निरनिराळे कवी-गीतकार, संगीतकार, गायक-गायिका, वाद्यमेळातील वादक, प्रगत ध्वनिमुद्रण पद्धती अशा अनेक कारणांमुळे भावगीत हे ‘बहरू कळियांसी आला’ अशा स्थितीत रसिकांसमोर येत राहिले. ध्वनिमुद्रिका कंपन्या आणि ‘आकाशवाणी’सारखे सशक्त माध्यम ही गाणी श्रोत्यांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याचे उदात्त काम करीत राहिले. भावगीत प्रांतात अभिरुची घडविण्याचे काम या माध्यमांनी आणि कलाकारांच्या मैफिलींनी केले. नव्या गीताचे स्वागत करणे व मनापासून दाद देणे हे सहज घडू लागले. भावगीतातील भावना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांशी मिळत्या-जुळत्या होऊ लागल्या. भावगीत हे ज्याच्या त्याच्या आठवणींशी निगडित झाले. असेच एक आठवणीतील गाणे.. संगीतकार यशवंत देव, सुरेल धारदार आवाजाच्या गायिका उषा मंगेशकर आणि कवी अनिल या त्रयीने निर्माण केलेले. ‘वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन..’ अशी या गीताची सुरुवात आहे.

कवी आत्माराम रावजी देशपांडे अर्थात ‘अनिल’ हे नाव उच्चारताक्षणी त्यांनी लिहिलेली व गाजलेली अनेक गाणी आठवतात : ‘केळीचे सुकले बाग..’, ‘थकले रे डोळे माझे..’, ‘बाई या पावसानं..’, ‘वाटेवर काटे वेचीत चाललो..’, ‘कुणी जाल का, सांगाल का..’, ‘अजुनी रुसूनी आहे..’, ‘आज अचानक गाठ पडें..’, ‘उघड दार प्रियकरास..’ अन् वर्षांनुवर्षे मनात घर करून राहिलेले- ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’ हे भावगीत. यातील काही गीते पं. कुमार गंधर्वानी स्वरबद्ध केली, काही जी. एन. जोशी यांनी, तर काही यशवंत देवांनी स्वरबद्ध केली. कवी अनिल यांच्या कवितेतील आशय सामान्य वाचकाला लवकर कळतो, म्हणूनच त्यांची कविता ‘गेय’ झाली. गेय म्हणजे गुणगुणण्यासारखी किंवा गाता येईल अशी. त्यांच्या कवितेत ‘प्रसादगुण’ दिसतो. कवितेत आलेला प्रत्येक शब्द आशय उलगडत जातो. त्यामुळेच काव्य सुबोध होते; त्यातील नेमका अर्थ आपल्याला समजतो.

‘वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन

नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला।

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी

कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला।

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनु ते

चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतिच्या फुला।

माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली

कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला।

दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनातच सुकुनी

कसे घालू तुज आणुनी, माझ्या प्रीतिच्या फुला।

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात

चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतिच्या फुला।’

‘खमाज’ रागाच्या सुरावटीमध्ये बांधलेली ही चाल आहे. या गीताचे पाच अंतरे आहेत. गीताच्या आरंभालाच ‘माध्यान्ह’ हा शब्द आहे. एरवी रूक्ष वाटणारा हा शब्द कवितेत किती सहज आला आहे! विशेष म्हणजे संगीतकार यशवंत देवांनी तो चालीतसुद्धा बांधला. हे यश संगीतकाराच्या प्रतिभेचे आहे. पण काव्यात योग्य तो शब्द आला आणि कविता बोलकी झाली. गायनाची सुरुवात अ‍ॅडलिब पद्धतीची आहे. ‘प्रीतिच्या फुला’ या शब्दांपासून तालाला सुरुवात होते. ‘माझ्या प्रीतिच्या फुला’ ही भावना मुखडय़ामध्येच प्रभावीपणे मांडली आहे, गायली आहे. पुढे गायनात ती अधोरेखित केली आहे. वाद्यांमध्ये सतार व व्हायोलिन या वाद्यांचा प्रामुख्याने उपयोग दिसतो. दुसऱ्या व चौथ्या अंतऱ्याआधी वाजणारा व्हायोलिनचा पीस आकर्षक झाला आहे. तो कान देऊन ऐकायलाच हवा. तिसऱ्या आणि पहिल्या अंतऱ्याआधी सतारीचा पीस व त्यामागे वाजणारे व्हायोलिन पुन:पुन्हा ऐकण्यासारखे आहे. प्रत्येक अंतरा संपताना वाजलेले स्वरमंडळ हे गीतातला भाव सांगते. गीत पाच अंतऱ्यांचे आहे. प्रत्येक अंतरा म्हटल्यानंतर पूर्ण मुखडा गायला आहे. ‘माझ्या प्रीतिच्या फुला..’ हा आर्जवी स्वर गीत पूर्ण होईपर्यंत सांभाळला आहे. ‘नको जाऊ कोमेजून..’ हा त्यामागचा संदेश आहे. शेवटच्या अंतऱ्यातील ‘तरंगात, रंगात, सारंगात’ हे आश्वासक भावनेचे शब्द त्यातील काव्य उंचीवर नेतात.

