Google Pay Warning : ऑनलाइन फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता Google Pay ने वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गुगल पेवर कोणताही व्यवहार करताना स्क्रीन शेअरिंग ॲप्स वापरू नका, असे गुगल पेद्वारे सांगण्यात आले आहे. टेक जायंट Googleने सांगितले, “कंपनी रिअल टाइममध्ये संशयास्पद व्यवहार शोधण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि फसवणूक प्रतिबंध तंत्रज्ञान (Advanced Artificial Intelligence and Fraud Prevention Technology) वापरते.”
गुगल पे वापरकर्त्यांना अशी देते सुरक्षा
Google Pay सुरक्षा प्रदान करण्यासाठी दोन टप्पे असतात ज्यामध्ये ॲप्लिकेशन ब्लॉक करणे आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी ‘यूपीआय पिन’ची आवश्यकता आहे. पहिला टप्पा हे सुनिश्चित करतो की, पेमेंट ॲप्लिकेशन सुरक्षित आहे. तर, दुसरा टप्पा हा यूपीआय पिन गोपनीय ठेवतो. यूपीआय पीन हा एटीएम पिनप्रमाणेच सुरक्षा प्रदान करतो. पण, ॲपमध्ये सर्व मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये असूनही कित्येकदा संशयास्पद घडामोडी होण्याची शक्यता असते.
गुगल पे वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा
अशा संशयास्पद घडामोडींपासून संरक्षण करण्यासाठी, Google Pay ने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करतात की “वापरकर्ते त्यांची वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवू शकतात, जसे की त्यांच्या Google Pay खात्यात लॉग इन करताना प्राप्त झालेला OTP सुरक्षित कसा ठेवावा हे सांगितले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “आर्थिक व्यवहार करताना फोन कॉल करू नये किंवा इतर कोणतेही काम करू नये; तसेच तुमचे महत्त्वाचे वैयक्तिक तपशील सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करणे टाळा.”
स्क्रीन शेअरिंग ॲप्सचा असा केला जातो वापर
Google Pay ने वापरकर्त्यांना व्यवहार करताना स्क्रीन शेअरिंग ॲप्स वापरू नका, असे सांगितले आहे. स्क्रीन शेअरिंग ॲप्सद्वारे वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसची स्क्रीन इतर वापरकर्त्यांसोबत रिअल टाइममध्ये शेअर करू शकतात. या ॲप्ससह एक वापरकर्ता आपली स्क्रीन दुसर्यासह शेअर करू शकतो. म्हणजेच दुसरा वापरकर्ता तुमची स्क्रीन पाहू शकतो आणि काही वेळा दूर असूनही शेअर केलेली स्क्रीन नियंत्रित करता येऊ शकते. पण, या ॲप्सचे कायदेशीर व व्यावहारिक उपयोगासाठीही उपयुक्त आहेत जसे की ‘टीम वर्क’, ‘समस्या सोडवणे’ किंवा ‘रिमोट असिस्टन्स’साठी वापर केला जातो. पण, आर्थिक व्यवहार करताना विशेषत: गुगल पे यांसारखे प्लॅटफॉर्म वापरताना हे ॲप्स वापरणे हा एक मोठा धोका असतो.
गुगल पे वापरताना स्क्रिन शेअरिंग ॲप्स वापरू नका
हे ॲप्स वापरकर्त्याच्या महत्त्वाच्या माहितीच्या सुरक्षिततेचा भंग करतात. व्यवहारादरम्यान त्यांचा वापर करून, हे ॲप्स चुकीच्या पद्धतीने वापर करून सर्व माहिती गोळा करतात आणि पासवर्ड, पिन आणि इतर तपशील यांसारखे गोपनीय तपशील चोरतात. तुमची स्क्रीन इतर कोणाशी तरी शेअर केल्याने (विशेषत: आर्थिक व्यवहारादरम्यान) मॅलिशस ॲप्सला अनधिकृत प्रवेश मिळतो. त्यामुळे हे मॅलिशस ॲप्स तुम्ही शेअर केलेल्या माहिती वापरून सतत घुसखोरी करू शकतात आणि तुमचे बँक तपशील, ओळखपत्रे यांसारखी माहिती चोरू शकतात.