29 November 2020

News Flash

जिथे कचरा, तिथेच खत

जिद्दीने कुणी करावे म्हटले तर प्रचंड खर्चीक व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उभे करता करता दमछाक करणारे बनते.

कुजण्याजोग्या कचऱ्याचे छोटेखानी तंत्रज्ञान सोपे आहे आणि कमी वेळात, कमी जागेत बसणारेदेखील. कचऱ्यावर प्रक्रिया ही आपलीही जबाबदारी आहे, असे मानणाऱ्यांसाठी त्या पद्धतीची ही ओळख..

घनकचरा व्यवस्थापनाची दोन ‘व्यवस्थापन प्रारूपे’ (management models) आपणा सर्वाना परिचित आहेत. पहिले म्हणजे केंद्रीय पद्धती व दुसरे म्हणजे विकेंद्रित पद्धती. अमकी प्रणाली सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ ठरवण्यासाठी ही चर्चा नाही. खरे तर प्रश्नाचे र्सवकष उत्तर देण्यासाठी दोन्ही प्रारूपे वापरावे लागतील. जगभर हेच करतात. दूरदूरवर उपनगरांचा फैलाव झाल्यावर रोजच्या रोज कचऱ्याचे संकलन व परिवहन सुमारे अशक्य असते. जिद्दीने कुणी करावे म्हटले तर प्रचंड खर्चीक व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उभे करता करता दमछाक करणारे बनते. तेव्हा शक्य तिथे विकेंद्रित व नसेल तिथे केंद्रीय पद्धत अवलंबून कार्यभाग साधला जातो. जागरूक रहिवासी संघ घराच्या आत, टेरेसवर, घर-गल्ल्यांमध्ये, झाडाच्या बुंध्याशेजारी, पदपथाचा कोपरा वापरून, सोसायटीच्या तळघरात, छतावर, आवारात.. अक्षरश: जमेल तिथे स्वयंपाकघरातला कुजण्यायोग्य कचरा घरातच वेगळा करून कुजणारा कचरा सेंद्रिय पद्धतीने कुजवण्यासाठीच्या संयंत्रात टाकला जातो.

अशी संयंत्रे (composters) साधी म्हणजे उदाहरणार्थ अगदी बांबूची दुर्डी किंवा वेताची परडीही असू शकतात. फळाची जाळीदार परडी व त्यावर झाकण, आत मच्छरदाणीचे कापड सर्व बाजूंना शिवलेले व बुडाला वाळलेली पाने, पाचोळा व नारळाच्या काथ्या अंथरून कुजवण्याची प्रक्रिया सुरू करता येते. अनेक कुटुंबांमध्ये घरातला कुजण्याजोगा कचरा त्यात टाकून सेंद्रिय खत निर्माण केले जाते. दहा लिटर आकाराची जाळीदार प्लास्टिक किंवा बांबूपासून बनवलेली परडी किंवा बकेट अगदी बैठकीतही ठेवले तरी त्यांचा वास येत नाही किंवा चिलटे-डास होत नाहीत. दोनशे रुपये फार तर त्यावर खर्च होतात व कुजणाऱ्या कचऱ्याचे सेंद्रिय खत बनवून कुंडय़ांना किंवा परसबागेत बिनबोभाट उपयोगात आणता येते. पारंपरिक कॉम्पोस्टिंगऐवजी जर बास्केटमध्ये गांडुळखत मिसळले तर मोठी अद्भुत गोष्ट घडते. आठ-दहा गांडुळांचे २० दिवसांत ३०-४० गांडुळे बनतात. पुढे तीन महिन्यांत एक सशक्त स्वनियंत्रित नैसर्गिक परिसंस्थात बास्केटमध्ये उदयाला येते. दोन-चारशे गांडुळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदून रोज टाकलेले उष्टे, खरकटे, भाजीचा चोथा, मुळ्या, देठ व साली बारीक (कापून टाकल्यास) उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार करतात. त्याला व्हर्मी कॉम्पोस्ट म्हणतात. बाजारात या खताला प्रचंड मागणी आहे.

ऑगस्ट रोदँ या फ्रेंच शिल्पकाराने १९०२ मध्ये घडवलेला ‘द थिंकर’ हा चिंतनशील मानव एकविसाव्या शतकात अवतरला तर चक्कएखाद्या कॉपोस्टिंग बास्केटवर बसून विचारमग्न बनेल व स्वत:शीच आश्चर्य व्यक्त करील व विचारेल, ‘‘आजपर्यंत इतक्या साध्या पद्धतीचा उपयोग का केला गेला नसेल?’’

घरगुती धर्तीवर बास्केट पुरेसे होते. इमारत, हॉस्टेल, हॉटेल, शाळा, ऑफिस किंवा सोसायटी व कॉलनी या पातळीवर जागच्या जागी वर्गीकरण केलेल्या कचऱ्यातील ओला कुजण्यायोग्य कचरा प्रथम सेंद्रिय खत बनवणाऱ्या संयंत्रापर्यंत आणून मगच प्रक्रिया करता येते. एका अर्थी म्हटले तर केंद्रित व म्हटले तर मोहल्ला वा इमारत वा सोसायटी वा कॉलनीपुरतीच व्यवस्था निर्माण केल्यामुळे विकेंद्रित प्रणालीचा अवलंब केला असेच म्हणता येईल. संकलित ओला कुजवण्याजोगा कचरा वापरून एक तर बायोगॅस संयंत्र वापरता येईल. अन्यथा साधे सेंद्रिय खत (पारंपरिक पद्धत वापरून) किंवा व्हर्मी कॉम्पोस्ट करता येईल.