सुविख्यात गायिका उषा मंगेशकर यांचा सुमधुर, सुरेल आवाज या गीतातील आशयाला पूर्ण न्याय देणारा आहे. हा आवाज आपल्याला गीताच्या भावनेत सहज नेतो. त्यामुळे ती भावना हे गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाची होते. हेच तर भावगीताचे शक्तिस्थान आहे. उषाताईंच्या आवाजात एक सुरेल अशी धार आहे. या आवाजाची क्षमता व ताकद यशवंत देवांनी नेमकी हेरली आणि एक अप्रतिम गीत जन्माला आले. या गीतात उषाताईंनी केलेला प्रत्येक शब्दाचा उच्चार इतका भावपूर्ण आहे, की त्यासाठी हे गीत पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. प्रत्येक शब्दातील भावना स्वरामध्ये उत्तम उतरली आहे आणि हे भान पूर्ण गायनभर सांभाळले आहे. या गीतातील चालीतले बारकावे व उच्चार याचे श्रेय त्या यशवंत देवांना देतात.

मंगेशकर भावंडांशी सुरेल नाते जपणाऱ्या लेखिका जयश्री देसाई सांगतात : ‘उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली. आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंची पेंटिंग्ज हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो.. मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.’

उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. शास्त्रीय गायन हे शिकलेच पाहिजे, चित्रगीतांसाठी रियाज व आवाजाचा लगाव हे शिकलेच पाहिजे यासाठी उषाताई आग्रही असतात. घरातील भावंडांचे गाणे ऐकता ऐकता खूप काही शिकता आले, असेही त्या मानतात. अनेक भाषांमधील गीते उषाताईंनी गायली व आजही हा ‘गाता गळा’ आहे. भक्तिगीतांपासून लावणी प्रकारापर्यंत आणि हिंदी चित्रपटांतील नायिकेच्या गीतांपासून उडत्या चालींपर्यंत अशी उषाताईंच्या आवाजाची लक्षवेधी झेप आहे. त्यांनी गायलेल्या गीतांवर त्यांच्या आवाजाची ठोस मुद्रा आहे. भावगीतांच्या प्रवासात कवी अनिलांच्या गीतासाठी लाभलेला उषाताईंचा आवाज ही महत्त्वाची गोष्ट ठरली. गीत लोकप्रिय होण्यासाठी ते लक्षणीय योगदान ठरले.

‘कवी अनिल’ या टोपणनावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यतील मूर्तिजापूरचे. ११ सप्टेंबर १९०१ हा त्यांचा जन्मदिवस. १९१९ साली अलाहाबाद विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यातील फग्र्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तत्त्वज्ञान विषयातील पदवी संपादन केली. त्याच काळात त्यांची व कुसुमावती देशपांडे यांची भेट झाली. भारतीय चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. तेथील वास्तव्यात नंदलाल बोस यांची भेट झाली. पुढील काळात त्यांनी कायद्याची पदवी मिळविली व अमरावती येथे येऊन वकिली सुरू केली. पुढे हुशंगाबाद येथे सब जज्ज या पदावर नोकरी केली. अमरावतीत त्यांनी ‘समाजशिक्षण संस्थे’चीही स्थापना केली. युनेस्कोसाठी युरोप-अमेरिका प्रवास केला. १९५८ साली मालवण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष झाले. कवी अनिल यांच्या ‘दशपदी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनात मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक म्हणून कवी अनिल यांचा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते सत्कार झाला. ‘फुलवात’ या त्यांच्या संग्रहात काही भावगीते आहेत. ‘प्रेम आणि जीवन’ हे दीर्घकाव्य त्यांनी लिहिले. ‘कुसुमानिल’ या संग्रहात कुसुमावती देशपांडे व कवी अनिल यांची पत्रे आहेत. रविकिरण मंडळाच्या काळात कवी अनिल यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

संगीतकार यशवंत देवांनी सुगम संगीतातील रियाजाचा कानमंत्र सर्वाना दिला. आजही ते जीवनाचा सकारात्मकतेने वेध घेतात. येत्या १ नोव्हेंबरला ते वयाच्या ९२ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. जगभरातील संगीतप्रेमींना संगीतकार यशवंत देव नावाच्या ‘या’ जन्मावर आणि ‘या’ जगण्यावर शतदा प्रेम करावे, असेच वाटते!

विनायक जोशी

vinayakpjoshi@yahoo.com