पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया लढतीत दोघांनाही विजय आवश्यक
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी मोहालीत होणाऱ्या लढतीमध्ये विजयाची आवश्यकता दोन्ही संघांना आहे. मात्र उपांत्य फेरीचा मार्ग ऑस्ट्रेलियाकरिता अधिक सोपा आहे. पाकिस्तानचा संघ आतापर्यंत या स्पध्रेत झगडताना आढळत असला तरी त्यांना कमी लेखण्याची चूक ऑस्ट्रेलियाने मुळीच करता कामा नये.
तीन सामन्यांपैकी दोन पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्यातच जमा आहेत. पाकिस्तानचा संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता उपांत्य फेरीत पोहोचण्यास ते लायक नाहीत, अशी ग्वाही प्रशिक्षक वकार युनूस यांनीच दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचीसुद्धा कामगिरी तशी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर बांगलादेशविरुद्ध रडतखडत विजय त्यांना मिळवता आला होता. गुणतालिकेतील दुसऱ्या गटात न्यूझीलंडने उपांत्य फेरीत आधीच स्थान निश्चित केलेले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवले तर त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राहतील. मग रविवारी होणारा भारताविरुद्धचा सामना हा दोन्ही संघांसाठी जणू उपांत्यपूर्व फेरीचाच सामना असेल.
‘‘धोकादायक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक आम्ही अजिबात करणार नाही,’’ असे ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक पीटर नेव्हिल म्हणाला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने फॉर्मात असलेल्या उस्मान ख्वाजाला शेन वॉटसनसोबत सलामीला पाठवण्याची चाल रचली होती. तर बेधडक फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. ख्वाजाने आघाडीच्या जबाबदारीला न्याय दिला होता, पण वॉर्नर मात्र आपली भूमिका चोखपणे पार पाडू शकला नव्हता. मात्र लेग-स्पिनर अॅडम झम्पाने तीन बळी घेण्याचा पराक्रम दाखवला होता.
पाकिस्तानचे फलंदाज महत्त्वाच्या सामन्यांत कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरत आहेत, अशा प्रकारे युनूस उणिवा दाखवत आहेत. याशिवाय विश्वचषकानंतर शाहिद आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याचे पीसीबीने जाहीर केले आहे.
गटबाजीच्या अफवा बिनबुडाच्या -मलिक
पाकिस्तानी संघात गटबाजी चालू असल्याच्या अफवा बिनबुडाच्या आहेत, अशा शब्दांत अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने स्पष्टीकरण दिले आहे. संघ जेव्हा पराभूत होतो, तेव्हा गटबाजी होत आहे, यांसारख्या नकारात्मक चर्चा होत राहतात, असे मलिकने सांगितले.‘‘गटबाजीच्या याच अफवांमुळे आमची संघबांधणी नीट होऊ शकली नाही. आम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. जेव्हा संघ हरतो, तेव्हा अनेक मंडळी आमच्यावर दडपण लादतात आणि संघात बदल घडवतात,’’ असे मलिकने सांगितले.
* स्थळ : पीसीए स्टेडियम, मोहाली
* वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.
पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), अन्वर अली, वहाब रियाझ, शोएब मलिक, मोहम्मद इरफान, मोहम्मद आमिर, इमाद वसिम, मोहम्मद हाफीझ, मोहम्मद नवाझ, सर्फराझ अहमद, उमर अकमल, मोहम्मद शमी, शार्जिल खान, खलिद लतिफ, अहमद शेहझाद.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अॅश्टॉन अॅगर, जेम्स फॉकनर, जोश हॅस्टिंग्स, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, अॅन्ड्रय़ू टाय, अॅडम झम्पा, शेन वॉटसन, पीटर नेव्हिल, मिचेल मार्श, जोश हॅझलवूड, आरोन फिन्च, नॅथन कोल्टर -निले, डेव्हिड वॉर्नर.