|| राम खांडेकर

१९६० चे नागपूर अधिवेशन ही यशवंतरावांच्या दृष्टीने निराळीच पर्वणी होती. तोपर्यंत ते ‘प्रवासी’ मुख्यमंत्री म्हणून या भागात येत असत. आता ते ‘निवासी’ मुख्यमंत्री झाले होते! इथेही त्यांचा दैनंदिन कार्यक्रम मुंबईसारखाच होता. फरक एवढाच, की बंगल्यावर सकाळी येणाऱ्या जनतेची संख्या त्यामानाने फारच कमी होती. खरोखरच त्या वेळी येथील जनता खाऊनपिऊन सुखी होती. त्यांना कसलीच हाव नव्हती. पावसाच्या भरवशावर शेती असूनही सुपीक जमिनीमुळे पीक चांगले यायचे. शिवाय बहुतेक प्रत्येकाचा दूधदुभत्याचा व्यवसाय होता. उदाहरण म्हणून सांगतो- नरसिंह राव या भागातूनच दोनदा निवडून आले होते. (१९८४-८५ व १९८९) या कालावधीत अपवाद म्हणून एकानेही गॅस किंवा टेलिफोन जोडणीसाठी अर्ज दिला नव्हता. त्यांचा कोटा दिल्लीसाठीच खर्च होत होता.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा

यशवंतराव बंगल्यावरच्या भेटीगाठी आटोपून हैदराबाद हाऊस येथील कार्यालयात येत. विधानसभेच्या वेळेपर्यंत सरकारी काम करीत. नंतर विधानसभेत जात. आमदारांच्या भेटीगाठी साधारणत: तिथेच होत असत. जवळपास अडीच महिन्यांच्या या नागपूरच्या मुक्कामात यशवंतराव एक शनिवार-रविवार नागपुरात, तर एक शनिवार-रविवार पश्चिम महाराष्ट्र-कोकण भागासाठी ठेवत. त्या वेळी प्रवास फक्त रेल्वेनेच करावा लागे. डिसेंबर-जानेवारीमधील ‘हुरडा पार्टी’ हे या भागातील वैशिष्टय़ असे! यशवंतराव शनिवारी विदर्भ-मराठवाडय़ातील भागात जायचे; तर रविवारी एखाद्याचे हुरडा पार्टीचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून साधारणत: ११ ते ४ पर्यंतचा वेळ त्याच्या शेतात घालवत. या वेळी या भागातील खेडय़ांतील जनतेशी त्यांचा संपर्क येत असे, त्यांच्याशी संवाद साधला जाई. त्यामुळे या भागातील जनतेच्या गरजांची, अडचणींची कल्पना यशवंतरावांना येत होती. पश्चिम महाराष्ट्रातील वाचकांच्या माहितीसाठी सांगावेसे वाटते, त्या काळी विदर्भात उत्कृष्ट प्रकारच्या ज्वारीचे पीक यायचे! यात हुरडय़ाच्या ज्वारीचीही लागवड करीत असत. ही ज्वारी जवळपास १५-१६ प्रकारची असे.

यशवंतराव सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात जायचे. तिथे एखाद्या झाडाखाली व विहिरीजवळ एक मोठा गोणा (सतरंजीपेक्षा खूप मोठा चादरीसारखा, पण जाड) टाकलेला असायचा. त्यावर गोल करून मंडळी बसत. हुरडय़ाच्या ज्वारीची कणसे गोवऱ्या (शेणाच्या) पेटवून त्यात भाजली जायची. ती गरम असतानाच दगडाने त्यांचे दाणे काढायचे व गोल करून बसलेल्या मंडळींच्या मध्ये टाकायचे. याला ‘हुरडा’ म्हणत. हा अनेक प्रकारचा असे, पण ‘वाणी’चा हुरडा सर्वात चांगल्या प्रकारचा समजला जाई. समोर टाकलेला हुरडा संपत नाही तोच दुसरा हप्ता यायचा. हुरडा गरम असेपर्यंत खायचा असतो. गार झाला की बाजूला करीत. यासोबत असे हिरव्या मिरचीचा ठेचा व वांग्याचे भरीत! भरिताची वांगी, टोमॅटो, कांदा व हिरव्या मिरच्या गोवऱ्याच्या राखेतच भाजत. त्याच्या चवीची तुलना आजच्या भरिताबरोबर होणे शक्य नाही, इतके ते चविष्ट असायचे. संपूर्ण हुरडा पार्टी ‘मेक इन व्हिलेज’ अशीच असायची. हे भरीत दाणे काढलेल्या कणसाच्या मागच्या दांडीने खायचे. साधारणत: दोन तास हा कार्यक्रम झाल्यानंतर अर्धा-पाऊण तास आराम. नंतर द्रोणात मलईच्या दुधाचे दही! यात भरपूर साखर टाकायची. दाणे काढलेल्या कणसाचा समोरचा भाग दह्य़ात भिजवून खायचे असते. नंतर तासभर शेतात फेरफटका व बगिच्यातील संत्र्यांचा, पेरूंचा स्वाद; फळं तोडून तिथेच खायची. अन् शेवटी ताज्या दुधाचा गरम-गरम चहा!

