19 January 2019

News Flash

नाटय़ प्रशिक्षणानं दिला पुनर्जन्म

तुमची इच्छा असो वा नसो!

आयुष्याच्या उत्तरार्धात प्रत्येक जण आपल्या जीवनाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. कधी व्यक्तपणे, तर कधी अव्यक्तपणे. हा एक प्रकारे आत्मसंवाद असतो, तर दुसऱ्या दृष्टीत आत्मशोध असतो; पण हा आत्मशोध आणि आत्मसंवाद स्वांत सुखाय असतो. बाहेरचा संवाद तुलनेनं कमी झाल्यामुळे असेल कदाचित, पण हे घडतं. तुमची इच्छा असो वा नसो!

काही गोष्टी अशा असतात की, ज्यांचा उल्लेख लौकिकदृष्टय़ा करणं थोडंसं साहजिक असतं. त्यात नको तेवढा भाबडेपणा तरी येतो किंवा आत्मश्लाघा तरी येण्याचं भय असतं. बरं याची कुठली परिमाणं किंवा काही नियम नसतात. तो असतो आत्मसंवाद म्हणून त्याचे नियम हे ज्याचे त्यानेच ठरवलेले असतात. या नियमांना बैठक आणि आधार असतो त्या व्यक्तीच्या जीवनानुभवाचा. जीवनानुभव जो त्यानं केलेल्या छोटय़ामोठय़ा कामांतून त्यानं मिळवलेला असतो. तो असतो त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा, त्यानं घेतलेल्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा, त्याला भेटलेल्या लोकांचा. त्याच्या यशापयशाचा, त्याच्यावर झालेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आघातांचा, त्यातून सावरण्याचा, त्या अनुभवातून शिकण्याचा, स्वत:ला बदलण्याचा आणि पुन्हा नव्यानं उभं ठाकण्याचा, नव्या जोमानं काम करण्याचा, त्यात आलेल्या यशाचा, गौरवाचा, कीर्तीचा आणि लौकिकाचा.

