तुम्ही फेसबुक डिलिट करण्याचा विचार कधी केलाय? एकूणच समाजमाध्यमांशी आपण इतके जोडले गेलो आहोत की, त्यापासून दूर राहण्याचा विचारही अनेकांना असह्य वाटतो. पण अनेकजण असेही आहेत ज्यांना सततच्या वापरामुळे समाजमाध्यमांचा वीट येऊ लागला आहे. फेसबुकही त्याला अपवाद नाही.  मात्र, हे एकच कारण नाही. अनवधानाने किंवा आधीच्या खात्याचा पासवर्ड लक्षात न राहिल्यामुळे अनेकजण स्वत:च्या नावाची दोन-तीन खाती तयार करतात. नंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांना यापैकी एकच खाते सुरू ठेवून बाकीचे खाती बंद करायची असतात. ते कसे करायचे  याबद्दलची माहिती.

लक्षात ठेवा

फेसबुकचे अ‍ॅन अनइन्स्टॉल करून तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचे खाते रद्द करावे लागते. मात्र, एकदा का तुम्ही तुमचे खाते रद्द केले तर तुम्हाला पुन्हा ते मिळवण्याची संधी फक्त ३० दिवस मिळते. चुकून खाते डिलिट करणाऱ्यांना खाते पुन्हा मिळवता यावे, यासाठी फेसबुकने ही ३० दिवसांची मुदत दिली आहे. तसेच तुमची सर्व माहिती आणि पोस्ट फेसबुकवरून पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी फेसबुकला ९० दिवसांचा अवधी लागतो.

फेसबुकवरील खाते रद्द कसे कराल?

१. अ‍ॅप सुरू करून उजवीकडील वरच्या कोपऱ्यातील चिन्हावर क्लिक करा.

२. सेटिंग अ‍ॅण्ड प्रायव्हसीच्या पर्यायावर क्लिक करून सेटिंगमध्ये जा.

३. पर्सनल अ‍ॅण्ड अकाऊंट इन्फर्मेशन हा पर्याय निवडा.

४. अकाऊंट ओनरशिप अ‍ॅण्ड कंट्रोल हा पर्याय निवडा. त्यात प्रोफाइल अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड कंट्रोलच्या पानावर जाऊन ‘डीअ‍ॅक्टिव्हेशन अ‍ॅण्ड डिलिशन’ या पर्यायावर क्लिक करा.

५. येथे तुम्हाला खाते रद्द करण्याचे कारण निवडावे लागेल. ते निवडून पुढे गेल्यास तुमचे खाते रद्द होण्याची प्रक्रिया सुरू होईल.