ही ताटातूट यशवंतरावांना सहन होईल का? यशवंतराव प्रतिष्ठान, वेणूताई प्रतिष्ठान जसे शेजारी शेजारी नांदत आहेत, तसे इथे वेणूताईंची स्मृती म्हणून समाधीशेजारी एक चबुतरा बांधून तिथे तुळशी वृंदावन केले तर ही कमतरता दूर होईल. कराड-सातारा येथील यशवंतरावप्रेमी हे कार्य निष्ठेने मनावर घेतील असे वाटते. याबाबत मी त्यांच्याशी बोललो. वेणूताईंवर तिथे अंत्यसंस्कार झाले नाहीत, या सबबीला काही अर्थ नाही. जगजीवनराम यांचा अंत्यविधी बिहारमध्ये झाला तरी दिल्लीतील एका बगिच्याला त्यांच्या कुटुंबीयांनी ‘समता स्थल’ हे नाव देऊन समाधी म्हणून चबुतरा बांधला आहे. तिथे जगजीवनराम यांच्या जन्म-मृत्यूदिनी प्रार्थनाही होते. मग इथे का नाही?

यशवंतरावांच्या जीवनाचे सार सांगायचे तर  पुढील पंक्तींतून सांगता येईल-

‘तकदीर के फैसलों से कभी मायूस नहीं होते,

जिंदगी से कभी बेबस नहीं होते

हाथों की लकीरों पे यकीन मत करना,

तकदीर तो उनकी भी होती है,

जिनके हाथ नहीं होते’

..यशवंतराव विरोधी पक्षनेते असल्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना सरकारी कर्मचारी मिळतील या आशेवर मी त्यांच्याकडे जात होतो. त्यांचे काम करीत होतो. पण दोन आठवडय़ांनंतर यशवंतरावांनी सांगितले की, ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विरोधी पक्षनेतेपद प्रथमच देण्यात येत असल्यामुळे त्याचे नियम करण्यास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही सुट्टी वाया न घालवता कुठेतरी प्रयत्न करा. मलाही सांगा.’’ जनता पक्षाच्या सरकारात यशवंतरावांवर नितांत श्रद्धा असलेले मोहन धारिया वाणिज्य मंत्री होते. माझी अडचण त्यांना कळताच त्यांनी नवीन जागा निर्माण करून मला अतिरिक्त खासगी सचिव म्हणून घेतले. धारिया यांच्या शिस्तप्रिय, कडक स्वभावामुळे त्यांच्यासोबतची अडीच वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करण्यासारखी थोडीशी रटाळच गेली. धारिया यांचा घरातील प्रत्येकावर वचक होता. कामाच्या बाबतीत वर्तणूक अतिशय कडक; पण अंत:करणात जिव्हाळा होता. एखादी चूक झाली की त्याचे ते पोस्टमॉर्टेम करूनच स्वस्थ बसायचे. एकदा विवाह समारंभानिमित्त पाठवण्यात येणाऱ्या ठरावीक मजकुराच्या पत्रात टायपिस्टकडून पत्राच्या खाली पत्त्यात नावाच्या जागी कुलदैवतेचे नाव टाईप झाले. अशी चूक स्वप्नातही व्हायला नको. ती अक्षम्य आहे, हेही खरेच. पण शेवटी तो माणूसच आहे. दिल्लीत एक म्हण प्रचलित आहे- ‘इन्सान गलती का पुतला है’! या नियमाखाली चूकही माफ असते. मात्र, सही करताना धारिया यांच्या लक्षात ही गोष्ट आली व त्यांनी त्या टायपिस्टला हजर करण्यास सांगितले. धारियांसमोर त्या टायपिस्टचा निभाव लागणार नाही याची पक्की खात्री असल्याने प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून मी वेळ निभावून नेत होतो. पण धारिया ही गोष्ट शेवटपर्यंत विसरले नाहीत, हे मात्र खरे!