व्यक्तिश: मला नाटय़ क्षेत्र आणि कला प्रशासनात राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक ठिकाणी विपरीत परिस्थितीत, दिलेल्या चौकटीत राहून काम करावं लागलं. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वेळा मी या चौकटींच्या कार्यकक्षा रुंदावल्या, तर काही ठिकाणी झुगारून नव्या निर्माण केल्या. यात माझा प्रशासकीय आणि कलात्मक पुढाकार असला तरी ती त्या त्या क्षेत्राची, त्या क्षेत्रातील लाभार्थीची निकड होती आणि गरज होती. हे लाभार्थी प्रत्येक संस्थेच्या संविधानानुसार आणि उद्दिष्टानुसार बदलत गेले. दिल्ली येथील राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात अभिनय आणि दिग्दर्शन करणारे विद्यार्थी होते, तर मुंबई मराठी साहित्य संघात महाराष्ट्रातील पहिल्या नाटय़ाभ्यास प्रशिक्षण उपक्रमाचे ‘अमृत नाटय़ भारती’(अनाभा)चे प्रशिक्षणार्थी होते. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील पहिल्या महत्त्वाकांक्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी होते. हे ‘अनाभा’मधील कॉलेजातील विद्यार्थ्यांसारखे नवखे शिकाऊ नव्हते, तर वयानं, अनुभवानं थोडे अधिक परिपक्व होते. यानंतर मुंबईच्या इंडियन नॅशनल थिएटरच्या बहुभाषी प्रवीण जोशी अकादमी ऑफ थिएटर आर्टसमध्ये वरील दोन संस्थांपेक्षा वेगळ्या वयोगटाचे आणि वेगळ्या रंगमंचीय अनुभवाचे प्रशिक्षणार्थी होते. शिवाय हे हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतील होते. या चार संस्थांच्या आपल्या घटना वेगळ्या होत्या, कार्यप्रणाली वेगळी होती, प्रशासकीय चौकटी वेगळ्या होत्या. व्यक्तिश: मला माझा प्रशिक्षण देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवायचा होता. प्रशिक्षणार्थीना नाटय़ प्रशिक्षण त्यांच्या पातळीवर जाऊन द्यायचं होतं.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालय ही दिल्लीच्या केंद्रीय संगीत नाटक अकादमीची उपशाखा, नाटय़ प्रशिक्षण देणारी अकादमीची स्थापना केंद्र शासनाच्या ऑर्डिनन्सनुसार झालेली. राष्ट्रीय नाटय़विद्यालय सुरुवातीची काही वर्ष जरी संगीत नाटक अकादमीची उपशाखा म्हणून कार्यरत असली तरी संस्थेच्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे इब्राहिम अल्काझींसारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा दिग्दर्शक, दूरदर्शी कला प्रशासक आणि अजोड नाटय़कला शिक्षक संचालकपदी असल्यानं या संस्थेतील करडी शिस्त, प्रथम श्रेणीचं नाटय़ प्रशिक्षण आणि भारतीय रंगभूमीवर योजन स्तंभ म्हणून गाजलेली जागतिक दर्जाची नाटकं यामुळे ही संस्था भारतातील अग्रगण्य नाटय़संस्था म्हणून गाजली. यात माझ्या काळातील ‘एडिपस रेक्स’, ‘अंधायुग’, ‘कंजूस’, ‘तुघलख’, ‘द फादर’, ‘जसमा ओढन’, ‘हिरो’ आणि एकमेव मराठी नाटक ‘ज्योत्स्ना आणि ज्योती’, ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘किंग लीयर’, ‘ट्रोजन विमेन’ या नाटकांचा समावेश होता. जागतिक नाटय़ महोत्सवात १९ देशांच्या ३७ नाटकांच्या राष्ट्रीय नाटय़ महोत्सवात ‘किंग लीयर’ या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा सन्मान मिळाला. त्या काळी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात पदविका अभ्यासक्रम राबवला जायचा. मात्र माझ्याच अध्यक्षतेखाली केंद्र शासनाने नेमलेल्या समितीनं ‘भारतातील सर्वोच्च नाटय़ अभ्यासक्रम’ म्हणून त्याला मान्यता दिली आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरची मान्यताही दिली होती. राष्ट्रीय नाटय़ विद्यालय प्रतिवर्षी भारतभरातून आलेल्या इच्छुकांमधून केवळ २० प्रशिक्षणार्थीची निवड करतं आणि त्यांना शिष्यवृत्ती देतं. तीन वर्षांची अभ्यासासाठी प्रत्येकाला शिष्यवृत्ती देणारी ही भारतातील एकमेव संस्था. प्रति वर्षी तीन-चार विविध शैलींमधील संपूर्ण नाटकं, नाटकांचे देशविदेशात दौरे, राष्ट्रीय नाटय़ महोत्सव असं अष्टोप्रहर नाटक. नाटक आणि नाटक!