विषयांतर करून हे सांगण्याचा उद्देश हा की, आजची पिढी ‘आऊटिंग’ला जाऊन हजारो रुपये खर्च करते, त्यापेक्षा किती तरी आनंद या एक दिवसात मिळत होता, हे सांगावेसे वाटले. शेतकऱ्यांचा दुधाचा जोडधंदा असल्यामुळे व ते घरोघरी दूध पुरवत असल्यामुळे वर्षांनुवर्षांचा परिचय वा घरोबा असायचा. वर्षांतून दोनदा हा कार्यक्रम होत असे. त्यासाठी दरवर्षी आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्याची वाट पाहात असू. यशवंतरावांसाठी हा कार्यक्रम अमूल्य होता, याचे कारण या कालावधीत विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी, त्यांच्या अडीअडचणींशी प्रत्यक्ष परिचय होत असे. तसेच तिथे जमलेल्या असंख्य शेतकऱ्यांशी, त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता येत असे. या संवादामुळे आपुलकी निर्माण होत होती.

कोयना धरणाच्या निर्मितीवेळी धरणाला विरोध करणाऱ्यांनी ‘धरणातील पाण्यापासून वीज तयार होऊ दिली तर ते पाणी मृत होईल, त्यावर काही शेती पिकणार नाही,’ अशी शेतकऱ्यांची धारणा करून दिली होती. यशवंतरावांनी या शेतकऱ्यांना विरोधकांबरोबर फरफटत जाऊ दिले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे मन वळवले. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे  यशवंतरावांनी हुरडा पार्टीचे निमित्त करून शेतकऱ्यांसोबत वेळ घालवायचे ठरवले होते. नाही तर मुख्यमंत्र्यांना इतकी सवड काढणे फार अवघड असे. हा पार्टीचा योग दोन-तीनदाच आला असेल, पण या काळात मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची आपुलकी कमावली होती; हे मुंबईत बसून शक्य झाले नसते. नागपूरच्या अधिवेशनाचा फार मोठा फायदा यशवंतरावांनी चातुर्याने करून घेतला होता. नाही तर मुख्यमंत्र्यांना केवळ हुरडा पार्टीकरिता पाच-सहा तास खर्च करण्याची कल्पना करणे तरी शक्य होते का?

जवळपास अडीच महिन्यांच्या या वास्तव्यात यशवंतरावांना विदर्भ-मराठवाडा येथील अनेक क्षेत्रांतील मंडळी येऊन भेटत होती. यशवंतराव एकाग्रतेने त्यांचे म्हणणे, सूचना, अडचणी ऐकून घेत होते. यात एक चिंतनीय व तातडीने विचार करण्याची बाब चर्चेतून त्यांच्या लक्षात आली होती. ती म्हणजे- विदर्भामधील कापड गिरण्यांतील मशीनरी बरीच जुनी झाली आहे. मिल्सची संख्या फार (नागपुरात सहा व इतरत्र चार-पाच) नाही. विदर्भात रोजगाराचे हेच एकमेव साधन होते. त्यामुळे २४ तास मिल चालू राहत असल्याने व मशीन्स अतिशय जुन्या झाल्या असल्यामुळे आधुनिक स्पर्धेच्या युगात पुढील काही वर्षांत याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे झाले होते. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर पुढील चार-पाच वर्षांत तरी नवीन मशीन्स बसवणे गरजेचे झाले होते. हे लक्षात आल्यानंतर यशवंतरावांना मुंबई दिसू लागली व डोक्यात तेथील मिल्सच्या भवितव्याचा विचार सुरू झाला.

अधिवेशन संपवून मुंबईला परत गेल्यानंतर या प्रश्नाचा ते विचार करू लागले. विषय गंभीर व चिंतेचा होता. नीट विचारांती त्यांना एक कल्पना सुचली. ती अशी की, नवीन मशीन्स बसवण्याची गरज लक्षात घेता या सर्व कापडाच्या मिल्स कल्याणच्या पलीकडे हलवायच्या. तिथे परळ, लालबाग येथील खुराडय़ातून कामगारांना काढून चांगले जीवन जगता येईल, अशी सर्व सुविधांनी युक्त वसाहत तयार करायची. संबंधित व्यक्तींशी चर्चेच्या ओघात सहज या कल्पनेची त्यांनी चाचपणी करून पाहिली. त्या वेळी मुंबई ठाण्यापलीकडे फारशी वाढली नव्हती. शिवाय कामगारांचाही यास फारसा पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. खरं तर कोणत्याही कामगाराचे नुकसान न होऊ देता त्यांच्या हिताची ही अतिशय अभिनव योजना होती. पण लक्षात कोण घेतो? पुढे काही वर्षांनी मुंबईतच नाही, तर इतरत्रसुद्धा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत गेला आणि मिल्स बंद होऊन कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र आपण पाहिले आहे.