सेंद्रिय खतनिर्मितीमागचे विज्ञान व तंत्रज्ञान

प्रा. अजय कळमधाड यांनी सिव्हिल इंजिनीयिरग विभागात, आयआयटी  गुवाहाटीमध्ये गेल्या दहा वर्षांत सेंद्रिय खतनिर्मितीचे विज्ञान व तंत्रज्ञान यात अफाट काम केले आहे. त्यांना विचारले की, सेंद्रिय खतनिर्मितीचे वर्म कशात आहे? लगेच म्हणाले की, पाच गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागते.

(१) कचरा कुटून पूड करून टाकणे, (२) ओलेपणावर नियंत्रण ठेवणे, (३) फार ओलसर कचरा वाटल्यास त्यात लाकडाचा भुसा, पानांचा पाचोळा किंवा असेच काही मिसळून थबथबलेले पाणी आटोक्यात आणणे, (४) जितके जमेल तितक्या चटकन कुजवण्याजोगा कचरा कॉम्पोस्टिंग किंवा व्हर्मी कॉम्पोस्टिंग संयंत्रात जमा करणे व जैव-रासायनिक प्रक्रिया सुरू करून देणे अत्यावश्यक आहे आणि (५) जितके जमेल तितके जैव-रासायनिक प्रक्रियेत तापमान वाढेल तितके चांगले होईल. सतत २-३ दिवस जर ५० ते ६० डिग्री सेल्सियस तापमान राखले तर घनकचऱ्यातील घातक जिवाणू नष्ट करायला ते साहाय्य करील.

प्रा. कळमधाड सांगतात की, किमान २० दिवस प्रक्रिया करूनच स्थिर घटकांचे सेंद्रिय खत बनेल. मात्र कुजवण्याजोगा कचरा, शेणखत किंवा कॉम्पोस्ट खत व लाकडाचा भुसा व इतर बायोमास यांचे गुणोत्तर ६:३:२ (वजनाच्या प्रमाणात) असावे. त्यातही जर गोल फिरणाऱ्या आडव्या ड्रमामध्ये ही प्रक्रियाकेली तर लवकर व तुलनेने उच्च प्रकारचे खत तयार होते. असे वाटेल की इतके शेण किंवा सेंद्रिय खताचे कल्चर कसे उपलब्ध व्हावे? त्याचप्रमाणे इतका पाचोळा किंवा भुसा कसा मिळावा? बहुतेक ठिकाणी बगिचा, शेती व मळे व वाया जाणारे घन लाकूडसदृश कचरा मिळवून तो वापरता येईल. आज ते अवघड जाते आहे, कारण तसे संकलन व भुकटी करण्याचा उद्योग सुरू झालेला नाही. एकदा तो झाला की तशा गोष्टी सहजतेने उपलब्ध होतील. भारतात बऱ्याच ठिकाणी शेतकरी पुरेशा चांगल्या पद्धतीने शेतीतून तयार होणारे बायोमास तसेच फेकून देत असल्यामुळे आग लागून धोका होत आहे. संपूर्ण सोसायटीचा अथवा कॉलनीचा कुजण्यायोग्य घनकचरा व बगिच्यामधला कचरा कामात आणायला साधारण एका मोठय़ा रेफ्रिजरेटर किंवा दोन शेजारी ठेवलेल्या धुलाई यंत्राएवढय़ा आकाराचे संयंत्र पुरते. तशी यंत्रे आज सहज उपलब्ध होऊ शकतात.

शेवटी एक प्रश्न शिल्लक राहतो. कचऱ्याचे वर्गीकरण जागच्या जागीच करून आपण फक्त ओला कुजण्यायोग्य कचऱ्याचीच जर विल्हेवाट लावली तर प्रश्न कुठे सुटला? तेव्हा थोडे आकडे व डोंगरांचे आकार समजावून घेऊ या. भारतात २०११च्या जनगणनेनुसार अदमासे ८,००० नागरी केंद्रे आहेत. यात पाच हजार वस्तीचे छोटेसे नगरही आले व दोन कोटी किंवा एक-सव्वा कोटी वस्तीची मुंबई व दिल्लीसारखी महानगरेही आली. या सगळ्याला आपण शहरी भाग म्हणू या. शहरी भागात सुमारे ४० कोटी लोक राहतात. त्यांनी निर्माण केलेला ४०० ते ४५० ग्रॅम घनकचरा दररोज पाहिला तर तो दीड ते पावणेदोन लाख टन होईल. त्यातला सुमारे ४० ते ५० टक्के कचरा कुजण्यासारखा असतो. म्हणजे भारतभर आपण फक्त ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली तर सुमारे ६५ हजार टन कचऱ्याचा प्रश्न सुटला म्हणता येईल. हे नसे थोडके?

लेखक आयआयटी-मुंबई येथील ‘पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रा’त प्राध्यापक आहेत.

ईमेल : asolekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 3:57 am

Web Title: management models of solid waste
Next Stories
1 कचरा कुजतो, इंधन देतो!
2 काय हवे?.. धूर की ऊर्जा?
3 घनकचऱ्यातून कशाकडे?
Just Now!
X