मुलांना शिस्त तर लावायची होती, परंतु आकडे न मोजता, सतत गप्प बसा, गप्प बसा न सांगता किंवा कधीही टिपेच्या आवाजात न ओरडता ते करायचं होतं, त्यासाठी मला उपयोगी पडली, रागाची खुर्ची. मला जी जमली नव्हती, ती शिस्त तिनं मुलांना लावली होती.

मुलांना रूढार्थाने ‘शिस्त लावणं’ मला कधीच जमलं नाही. शिस्त म्हणजे हाताची घडी, तोंडावर बोट. वर्गात सारं कसं शांत शांत. मी खुर्चीत बसून बोलत आहे आणि मुलं निमूटपणे ऐकत आहेत असं कधीच व्हायचं नाही. वर्गात मस्त गडबड गोंधळ चालू असायचा. मुलांकडे डोळे कितीही मोठे करून पाहा किंवा डोळ्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहा, कोणत्याही दटावणीचा काही उपयोग व्हायचा नाही. ठक् ठक् ठक्.. टेबलावर पट्टी आपटण्याचा जोरदार आवाज किंवा ‘गप्प बसा!’, ‘आवाज एकदम बंद!’ असा टिपेच्या आवाजात आदेश आणि मग घाबरून एकदम चिडिचूप बसणं, हे मला स्वत:लाच आवडणारं नव्हतं आणि नाही. वर्गात चिवचिवाट, कलकलाट तर हवाच. म्हणून मग इतरांच्या दृष्टीने मी आणि माझी मुलं ‘बेशिस्त!’. अर्थात मला आणि त्यांना त्यामुळे काही फरक पडत नव्हता, पण कुठल्याही क्रियाकृती करताना किंवा करवून घेताना वर्गात थोडं गोंधळाचं वातावरण असायचं. मुलांचे लक्ष वेधून घेण्यात कधी कधी खूप वेळ जायचा. या वयोगटातल्या मुलांवर एका विशिष्ट पद्धतीनं काम करावं लागतं याची जाणीव मला आहे. मोठय़ा आवाजात एक ते दहा आकडे मोजायचे आणि दहा म्हणून संपायच्या आत मुलांनी खाली बसायचं, हा उपाय माहीत होता. पण सारखी सारखी आकडय़ांची मोजणी मला स्वत:लाच कंटाळवाणी वाटायची. वर्गात शांतता प्रस्थापित करण्याचा दुसरा काही तरी उपाय माझ्यापुरता तरी शोधणं गरजेचं होतं.
फेब्रवारी २००८ मध्ये पुण्याच्या गरवारे बालभवनच्या शिक्षक प्रशिक्षणासाठी मी गेले होते. तेव्हाची गोष्ट. ही आमची ‘रागाची खुर्ची’ गरवारे बालभवनच्या संचालिका शोभाताई भागवत सांगत होत्या. मुलांना राग आला की ती या खुर्चीत जाऊन बसतात. राग गेला की त्या खुर्चीतून उठून परत खेळायला लागतात. स्वत:ला राग आला आहे हे ओळखून तो विशिष्ट पद्धतीने व्यक्त करायचा अशी ही कल्पना. त्यामुळे मुलं रागावर ताबा मिळवण्यास आपोआप शिकत होती. तसंच आपला राग व्यक्त करताना आक्रस्ताळेपणा करावा लागत नाही. शांतपणेही तो व्यक्त करता येतो हेही समजून घेत होती. किती तरी गोष्टी या एका रागाच्या खुर्चीमुळे मुलांमधे झिरपत होत्या. ‘रागाची खुर्ची’ ही कल्पना माझ्या डोक्यात एकदम फिट्ट बसली. याचा आपल्याला नेमका कसा आणि कुठे बरं उपयोग करता येईल अशी चकं्र डोक्यात फिरू लागली. खरं सांगायचं तर अशा प्रकारच्या अनेक कल्पना आपल्याभोवती तरळत असतात. आपण जरा डोळसपणे वावरलो तर सहज आपल्या आवाक्यात येतात. प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी वेगळं नक्कीच असतं. आपल्याला फक्त ते आपल्यासाठी उचलून घेता यायला हवं आणि त्याचा उपयोग करून घेता यायला हवा. या अशा कल्पना आपल्याला ‘भेटल्या’ की, त्यांचं आपल्या वर्गाशी आपल्याला ‘नातं’ जोडता यायला हवं.