औरंगाबाद जिल्ह्य़ातील एका छोटय़ा खेडेगावातून आलेला माझ्यासारखा बुजरा विद्यार्थी या विद्यालयात निवडला जातो, रंगभूमीचा फारसा अनुभव नसताना प्रशिक्षण घेतो, क्रमाक्रमानं जेमतेम पास ते तिसऱ्या वर्षांला सर्व विषयांत प्रथम क्रमांक, बेस्ट ऑल राऊंडर आणि भरत पुरस्कार विजेता म्हणून ठरतो. हा केवळ एक चमत्कार होता. एका सामान्य विद्यार्थ्यांचा पुनर्जन्म होता. माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातील हे सर्वात मोठं श्रेयस होतं. याचं फार मोठं श्रेय अल्काझींसारख्या थोर शिक्षकाला जातं. त्यांनी जाणीवपूर्वक मला घडवण्याचा प्रयत्न केला. मराठवाडय़ासारख्या मागास भागातून आलेल्या, इंग्रजी भाषेचं भय बाळगणाऱ्या तरुणाला भाषेचे, व्यक्तिमत्त्वाचे करडे संस्कार त्यांनी दिले आणि नाटय़ाभ्यास शिकवला. त्यांनी न जाणो माझ्यात नेमकं काय बघितलं आणि मला एखाद्या शिल्पकारासारखं घडवण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शनाचा विद्यार्थी असून मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या साऱ्या नाटकांत असायचो. व्यवस्थापनात सर्वाच्या पुढे असायचो. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात एकही दिवस रजा न घेणारा, एकही दिवस उशिरा न येणारा मी एकमेव विद्यार्थी होतो. मी तनमन आणि साऱ्या क्षमतांनिशी नाटय़ाभ्यासाला वाहून घेतलं होतं. माझ्या व्यक्तिमत्त्वातील उणिवांवर मी कटाक्षानं काम करीत राहिलो. याच दृष्टीनं सोबतचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि सामान्य लोक यांचंही अधाशासारखं निरीक्षण करायला लागलो, त्याचे अन्वय लावायला लागलो, प्रत्येक गोष्टीत व्यक्त, अव्यक्त, सुप्त असं नाटय़ शोधायला लागलो. लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचायला लागलो. अगदी सुरुवातीला काहीही कळत नव्हतं; पण हळूहळू सरावानं कळायला लागले. अ‍ॅकॅडमिक शिस्तीचा गंधही नसलेल्या विद्यार्थ्यांला अवघडच गेलं. समर्थनाची भावना सच्ची असेल तर असाध्यही साध्य होतं म्हणतात. राष्ट्रीय नाटय़विद्यालयाच्या त्या मंतरलेल्या दिवसांचं माहात्म्य माझ्यासाठी ईश्वर साक्षात्कारापेक्षा यत्किंचितही कमी नव्हतं. आजही कधी मरगळ आली तर त्या दिवसांच्या साध्या आठवणींनीही ती मरगळ दूर होते. पुन्हा कामाचा हुरूप वाढतो.

अल्काझींच्या नि:स्पृह सेवावृत्तीचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. कलात्मक प्रशिक्षणाबरोबरच मी संस्थेचा प्रिफेक्ट म्हणूनसुद्धा काम करायचो. त्यामुळे अभ्यासक्रमाची वेळापत्रकं तयार करणे, वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रयोग लावणे, प्रवास-निवास, प्रयोग व्यवस्था ही माझी जबाबदारी असायची. संस्थेतील प्राध्यापक चेष्टेनं म्हणायचे, ‘‘सोनटक्के अल्काझी साहब के नामपर एक एनएसडी चला रहा है।’’ मात्र मला त्यांचा कुठलाही त्रास झाला नाही. दु:स्वास असला तरी तो माझ्यापर्यंत कधीच पोचला नाही.

मात्र मला दिल्लीतील स्थैर्य बोचायला लागलं. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात एक शिक्षक आणि रंगमंडळाचा मी सदस्य म्हणून काम करीत स्थिरस्थावर होत होतो. ‘जसमा ओढन’, ‘ज्योत्स्ना आणि ज्योती’ तसंच मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कादंबरीवरील ‘होरी’ या नाटकाच्या दिग्दर्शनानं मला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. ‘खामोश अदालत जारी है’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘कालाय तस्मै नम:!’ या नाटकांच्या अनुवादानं दिल्ली आणि उत्तर भारतात माझ्याविषयी बोललं जात होतं. दिल्लीतील ५-६ नाटकांची प्रकाश योजना आणि नेपथ्य रचनेमुळे दिल्लीतील साऱ्या नाटय़संस्थांचा मी आधार झालो होतो; पण का कोण जाणं या स्थिरतेनं मी अस्वस्थ होत होतो. सुट्टय़ांमध्ये चंदिगड, आग्रा, कोलकाता येथील १५ दिवसांच्या नाटय़ शिबिरात मला नव्या पिढीवर जोडलं जाण्याचा, नवी ऊर्जा बघण्याचा अनुभव मिळत होता. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील शिकवणं मला याच्या तुलनेत अधिक सुरक्षिततेमुळे स्थितिशील वाटायला लागलं होतं. मला नव्या ऊर्जेबरोबर काम करण्याचा ध्यास लागला होता.