सकाळी साडेसातलाच त्यांच्या बंगल्यावर कामास सुरुवात होत असे. थंडी, वारा, पाऊस याची पर्वा न करता ७.२० ला कामावर हजर व्हायलाच पाहिजे असा त्यांचा दंडक. त्याकाळी सकाळी आठपर्यंत एसटीडीची सोय असल्याने त्या अध्र्या तासात पुण्याचे चार-पाच फोन तरी लावून द्यावे लागत. सुदैवाने फोन दोन असल्यामुळे एकावर बोलणे सुरू असताना दुसरा लावून ठेवावा लागे. मंत्र्यांकडे काम करताना त्यांचे पूर्वायुष्य थोडे तरी माहीत असायला हवे. धारिया यांच्या पूर्वायुष्यात डोकावले तर त्यांचा हा स्वभाव तरुण वयापासूनच असल्याचे समजले. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. ऐन तरुण वयात त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दल चीड निर्माण होऊन १७ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी वकिली केली तीही गरीबांसाठी, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी. पैशाचा लोभ त्यांना कधी झाला नाही. गरीबांच्या प्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी ‘वनराई’ कार्यक्रम हाती घेतला. त्यांच्या पश्चातही तो सुरू आहे. ‘वनराई’चे काम वाखाणण्यासारखे आहे. डोंगराच्या पायथ्याशी दगडांनी व्यापलेल्या पडीक जमिनी सुपीक बनवून सर्व प्रकारे स्वावलंबी जीवन जगणाऱ्या १००-१५० घरांच्या वस्त्या त्यांनी त्यातून उभ्या केल्या आहेत. यशवंतरावांनी धारियांचे कर्तृत्व, कार्यशैली पाहून १९६२ साली प्रदेश काँग्रेस कार्यालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. थोडय़ाच दिवसांत त्यांनी तिथे शिस्त आणून डोळ्यांत भरण्याजोगा बदल घडवून आणले. त्यांच्या या गुणांचे चीज व्हावे म्हणून १९६४ च्या फेब्रुवारीत त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले. परंतु दिल्लीतील राजकारण व प्रशासन पाहता इथे आपल्या गुणांचे चीज करण्यासाठी आणले आहे की त्यांना तिलांजली देण्यासाठी, असा प्रश्न धारियांना पडला. त्यांचा कोंडमारा होऊ लागला. ध्येयवादी माणसाच्या बाबतीत हे असे घडणे काही नवे नाही.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत वाढलेल्या राजकारणी व्यक्तींची दिल्लीत गेल्यावर हीच अवस्था होते. धारियांना काँग्रेसचे स्वरूप जनताभिमुख असावे, सोयीस्कर राजकारणाचा त्याग करून ध्येयवादी राजनीती करावी, सेवादलातील कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे असे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी त्याचा सतत पाठपुरावा केला. मात्र, पालथ्या घडय़ावर पाणी! म्हणून त्यांनी चिडून जाहीररीत्या आणि काँग्रेस अधिवेशनातही याचा उल्लेख करून श्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली. आणीबाणीला विरोध केल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून ते जनता पक्षात आले.

धारियांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ आणि ‘मेटल्स अ‍ॅण्ड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन’मधील भ्रष्टाचार कमी करण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. परंतु सर्व वेळ जरी त्याकरता खर्च केला तरी फारसे काही साध्य होणार नाही, हे ध्यानात आल्यावर त्यांनी इतर कामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याच इमारतीत उद्योग विभागही होता. वर्षभर तिथल्या कामाची चाकोरी पाहून त्यांची खात्रीच झाली, की मंत्रिमंडळात कोणाचा कोणाचा पायपोस कोणात नाही. नवे काही करण्याची कोणातच इच्छाशक्ती नव्हती. बहुतेकांनी एक मात्र केले, की शक्य तितकी आपली माणसे सरकारात भरती केली आणि प्रशासनाची वाट लावण्यात हातभार लावला. मला मात्र धारियांच्या सहवासात अनेक गोष्टी शिकता आल्या.