एक दिवस वर्गावरून जात होते. माझी खुर्ची समोर दिसली आणि रागाच्या खुर्चीची आठवण आली आणि अचानक असं वाटलं की, ही खुर्ची मुलांच्या रागाची खुर्ची न करता आपल्याच रागाची खुर्ची केली तर! वर्गात मी सहसा खुर्चीवर बसत नाही. नेहमी मुलांच्यातच किंवा फारतर छोटं स्टूल घेऊन त्यांच्याजवळच बसते. मी खुर्चीत बसले आहे हे बघण्याची मुलांना सवयच नव्हती. सकाळची प्रार्थना, श्लोक, हजेरी आणि वर्गातले सगळे खेळ त्यांच्यामध्ये बसूनच होत असत. रागाच्या खुर्चीची माझी कल्पना घेऊन मी वर्गात आले. मुलांना जवळ बोलावलं आणि माझ्या खुर्चीकडे बोट दाखवून म्हटलं, ‘‘हे काय आहे?’’ एकमुखाने उत्तर आलं, ‘‘खुर्ची.’’ मी म्हटलं, ‘‘एकदम बरोबर!’’ मग विचारलं, ‘‘तुम्ही कधी मला या खुर्चीत बसलेलं बघितलं आहे का रे?’’ ‘‘नाही.’’ मुलांचा कोरस. मग म्हटलं, ‘‘मी त्या खुर्चीत का बसत नाही हे माहीत आहे का? कारण ही माझी रागाची खुर्ची आहे. मला राग आला नं की मी या खुर्चीत जाऊन बसते.’’ बाई काही तरी नवीन सांगत आहेत हे त्यांना समजलं. पुढे त्यांना समजावत म्हटलं, ‘‘आताच बघा, मी तुम्हाला इथे काही तरी वेगळं सांगतेय तर तिकडे सोहम आणि ओम मस्त मारामारी करताहेत. तनिष्का, अंजली, मनाली आणि वेदिका गप्पा मारताहेत, हर्षल, वेदांग, निहार वर्गात इकडेतिकडे फिरत आहेत. स्वरांगी बांगडय़ांशी खेळतेय, सई सतत मध्ये मध्ये वेगळंच काही तरी बोलतेय, निवेदिता सारखी सगळ्यांची नावं सांगत आहे. फक्त आपला तन्मय आणि अनुष्का माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकताहेत. बाकी कोण्णाकोणाचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही आणि नसतं. हे आपल्या वर्गात नेहमीच होतं. मी काही तरी खेळ आणते किंवा मला काही तरी गंमत करायची असते, पण तुम्ही सारखी मस्ती करता नाही तर तुमचं काही तरी वेगळंच चालू असतं. मग माझा सगळा वेळ तुम्हाला गप्प करण्यात जातो आणि नीट खेळ घेता येत नाहीत किंवा गंमत करता येत नाही. तेव्हा मला तुमचा राग आलेला असतो. पण तुम्ही लहान आहात म्हणून मी काही बोलत नाही.’’ प्रकरण काही तरी वेगळं आहे, मुलांना जाणवलं.
‘‘आजपासून ही ‘रागाची खुर्ची’ मला मदत करणार आहे. तुम्ही माझं ऐकलं नाहीत आणि मला तुमचा राग आला की मी या खुर्चीत जाऊन बसणार. मग वर्गात मी तुमच्याशी बोलणार नाही की हसणार नाही. काही खेळ घेणार नाही. काही करणार नाही. फक्त या खुर्चीत बसून राहाणार. बाई खुर्चीत बसलेल्या दिसल्या की समजायचं की बाई रागावल्या आहेत. जो पर्यंत तुम्ही शांत बसत नाहीत, तोपर्यंत मी खुर्चीतून उठणार नाही. आपल्या वर्गात गोष्ट, गाणं, खेळ, गंमत काहीही होणार नाही. जे काही चालू असेल ते एकदम बंद होईल.’’ माझ्याकडून मी मुलांना ‘रागाच्या खुर्ची’ची वर्गातील ‘भूमिका’ काय आहे हे सांगितलं.