याच काळात दोन पाहुण्यांना राष्ट्रीय नाटय़ विद्यालय दाखवून मी अल्काझी साहेबांच्या दालनात सोडलं. परदेशी वकिलातील पाहुणे, भारतीय नाटक, चित्रपट, चित्रकला क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांना स्कूल दाखवण्याची जबादारी माझी होती. त्यांनी अल्काझींना विनंती केली, की या तुमच्या तरुण सहकाऱ्यासारखा नाटय़ शिक्षक आम्हाला द्या. आम्ही मुंबईत नाटय़ शिक्षण अभ्यासक्रम सुरू करू इच्छितो. मात्र त्याला मराठी भाषा यायला हवी. अल्काझींना आश्चर्य वाटलं. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्यांच्या अस्सल मराठी ढंगात विचारलं, ‘‘सोन, या लोकांना ओळखलं नाही?’’ मी नकार दिल्यावर त्यांनी ओळख करून दिली, हे शिक्षण आणि अर्थमंत्री मधुकरराव चौधरी आणि हे बापूराव नाईक, त्यांनाही मी मराठी असल्याचं आश्चर्य वाटलं. त्यांनी मुंबईला येणार का म्हणून विचारलं. अल्काझींनी ‘‘व्हाय नॉट, इफ ही विशेस सो, ही मे गो.’’ झालं.. मला मुंबईला बोलावलं गेलं आणि साहित्य संघात १५-१५ दिवसांची नाटय़ शिबिरं वगैरे घ्यावीत असा प्रस्ताव दिला. मी निक्षून सांगितलं की, किमान दोन वर्षांचा सायंकालीन ६-९ असा अभ्यासक्रम राबवायला आवडेल. बापूराव नाईक, वा. रा. ढवळे आणि दामू केंकरे यांच्याव्यतिरिक्त साहित्य संघातील त्या काळातील कर्त्यांधर्त्यांना या साऱ्यांत काहीही स्वारस्य नव्हतं. उलट त्यांचा होरा होता की, हे काही चालणार नाही. आपोआप बंद पडेल.

फारसा गाजावाजा न करता जूनपासून नियमित वर्ग सुरू झाले. निवडक २०-२२ तरुण-तरुणी कमलाकर सोनटक्के यांच्या करडय़ा शिस्तीत नाटय़ साहित्य, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि प्रत्यक्ष नाटय़प्रयोग करत होती. आलेली तरुण मुलं देहभान विसरून शिकत होती. ‘इंद्रजितवध’ (दशावतार), ‘डॅडी’, ‘अंधेर नगरी चौपट राजा’, ‘सुनो जनमेजय’ ही नाटकं पहिल्या वर्षी सादर झाली. प्रत्येक नाटकाचे शनिवार-रविवार असे चार चार प्रयोग. अभिनयापासून रंगभूषेपर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या विद्यार्थी सांभाळायचे. गडी माणूस, तंत्रज्ञ कुणीही नाही. रंगकामापासून सेट लावणे, काढणे सारं विद्यार्थी करायचे. मुली शिडय़ांवर चढून लाइट्स अ‍ॅडजस्ट करून प्रकाश योजना करीत; दुसऱ्या दिवशी प्रमुख भूमिकेत, तर तिसऱ्या दिवशी व्यवस्थापनात. मोजके १२५-१५० प्रेक्षक, माधव मनोहर, वा. य. गाडगीळ, राजा कारळे, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यासारखे समीक्षक आवर्जून नाटकाला येत. पुणे आणि बडोद्याहून लोक येत. सत्यदेव दुबे, अमरीश पुरी, सुनीला प्रधान, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, माधव वाटवे, सुहासिनी मुळगावकर, चिं. त्र्य. खानोलकर, शंकर घाणेकर, पुष्पा भावे, श्री. पु. भागवत अगत्यानं येऊन प्रयोगांची प्रशंसा करीत, मुलांचं कौतुक करीत. पुढील वर्षी ‘चक्र’, ‘दुमार’, ‘रंगपांचालिक’ ही तरल गीतीनाटय़, ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘मुद्राराक्षस’ ही मोठी नाटकं केली. ‘व्यावसायिक निर्मात्यांना चांगले नट मिळत नाहीत, ही ओरड आहे. त्यांनी जरा सोनटक्क्यांची नाटकं जाऊन बघावीत. सक्षम अभिनेत्यांची रांग त्यांना बघायला मिळेल,’ असं फर्मानच माधव मनोहरांनी ‘सोबत’मधल्या त्यांच्या स्तंभातून काढलं.

