Apple Watch Ultra Saves Life: बदललेल्या काळाबरोबर मोबाइल जितके स्मार्ट होत आहेत. तितकीच इतर उपकरणेही स्मार्ट होत आहेत. पूर्वी मनगटावर असलेलं घड्याळही काही वर्षांपूर्वी स्मार्ट झालं. खासकरून ॲपल कंपनीने आणलेल्या वॉच सिरीजमध्ये अनेक नवे बदल घडवले. हे बदल आता युजर्सना फिटनेस ट्रक करण्याशिवायच जोखमीची किंवा धोक्याची सूचनाही देत आहेत. याचा ताजा अनुभव मुंबईतील २६ वर्षीय टेक इंजिनिअर क्षितिज झोडपेला आला आहे. ॲपल वॉच अल्ट्रामुळे क्षितिजचे प्राण वाचले.
नेमके प्रकरण काय आहे?
मुंबईत राहणारा क्षितिज एका ई-कॉमर्स कंपनीत काम करतो. त्याला स्कुबा डायव्हिंग या साहसी प्रकाराचा छंद आहे. यावर्षी तो पुद्दुचेरीच्या समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेला होता. ३६ मीटर खोल पाण्यात स्कुबा डायव्हिंग करताना त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला. त्यामुळे तो वेगाने पाण्याच्या वर खेचला जाऊ लागला. पाण्याचा दबावही वाढू लागला होता. ही परिस्थिती जीवघेणी होती.
इंडिया टुडे टेकशी बोलताना क्षितिजने या घटनाक्रमाची माहिती दिली आहे. तो म्हणाला, मी वेगाने वर येत होतो आणि माझे माझ्यावर नियंत्रण नव्हते. त्यामुळे दुखापत होण्याचा मोठा धोका संभवत होता. पाणी खूप खवळलेले होते. तसेच पाणी अस्वच्छ असल्यामुळे दृश्यमानताही कमी होती. मला फक्त ५ ते १० मीटरपर्यंतचे दिसत होते.
ॲपल वॉचने दिली धोक्याची घंटा
तथापि, वेगाने ही घटना घडत असताना क्षितिजच्या ॲपल वॉच अल्ट्राला मात्र धोक्याची जाणीव झाली आणि वॉचने आपत्कालीन सूचना दिली. क्षितिजने म्हटले की, माझ्या वॉचवर धोक्याचे इशारे दिसले. पण मला वेग कमी करता येत नव्हता. त्यानंतर वॉचने धोक्याचा सायरन वाजवला. या आवाजाने क्षितिजच्या प्रशिक्षकाचे लक्ष वेधले. प्रशिक्षकांनी तात्काळ क्षितिजची मदत करून त्याला सुरक्षित वर आणले.
ॲपलचे मानले आभार
या घटनेनंतर थोडक्यात बचावलेल्या क्षितिजने ॲपलचे आभार मानले आणि सीईओ टीम कुक यांना पत्र लिहून सदर घटना सांगितली. आश्चर्य म्हणजे, टीम कुक यांनी क्षितिजच्या पत्राला उत्तर दिले आहे. टीम कुक म्हणाले, तुमच्या प्रशिक्षकाने अलार्म ऐकला आणि तुम्हाला वेळेवर मदत मिळाली, हे ऐकून आनंद वाटला. तुमचा प्रसंग आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
धोक्याचा अलार्म कसा वाजतो?
ॲपलने २०२२ साली ॲपल वॉच अल्ट्रा हे स्मार्टवॉच लाँच केले होते. साहसी खेळ आणि आऊटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी या विशेष पद्धतीने डिझाईने केलेले असल्याचे कंपनीने सांगितले होते. यात आपत्कालीन अलार्म वाजण्याची सुविधा देण्यात आली आहे. अलार्मचा आवाज इतका असतो की, तो १८० मीटर पर्यंत ऐकू येऊ शकतो, असा दावा केला जातो. पाण्यात असल्यामुळे आवाजाचा वेग आणि क्षमता थोडी कमी होऊ शकते.
युजर जोपर्यंत अलार्म बंद करत नाही किंवा वॉचची बॅटरी संपत नाही, तोपर्यंत हा आवाज सुरूच राहतो.