नाविन्याचा आविष्कार हा आधुनिक काळाचा महिमा आहे. माणसाच्या गरजा वाढत आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी तो नवनव्या कल्पना शोधून काढत आहे.
निकामी झालेल्या टायर्सपासून उपयुक्त सिंथेटिक इंधन  (सिनगॅस) उत्पादित करण्याची शक्कल हा त्याच प्रयत्नाचा एक भाग होय. साब्रिना पोटरेफिना या इटालियन संशोधिकेने या कामी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. कचरा म्हणून फेकून दिलेल्या रबरी टायर्सवर त्या औष्णिक प्रयोग करीत असून, त्यातून निर्मित होणारा सिनगॅस तसेच घनपदार्थ यांची छाननी करीत आहेत.
एकटय़ा युरोपमध्ये दरवर्षी ३० लाख टन टायर्सचा कचरा निर्माण होतो. त्यातले ६० ते ७० टक्के जमिनीत पुरण्यात येतात. त्यातून जमिनीत प्रदूषण घडून येते. शिवाय त्यातील उपयुक्त घटक वाया जातात. रबराच्या टायर्समध्ये मोठय़ा प्रमाणात बाष्पशील वायू दडलेले असतात आणि त्यामुळे त्याच्यात दडलेली उष्णता-ऊर्जा ही कोळसा व लाकूडफाटा यापेक्षा अधिक असते आणि ती ऊर्जा रिसायकल करता येते. ही रबरात दडलेली ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संशोधकांचे नवे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकल्पाचे दोन भाग पडतात. पहिल्या भागात टायर्स जाळून त्यापासून बाष्पशील वायू मिळविणे आणि दुसऱ्या भागात त्याच्या राखेतून सिलिकॉन कार्बाईडसारखे उपयुक्त पदार्थ मिळविणे. हा कार्बाईड पदार्थ सिरॅमिकच्या वस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी वापरता येतो.
प्रारंभी टायर्सचा कचरा गरम वाफेसह एका औष्णिक संयंत्रात (रिअ‍ॅक्टरमध्ये) एक हजार से. तापमानाला जाळला जातो. त्यासाठी ऊर्जा खर्ची पडत असली तरी ती सिनगॅसच्या रूपाने दामदुपटीने वसूल करता येते. या सिनगॅसमध्ये हायड्रोजन, कार्बनमोनॉक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन वायूंचे मिश्रण असते. हा वायू नैसर्गिक वायूइतकाच ऊर्जा पुरवू शकतो किंवा त्यापासून अन्य पदार्थ तयार करता येतात.
अशाप्रकारे कचरा म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या व भुईला भार होणाऱ्या टायर्सपासून उपयुक्त इंधन आणि सिलिकॉन कार्बाईडसारख्या धातूकाम, चिनीमातीच्या वस्तू  बनविण्यास उपयोगी ठरणाऱ्या महाग पदार्थाची निर्मिती करण्याची नवकल्पना भविष्यातील एक आशा ठरणार आहे.
त्याच वेळी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी झाडाझुडपातून मिळणाऱ्या सेल्युलोजच्या तंतूपासून सूक्ष्म स्फटिकमय संयुगे तयार करून त्यांचा वाहनाचे टायर तयार करण्याचे तंत्र उपयोजित केले आहे. त्यातून टायर्सची निर्मिती तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी होणार आहे व त्याची किंमतही वाजवी होणार आहे. या जादा कार्यक्षमता असलेल्या टायर्समुळे मोटारउद्योगात मोठी क्रांती होईल असा तिथल्या संशोधकांना विश्वास वाटतो.
या आधी सेल्युलोज तंतूंचा वापर रबर उद्योगात पट्टे, होजेस (लवचिक नळय़ा) तसेच उष्णतारोधक आवरणे तयार करण्यासाठी केला गेला आहे. पण टायर्स तयार करण्यासाठी हा प्रथमच वापर होत आहे. त्याऐवजी कार्बन ब्लॅक आणि सिलिकॉनच्या पावडरीचा वापर व्हायचा. कार्बन ब्लॅकची धूळ मिळविण्यासाठी महागडे तेल खर्ची पडते तर वाळूवर प्रक्रिया करणे हीदेखील खर्चिक बाब आहे. हे दोन्ही पदार्थ दाट असून, त्यांच्या वापराने इंधनाची कार्यक्षमता कमी होते. याउलट सेल्युलोजयुक्त भरणीने टायर्स हलके बनतात. स्वस्त पडतात व त्याची फेरनिर्मिती देखील करता येते. सेल्युलोजची मुबलक  उपलब्धता ही आणखी एक जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे जड सामान वाहून  नेण्याची या नव्या टायर्सची क्षमता परंपरागत टायर्सएवढीच असते. शिवाय उन्हाळय़ात सिलिकॉनयुक्त टायर्सच्या गरगर फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो तो टळल्याने वाहनांच्या इंधनात बचत होऊ शकते.
जगभरात दरवर्षी १०० कोटी टायर्सची निर्मिती होत असते व प्रत्येक टायरमागे सुमारे साडेचार लीटर खनिज तेल वापरावे लागते. यावर कॅलिफोर्नियातील पालो आल्टो येथील संशोधकांनी उपाय सुचवला आहे. ऊस, मका, स्विच ग्रास व अन्य वनस्पतीज घटकांपासून शर्करा तयार करता येते व त्या साखरेपासून आयझोप्रीन हा जीव रासायनिक घटक मिळवता येतो. त्यासाठी या साखरेचे जिवाणूच्या एका विशिष्ट वाण वापरून विकरण करावे लागते. या जिवाणूच्या अंतरंगात जेनेटिक अभियांत्रिकीद्वारे बदल घडवून आणलेला असतो व साखरेपासून जैविक आयझोप्रीन तयार करण्याची त्यास क्षमता प्राप्त झालेली असते.
आज जगभरातील टायर उद्योगात दरवर्षी पेट्रोलियम तेलापासून तयार होणारे ७७ कोटी किलो आयझोप्रीन वापरले जाते. त्याची जागा हे नवे जैविक रसायन घेऊ शकते व पेट्रोलियम तेलाची बचत होऊ शकते.
स्पेनमधील शास्त्रज्ञांनीदेखील या दिशेने आपले संशोधन जारी ठेवले असून, तिथल्या एल्पे युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सिलिकॉन संयुगाच्या रबरातील विविध प्रमाणाने टायर्सची गरगरण्याची सहजता व त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाची छाननी केली. त्यामुळे नव्या युरोपियन कायद्याशी सुसंगत असे टायर्स निर्माण करण्यासाठी ते टायर कंपन्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याशिवाय इंधनबचत होऊन पर्यावरणास हातभार लागावा, हा त्यांचा उद्देश आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण