टी-२० वर्ल्डकपमध्ये सध्या भारताच्या आशा या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी होणाऱ्या सामन्यावर अवलंबून आहेत. या सामन्यात जर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं, तरच भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी असेल. या पार्श्वभूमीवर समस्त भारतीयांनी अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना सुरू केली असताना टीम इंडियामध्ये याबाबत काय चर्चा सुरू असेल, याविषयी देखील चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भात स्कॉटलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर माध्यमांशी बोलणाऱ्या रवींद्र जडेजानं दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेमध्ये एका प्रतिनिधीने यासंदर्भात प्रश्न विचारला असता जडेजानं त्याचं उत्तर दिलं आहे.

…तर टीम इंडिया काय करणार?

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियानं मोठा विजय मिळवून वर्ल्डकपमधलं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. तब्बल ८ विकेट्सनं स्कॉटलंडला हरवण्यात रवींद्र जडेजानं १५ धावांमध्ये घेतलेल्या ३ विकेट्सनं मोलाची भूमिका बजावली. यासाठीच त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र जडेजाला शनिवारच्या सामन्याविषयी विचारणा करण्यात आली.

यावेळी “शनिवारच्या सामन्यात अफगाणिस्तान न्यूझीलंडला हरवू शकलं नाही, तर टीम इंडिया काय करणार?” असा प्रश्न रवींद्र जडेजाला एका माध्यम प्रतिनिधीने विचारला. त्यावर बोलताना जड्डू म्हणाला, “काय करणार? बॅग पॅक करून घरी जाऊ, अजून काय?”

पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याकडून पराभूत झालेल्या टीम इंडियानं अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांविरुद्ध मोठा विजय मिळवून आपला नेट रनरेट वाढवला आहे. भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी रविवारचा नामिबियाविरुद्ध होणारा सामना देखील जिंकणं आवश्यक आहेच. मात्र, त्याआधी शनिवारी अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीयांनी आपला पाठिंबा अफगाणिस्तानच्या संघाला दिला आहे.

Ind vs Sco : “आम्ही गेल्या तीन वर्षांपासून…”, रवींद्र जडेजानं टीकाकारांना सुनावलं!

दरम्यान, स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रवींद्र जडेजानं टीकाकारांना देखील उत्तर दिलं आहे. “गेल्या तीन वर्षांपासून एक संघ म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत. मग ती देशांतर्गत असो वा विदेशात. आम्हाला कदाचित काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नसेल. पण त्यावरूनच आम्हाला जोखणं चुकीचं आहे”, अशा शब्दांत रवींद्र जडेजानं टीकाकारांना ठणकावलं आहे.