तशी ‘अनाभा’, ही एक-शिक्षकी शाळा होती. नाही म्हणायला दुसऱ्या वर्षी मुकुंद नाईक आठवडय़ाला दोन दिवस शिकवायला यायचे; पण बाकी सब कुछ कमलाकर सोनटक्के! पण या समृद्ध अनुभवानं माझ्या सडेतोड मूलगामी प्रशिक्षण पद्धतीवर शिक्कामोर्तब झालं. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाटय़शास्त्र विभागातही मी पदव्युत्तर सारे विषय शिकवणारा एकमेव शिक्षक. त्याला लोक कधी प्रेमानं, तर कधी उपहासानं ‘एक-शिक्षकी नाटय़ विद्यापीठ’ म्हणून संबोधित करायचे. केवळ कुलगुरू, कार्यकारिणीचे काही मोजके सदस्य वगळता बाकी कुणालाही या नाटय़शास्त्र विभागाबद्दल फारसं काही वाटायचं नाही. एक तर या विभागाचं काम बिनबोभाट चालायचं. जवळपास ९० टक्के उपस्थिती, चोख शिस्त, शनिवार आणि रविवारी चार-चार तासांचे वाढीव वर्ग. एकापेक्षा एक नाटय़ प्रयोग. इथं ‘अंधायुग’, ‘अंधेरनगरी चौपट राजा’, ‘भगवद अज्जू की यम’, ‘मध्यम व्यायोग’, ‘पिकलं पान हिरवं रान’ ही एकापेक्षा एक सरस नाटकं झाली. वर्ल्ड टुरिझम कॉन्फरन्स’, विश्वहिंदी दिवस, यूजीसीच्या प्रादेशिक परिषदेसाठी आणि आर्मीसाठी नाटकांचे प्रयोग व्हायचे. औरंगाबादला या गुणवत्तेचं काम बघून सर्वाना अचंबा वाटायचा.

पाच वर्ष हा विभाग चालवून मी सारी आठ पदं विद्यापीठं अनुदान मंडळाकडून दिल्लीहून मंजूर करून आणून दिली आणि औरंगाबाद सोडून मुंबईला आपलं कार्यक्षेत्र करण्याचं ठरवलं. हाती कुठलंही काम नसताना घेतलेली ही उडी घातक ही ठरू शकली असती. कारण आता मी एकटा नव्हतो. सोबत पत्नी आणि दोन मुली. मात्र माझी पत्नी कांचन स्वत: एक कलावंत असल्याने तिने विद्यापीठात विनावेतन शिकवण्यात जशी माझी मदत केली तसाच माझ्या निर्णयालाही तिनं पाठिंबा दिला. मुंबईत मी व्यावसायिक रंगभूमीवर ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’, ‘आनंदी गोपाळ’ या नाटकांचे दोन वर्षांत २५०-२६० प्रयोग केले आणि एनटीच्या आग्रहाखातर निमंत्रणावरून मी बहुभाषी प्रवीण अकादमी ऑफ थिएटर आर्टस सुरू केलं. आता काळ बदलला होता. बँकांच्या स्पर्धा, भवन्सच्या स्पर्धा, इप्टाच्या स्पर्धा यातून काम केलेल्या लोकांना प्रत्यक्ष नाटय़ प्रशिक्षणाची ओढ होती. माझ्या आतापर्यंतच्या प्रशिक्षणाच्या कामामुळे हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतला तरुणवर्ग या अभ्यासक्रमाकडे ओढला गेला. इथंही नाटकाचं सर्वागीण शिक्षण, नाटय़सिद्धांत आणि प्रात्यक्षिकं. तीन वर्षांत सहा मोठी नाटकं, १२-१४ नव्या जुन्या नाटिका विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पुढाकाराने सादर केल्या गेल्या. गुणात्मक प्रशिक्षणामुळे, करडय़ा शिस्तीमुळे रंगनेतृत्व करणाऱ्या या तिसऱ्या फळीला मार्गदर्शन करण्याचं भाग्य मला लाभलं. १२५-१३० प्रशिक्षितांपैकी ९० पेक्षा अधिक लोक नाटक, दूरचित्रवाणी, प्रसारमाध्यमात सन्मानानं आज पूर्णवेळ काम करीत आहेत. कलाक्षेत्राचं नेतृत्व करीत आहेत. ते मोठय़ा अभिमानाने सर्वंकष कला नेतृत्वाचा वारसा चालवत आहेत. स्वत:पेक्षा आपल्या कामावर निष्ठा ठेवून, ज्याच्यासाठी आपण काम करीत आहोत या लाभार्थीचं हित डोळ्यासमोर ठेवून!