आणखी एका योजनेबाबत यशवंतराव विचार करीत होते. विदर्भ-मराठवाडय़ातून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तेव्हा कुर्ला-वांद्रे खाडी बुजवून घरे बांधण्यात येत होती. तरीही तिथे भरपूर जागा उपलब्ध राहण्याची शक्यता होती. त्यामुळे या शिल्लक जागेवर सरकारी कार्यालयांसाठी इमारती बांधून फोर्टमधील बरीच सरकारी कार्यालये तिथे हलवण्यात यावीत, अशी यशवंतरावांची योजना होती. त्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी प्राथमिक स्वरूपात चर्चा करून पुढची पावलेसुद्धा उचलण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला होता; परंतु पुढे यशवंतराव दिल्लीला गेल्यामुळे त्यांच्या अनेक योजना, अहवाल हे आलमारीत बंदिस्त झाले. यशवंतराव अशाप्रकारे सर्वाच्याच हिताच्या दृष्टीने भविष्यवेधी विचार करत होते.

थोडे विषयांतर होईल, पण आवश्यक म्हणून सांगावेसे वाटते. सरकारी फाइल्स रोज मुंबईहून नागपूरला व नागपूरहून मुंबईला जात. पोस्टाची पत्रे मात्र सरळ नागपूरला येत. एका नव्या वातावरणातील, उत्साहपूर्ण जवळपास अडीच महिन्यांचा हा नागपुरातील मुक्काम हलवण्याची वेळ आली. नागपूरच्या वा विदर्भाच्या लोकांसाठीही हा अनुभव नवा होता. सर्वानी याचे मनापासून स्वागत केले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी एकही मोर्चा, उपोषणासाठी तंबू वगैरे काही नव्हते. मुंबईकरांची मात्र द्विधा मन:स्थिती झाली होती. घरी परत जाण्याचा आनंद मानायचा, की अशा वातावरणातून परत त्याच धावपळीच्या जीवनात परत जायचे म्हणून खेद मानायचा? जाताना प्रत्येकाने संत्र्याचे टोपले मात्र घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या कागदपत्रांसाठी ट्रक असल्यामुळे लाकडी फर्निचर व भरपूर भाजीही अनेकांनी घेतली होती. अशी भाजी त्यांनी मुंबईत कदाचित पाहिली नसावी. गाडीत बसल्यानंतर प्रत्येक जण स्वत:साठीच म्हणत असेल- ‘पुनरागमनायच।’!

मुंबईत परतल्यानंतर जवळपास १५-२० दिवस घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना नागपूर मुक्कामातील गमतीजमती सांगण्यात मुंबईकरांचा वेळ जात होता. मात्र काही दिवसांतच सर्व जण पुन्हा मुंबईकर बनले होते. अडीच महिने घरी राहिल्यामुळे मला मात्र काही दिवस जड गेले हे खरे! मुंबईत आल्यानंतर यशवंतराव आपल्या कामात व्यग्र होत गेले. त्यांच्या नजरेसमोर होते ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले, तर सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचे शेवटचे अंदाजपत्रक! करांचा बोजा मध्यमवर्गावर न पडता हाती घेतलेल्या प्रत्येक क्षेत्रातील योजनांसाठी, आर्थिक बळ कुठेही कमी पडू न देता जमा-खर्चाचा अंदाज बांधणे म्हणजे तारेवरची कसरत होती. मात्र यशवंतरावांनी  गरजू लोकांना साहाय्य करण्याची, सरकारी पेशाचा, जमिनीचा योग्य उपयोग करून घेण्याची वृत्ती ठेवली होती. नागपूर अधिवेशनासारखे हेही अधिवेशन फारसा विरोध न होता व अडचणी न येता यशस्वीरीत्या पार पाडण्याचे कौशल्य यशवंतरावांनी सर्वाना दाखवून दिले होते. याच अधिवेशनात १९६२ च्या मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन नागपूरला भरवण्यात येणारे हिवाळी अधिवेशन या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये भरवण्याच्या प्रस्तावाला सर्वानी अनुमोदन दिले.

दिवस जायला वेळ कितीसा लागणार. हा हा म्हणता जुलै महिना उगवला. पुन्हा सर्व कागदपत्रे, फाइल्स वगैरे बांधण्याची तयारी सुरू झाली आणि आठ-नऊ जुलैला सर्व कागदपत्रे घेऊन ट्रक नागपूरला रवानाही झाला. हिवाळी अधिवेशनाचा मन प्रसन्न करणारा अनुभव पदरी असल्यामुळे या अधिवेशनासाठीसुद्धा मुंबईकर उत्सुक होते. या वेळी मुंबईच्या धुवाँधार पावसापासून सुटका होणार होती. मुख्यमंत्री १२ जुलैला मुंबई-कलकत्ता मेलने नागपूरला येणार होते. कार्यालयातील काम आटोपून ते परस्पर स्टेशनवर जाणार होते, पण माणसाने ठरवल्याप्रमाणे घटनाचक्र फिरले तर नियतीला काय काम! त्या दिवशी नेमके असेच घडले. त्याविषयी पुढील आठवडय़ात..

ram.k.khandekar@gmail.com