धारियांचे जीवन अगदी साधे होते. मंत्रीपदाची झूल त्यांनी कधीही मिरवली नाही. शेवटी मराठीच माणूस ना! धारियांच्या मुलीच्या विवाहाचा स्वागत समारंभ पुण्यातील एका भव्य पटांगणात होता. सकाळी लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने पार पडले होते. स्वागत समारंभात सुमारे आठ-दहा हजार लोक वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यांच्याकरता धक्का बसेल असा मेनू होता : फक्त पिण्याचे पाणी! गदी साधा पेढासुद्धा नव्हता. लग्नाचे घर असूनही त्या रात्री मी सर्किट हाऊसवर रात्री ११ च्या सुमारास जाऊन उपाशीच झोपलो.

धारियांकडे काम करताना मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटायचे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असूनही त्यांना भेटायला येणारे फारसे कोणी नसे. दिल्लीतच नव्हे, तर अगदी पुण्यातसुद्धा! पुण्यात दोन-तीन दिवसांच्या मुक्कामासाठी गेलो की मी सर्किट हाऊसवरून सकाळी त्यांच्या बंगल्यावर जात असे. दिवसभरात त्यांचे फक्त एक-दोनच कार्यक्रम असत. उरलेल्या वेळात ते मित्रांकडे, नातेवाईकांकडे जात. आणि मी मात्र गॅलरीत उभा राहून रहदारी पाहत दिवस काढत असे. त्यांना मागण्यांचे अर्ज देणारेही कोणी नसत. पोस्टाने येतील तेवढीच निवेदने. मित्रमंडळही मोजकेच व तेच ते. सरकारी कामाचा बोध होईल अशा एका वाक्याचा धारिया नेहमी उच्चार करीत. आजही माझ्या ते स्मरणात आहे.. ‘जी चालते ती कार आणि जे चालत नाही ते सरकार’! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही आपण याचाच तर अनुभव घेतो आहोत!

त्यानंतरचा जवळपास सहा महिन्यांचा काळ मी पुन्हा यशवंतरावांसोबत ते उपपंतप्रधान असताना काढला. उद्याचा दिवस कसा उगवेल, याची चिंता या काळात सतत मला लागलेली असे. १९८१ साली इंदिराजींनी जनता सरकारच्या नियोजनाचा अभाव असलेल्या कारभाराचा फायदा उचलत जनतेत पुन्हा आदराचे स्थान मिळवले होते. या काळात मी अनुभवलेल्या एका गोष्टीचा उल्लेख इथे आवर्जून करायला हवा. तो म्हणजे- आता इंदिराजींमध्ये पूर्वीचा कणखरपणा उरला नव्हता. याचा फायदा त्यांना १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुरेपूर झाला. काँग्रेसचे जवळपास ३५१ लोकसभा सदस्य निवडून आणून त्यांनी पुन्हा सरकार बनवले. त्यांच्या मंत्रिमंडळात नागपूरचे वसंत साठे यांची माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली. मला ते फार पूर्वीपासून ओळखत असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो. माझा जवळपास २० वर्षांहून अधिक काळ मंत्र्यांसोबत गेल्यामुळे पुन्हा मूळ खात्यात जाऊन काम करणे अवघड होते.

सरकारमध्ये खात्यासाठी योग्य मंत्री मिळणे म्हणजे उंबरावरचे फूलच जणू. साठे यांची निवड मात्र अगदी यथार्थ होती. उंचपुरे, तरणेबांड, प्रफुल्लित चेहरा. आपुलकी आणि जिव्हाळा या स्वभावामुळे त्यांनी आपल्या खात्यात कौटुंबिक वातावरण निर्माण केले. त्यामुळेच ते कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने भारताच्या टेलिव्हिजन क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती करू शकले. भारतातील जनतेचे रंगीत टेलिव्हिजनचे स्वप्न केवळ त्यांच्यामुळेच लवकर पूर्ण झाले. याबद्दल आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे.

