अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतासाठी आज होणाऱ्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये देखील मोठा विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे वाढलेला आत्मविश्वास टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, त्यासोबतच सध्या चर्चा आहे ती विराट कोहली आणि टॉसच्या असलेल्या व्यस्त कनेक्शनची! यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टॉस न जिंकल्यामुळे टीम इंडियाच्या धोरणावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हे आत्ताच नसून कर्णधार विराट कोहलीचा टॉससोबत कायमच ३६चा आकडा असल्याचं आकडेवारी सांगते. क्रिकेट समालोचक आणि माजी खेळाडू आकाश चोप्रा यानं विराटचं टॉसशी असलेलं हे नातं स्पष्ट करून सांगितलं आहे.

टॉस जिंकणं महत्त्वाचं, पण…!

एका यूट्यूब चॅनलसोबत बोलताना आकाश चोप्रानं आजच्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची रणनीती कशी असावी, याविषयी काही मुद्दे मांडले. यामध्ये टॉस जिंकण महत्त्वाचं असल्याचं तो म्हणाला. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा टॉससोबत ३६चा आकडा असल्याचं आकडेवारी सांगते. यावेळी बोलताना आकाश चोप्रानं ही आकडेवारी समोर ठेवत गेल्या ५० वर्षांतला हा सर्वात वाईट रेकॉर्ड असल्याचं तो म्हणाला आहे.

८ पैकी एकाच सामन्यात जिंकला टॉस!

टॉसबाबत बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “कोहली आणि टॉसचं काय नातं आहे? जर तुम्ही पाहिलं, तर या वर्षी विराट कोहलीनं ८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. पण यापैकी फक्त एकाच सामन्यात विराट टॉस जिंकला आहे. त्याच्या करीअरकडे तुम्ही पाहिलं, तर गेल्या ५० वर्षांत ज्या खेळाडूंनी किमान १०० सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे, त्यात विराट कोहलीचं टॉस जिंकण्याचं रेकॉर्ड सर्वात वाईट आहे”, असं आकाश चोप्रा म्हणाला.

राहुल द्रविड सर्वात वर!

नुकतीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेल्या राहुल द्रविडचा टॉस जिंकण्याच्या बाबतीत सर्वात वरचा क्रमांक लागतो. “विराट कोहलीनं आत्तापर्यंत नेतृत्व केलेल्या सामन्यांपैकी फक्त ४० टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. त्याउलट राहुल द्रविडचा हा रेकॉर्ड सर्वात उत्तम असून त्याने ५८ ते ६० टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. धोनीनं ४७-४८ टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. कोहली या यादीत सर्वात खाली आहे. याचा अर्थ कोहलीला नशीब साथ देत नाही”, असं आकाश चोप्रा म्हणाल्याचं स्पोर्ट्सकीडानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या १४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहलीनं फक्त एकदाच टॉस जिंकला आहे. त्याचा काहीसा फटका भारताला टी-२० वर्ल्डकपमध्ये देखील बसला असल्याचं बोललं जात आहे.