‘‘पदार्पणापासूनच्या तीन लढतींमध्ये मी एकही बळी मिळवू शकलो नाही. बळी मिळवता येत नसल्याची खंत मनात होती. बांगलादेशविरुद्ध तीन बळी मिळाल्याने डोक्यावरचे बळी मिळवण्याचे दडपण संपले आहे,’’ अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तीन बळींसह झम्पाने ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
भारतात खेळण्याच्या अनुभवाविषयी झम्पा म्हणाला, ‘‘अशा स्वरूपाच्या खेळपट्टय़ांवर खेळण्याची मला सवय नाही. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर चेंडू एवढा वळत नाही. उजव्या यष्टीवर मारा करणे आवश्यक आहे. माझ्या रणनीतीत फारसा बदल नाही, फक्त चेंडूची लेंग्थ बदलली आहे. या बदलाशी जुळवून घेतो आहे. स्टीव्हन स्मिथ चतुर कर्णधार आहे. मी गोलंदाजी करीत असताना तो अचूकतेने क्षेत्ररक्षण लावतो. चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. त्याने योग्य वेळी मला गोलंदाजी दिली.’’
मधल्या फळीच्या हाराकिरीबद्दल झम्पा म्हणाला, ‘‘नऊ चेंडू राखून आम्ही विजय मिळवला. ट्वेन्टी-२० प्रकारात हा चांगला विजय आहे. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंडविरुद्धही हीच अडचण जाणवली होती. या उणिवा लक्षात घेऊन आमचे फलंदाज सराव करत आहेत.’’
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
बळी मिळवण्याचे दडपण संपले -झम्पा
बांगलादेशविरुद्ध तीन बळी मिळाल्याने डोक्यावरचे बळी मिळवण्याचे दडपण संपले आहे,

First published on: 23-03-2016 at 05:28 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy to take wickets says australia rookie adam zampa