साठे यांनी वैज्ञानिक युगात रंगीत टेलिव्हिजनचे महत्त्व जाणून त्याचा जिद्दीने पाठपुरावा केला. एकदा मंत्रिमंडळ बैठकीत देशात कृष्ण-धवल टीव्हीच्या पिक्चर टय़ूब्ज तयार करण्याच्या कारखान्याचा प्रस्ताव विचारार्थ आला. साठे यांनी त्याला कडाडून विरोध केला. आपल्या शेजारच्या सर्व देशांत रंगीत टीव्ही आलेला आहे; आणि आता कृष्ण-धवल टीव्ही हे कालबाह्य़ तंत्रज्ञान झाले असून जगात निरुपयोगी झालेली यंत्रणा आपल्या माथी मारण्यात येत आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे ४० टक्के तरी रंगीत पिक्चर टय़ूब्ज तयार करण्यात याव्यात असा आग्रह त्यांनी धरला. यावर त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या प्रणव मुखर्जीनी ‘आता डिजिटल टीव्ही येत असून रंगीत टीव्ही मागे पडणार आहेत,’ असे स्पष्टीकरण दिले होते. दुर्दैवाने डिजिटल टीव्ही म्हणजे काय याची साठेंना कल्पना नव्हती. इंदिराजींनीही मुखर्जीनाच पाठिंबा दिला. त्यामुळे साठे शांत बसले. परंतु नंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या लक्षात आले, की डिजिटल आणि रंगीत टीव्ही हे दोन्ही एकच आहे!

पुढे आठ दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले असताना साठे यांनी रंगीत टीव्हीसंबंधीची सर्व माहिती गोळा केली. दिल्लीत परतल्यावर टेलिव्हिजन स्टुडिओत बसून त्यांनी अभियंत्यांना सांगितले की, ‘‘तुम्हाला एक लाख रुपये मंजूर करतो. मला महिनाभरात सध्याच्या यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा करून संसद भवनापर्यंत रंगीत टीव्हीचे प्रसारण होईल अशी व्यवस्था तयार करून दाखवा.’’ या गोष्टीचे गांभीर्य त्यांच्या ध्यानी यावे म्हणून ते रोज तास- दीड तास त्यांच्याबरोबर खर्च करू लागले. रंगीत टीव्हीची यंत्रणा अभियंत्यांनी तयार केली. आणि संसद अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी सेंट्रल हॉलमध्ये एका बाजूला दहा कृष्ण-धवल टीव्ही आणि दुसऱ्या बाजूला दहा रंगीत टीव्ही बसवून अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यावरून स्वास्थ्य व शेतीशी संबंधित कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. साठे यांनी पंतप्रधानांसह सर्व संसद सदस्यांना हे प्रसारण दाखवून रंगीत टीव्हीचे महत्त्व पटवून दिले. अशा रीतीने त्यांनी रंगीत टीव्हीच्या उत्पादनास चालना देण्यात यश मिळवले.

महिन्यातून सुमारे १५ दिवस तरी ते दुपारी कार्यालय सुटल्यानंतर जवळपास तासभर टेलिव्हिजन स्टुडिओत बसून प्रसारण, कार्यक्रम आदींबाबत अभियंत्यांशी चर्चा करीत. नववर्षांच्या कार्यक्रमात भाग घेत. साठे यांचा पिंड कलाकाराचा होता; राजकारणाचा अजिबात नव्हता. संगीत, कला, नृत्य यांची त्यांना आवड होती. त्यामुळे या खात्याशी ते अविभाज्यपणे जोडले गेले. कितीही टीका झाली तरी त्यांची सायंकाळ या कलाकारांच्या कार्यक्रमांत वा मैफलींतच जात असे. त्यांच्याकडचे वातावरण हे कौटुंबिक जिव्हाळ्याने रसरसलेले असे. सर्वाना सन्मानाची वागणूक मिळे. त्यांच्यासोबत प्रवास करताना अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा करता येत असे.

हे सारे खरेच; पण त्यांनी स्वत:चे कर्तृत्व पणाला लावले ते ‘एशियाड १९८२’च्या स्पर्धाचे जगभर जास्तीत जास्त चांगले प्रक्षेपण व्हावे यासाठी. अहोरात्र परिश्रम करून त्यांनी सर्व तयारी पूर्ण करत आणली असतानाच दिल्लीच्या दस्तुराप्रमाणे नाकापेक्षा मोती जड होत असल्याची शंका काहींना आली आणि श्रेष्ठींकडे त्यांच्याबद्दलच्या  चुगल्या करण्यात आल्या. आणि.. त्याविषयी पुढील आठवडय़ात!

ram.k.khandekar@gmail.com