Chandrayaan 3 ISRO Trying to Establish Communication : भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली. इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान ३ हे चंद्रावर संशोधन करत होतं. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ पाठवत होते. परंतु, चंद्रावर रात्र झाल्यानंतर भारताचं हे यान निष्क्रिय झालं.

हे अवकाशयान आणि त्याबरोबर पाठवलेली सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवर चालतात. चंद्रावर अंधार पडल्यामुळे ही सर्व उपकरणं ४ सप्टेंबर रोजी निष्क्रिय करण्यात आली. म्हणजेच, ही सर्व उपकरणं स्लीप मोडमध्ये गेली. चंद्रावर १५ दिवस उजेड आणि १५ दिवस अंधार (रात्र) असतो. त्यामुळे चांद्रयान ३ निष्क्रिय करण्यात आलं. परंतु, चंद्रावर आता सकाळ होऊ लागली आहे. त्यामुळे भारतीय आंतराळ संशोधन संस्था चांद्रयान ३ सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहेत.

इस्रोने काही वेळापूर्वी चांद्रयान ३ बद्दल मोठी अपडेट दिली आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ मागील १८ दिवसांपासून झोपलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागं करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, या कामात इस्रोला अद्याप यश आलेलं नाही. इस्रोनं म्हटलं आहे की, आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.

इस्रोने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर चांद्रयान ३ मोहिमेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. इस्रोने म्हटलं आहे की आम्ही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. अद्याप त्यांच्याशी संपर्क स्थापित होऊ शकला नाही. तसेच लँडर किंवा रोव्हर दोघांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही या दोघांशीही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि काही काळ हे प्रयत्न सुरूच राहतील.

विक्रम लँडर किंवा प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता खूप कमी आहे. अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत आधीच वेगवगळे दावे केले आहेत. तरीसुद्धा, भारताचं हे यान सक्रीय झालं तर ही खूप मोठी उपलब्ध मानली जाईल.

Story img Loader