पुढील काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचा संचालक, केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर, वरळीच्या नेहरू सेंटरचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इथंही माणसं घडवण्याचा, त्यांना सक्षम करण्याचा, त्यांच्या कामामुळे त्यांचं स्वभान जागं करून त्यांना आणि त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा वसा आणि व्यसन मात्र मी सोडलं नाही. माझ्या कामाच्या सुसाट वेगात माझ्या सहकाऱ्यांची थोडीफार ससेहोलपट झाली असेल, पण तशी तक्रार कुणीही केली नाही. या संस्थांमधली काही कामचुकार, अप्रामाणिक लोक हेरून मी त्यांना सुधारण्याची संधी दिली. काहींना त्यांच्या क्षमतेच्या संस्थेमध्ये जाऊन काम करण्यासाठी प्रवृत्त केली. तेही खंतावले नसतील असा माझा विश्वास आहे.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं माझा पिंड घडवला, मला कला प्रशिक्षणाची, नाटय़ प्रशिक्षणाची दिशा दाखवली, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा पाया समृद्ध केला. कुठेही कामासाठी मला अर्ज विनंत्या कराव्या लागल्या नाहीत. समोरून काम आलं त्यातल्या गुणवत्ता आणि शक्यता हेरून मी ते स्वीकारलं. कुठेही मी माझ्या आर्थिक अटी ठेवल्या नाहीत. जे मिळालं त्याचा सन्मानानं स्वीकार केला. याचं श्रेय माझ्या ग्रामीण संस्काराला, श्रद्धेय माळकरी संस्कृतीला, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील माझ्या निर्मळ, निर्भेळ, स्फटिकासारख्या नितळ, नि:स्वार्थ शिक्षण संस्काराला. तेच वाण मी प्रत्येक ठिकाणी वाटत गेलो, निरपेक्ष वृत्तीनं. यात माझी पत्नी कांचन सोनटक्के जिनं अपंगांच्या विकासाला सारं आयुष्य वाहून टाकलं आहे. तसंच माझ्या मानसी आणि मैथिली दोघी मुलींचा वाटा फार मोठा आहे. त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट तर सोडा, साधी अपेक्षाही व्यक्त केली नाही. यांची स्वभानाची आणि स्वाभिमानाची वृत्ती माझ्यापेक्षा किंचित अधिक परिपक्व आहे. त्यामुळे असेल त्यांची खंत माझ्यापर्यंत कधी पोहोचली नाही. शेवटी श्रेयस आणि प्रेयस व्यक्तीसापेक्ष असतं. त्याची अधिक उकल त्याच्या गूढतेला धक्का पोहोचवू शकते, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

प्रा. कमलाकर सोनटक्के

sonkakkekm@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 17, 2018 12:44 am

Web Title: amazing success story of kamlakar sontakke