दुसऱ्या दिवशी वर्गात छान खेळ सुरू होता. नेहमीप्रमाणे दोन चार डोकी मस्ती करत होती आणि बाकीचे गडबड करायला लागले. मी खेळ घेण्याचं बंद केलं आणि जाऊन तोंडावर बोट ठेवून खुर्चीत बसले. थोडा वेळ कोणाच्याच लक्षात आलं नाही. तेवढय़ात ओमनं विचारलं, ‘‘बाई, मी बॉल घेऊ.’’ मी म्हटलं, ‘‘आता खेळ बंद झाला आहे. मी रागाच्या खुर्चीत बसले आहे. तुम्ही सगळे शांत बसलात, तर खेळ पुन्हा चालू होईल.’’ मला असं खुर्चीत बसलेलं पाहून थोडय़ाच वेळात मुलं थोडी शांत बसली. त्याक्षणी वेळ न दवडता, काहीही न बोलता मी उठले आणि पूर्वीप्रमाणे खेळ सुरू केला. प्रत्येक वेळी गडबड वाढली की खेळ बंद करून मी खुर्चीत बसत होते. आता रोज अशा प्रकारे त्यांच्या लक्षात आणून दिलं की एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे त्यांचा गोंधळ गेला, तर वर्गात चाललेली कुठलीही क्रियाकृती तिथल्या तिथे थांबवून मी खुर्चीत जाऊन स्वस्थ बसते. दोन-तीन आठवडय़ांत माझ्या ‘रागाच्या खुर्ची’चा परिणाम मुलांवर दिसायला लागला. बाई या खुर्चीत बसल्या की आपल्या वर्गात आपल्याला काहीच करायला मिळत नाही आणि आपण शांत झालो की परत सगळं पूर्ववत होतं, हे त्यांच्या लक्षात यायला लागलं. कधी कधी मी खुर्चीत बसायला जाण्यापूर्वी वर्गातल्या ठमाकाकूंना मुद्दामच सांगत असे की सगळ्यांना सांगा, ‘‘बाई रागाच्या खुर्चीत बसायला चालल्या आहेत. आता आपल्याला वर्गात काहीही करायला मिळणार नाही. आपण सगळे गप्प बसू या. म्हणजे खेळता येईल.’’ त्याचाही अपेक्षित परिणाम दिसू लागला. अशा ठमाकाकू वर्गात तीन-चार असतातच. त्या बरोबर सगळ्यांना सांगायच्या आणि बाई रागाच्या खुर्चीत बसल्या आहेत, याकडे सर्वाचं लक्ष वेधून घ्यायच्या. काही दिवसांनी मी खुर्चीच्या दिशेने जाऊ लागले तरी मुलं आपापसात एकमेकांना गप्प करू लागली आणि माझे हात ओढून ओढून मला त्यांच्यात बसवून घ्यायची. आकडे न मोजता, सतत गप्प बसा गप्प बसा न सांगता किंवा कधीही टिपेच्या आवाजात न ओरडता माझ्या ‘रागाच्या खुर्ची’ने माझ्या बाळांना, मला जमली नव्हती, ती शिस्त लावली होती.
पण यामुळे मला मात्र वर्गात इतर वेळी कधीच खुर्चीत बसायचं नाही हे पथ्य पाळावं लागायचं. एकदा मला तातडीनं काही काम करून द्यायचं होतं, म्हणून मी ऑफिसमधून येऊन वर्गात खुर्चीत बसले. मी कामात मग्न असल्यानं मी ‘रागाच्या खुर्ची’बद्दल विसरून गेले होते. पण थोडय़ा वेळाने एका ठमाकाकूने येऊन विचारलं, ‘‘बाई, तुम्ही रागाच्या खुर्चीत का बसला आहात? तुम्हाला राग आला आहे का?’’ एकदम लक्षात आलं, बापरे, आता सहज खुर्चीत कधीच बसता येणार नाही. खुर्चीतून पटकन् उठून, उभं राहून काम पूर्ण केलं. वर्गात मला खुर्चीत बसायला कधी आवडत नव्हतंच, पण तेव्हापासून वर्गातील खुर्ची सहज म्हणून बसायलाही एकदम वज्र्य केली.
ratibhosekar@ymail.com

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Can you feed ducks bread
तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा