Sridhar Vembu responds to Harsh Goenka: भारतीय टेक कंपनी झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनी डिजिटिल सार्वभौमत्व आणि आत्मनिर्भरतेची गरज ही चर्चा पुन्हा एकदा सुरू केली आहे. अराताई हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप तयार केल्यानंतर श्रीधर वेम्बू चर्चेत आहेत. त्यांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणालींवरील भारताचे अवलंबित्व किती असुरक्षित आहे, यावर भर देत नवे विधान केले आहे. अब्जाधीश हर्ष गोयंका यांच्या एक्स पोस्टला उत्तर देत असताना त्यांनी नवी टिप्पणी केली.
हर्ष गोयंका काय म्हणाले होते?
प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश हर्ष गोयंका हे अधूनमधून एक्सवर कल्पक पोस्ट टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय तंत्रज्ञान, चालू घडामोडी, उद्योग यावर ते खुमासदार भाष्य करत असतात. आताही त्यांनी एक पोस्ट करत भारतीयांना एक कल्पना करण्यास सांगितले. ते म्हणाले, “समजा ट्रम्प यांनी, गुगल इंस्टाग्राम, एक्स, फेसबुक आणि चॅटजीपीटी सारखे प्लॅटफॉर्म वापरण्यास आपल्यावर बंदी आणली. तर काय परिणाम होतील याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपल्याकडे प्लॅन बी काय आहे?”
श्रीधर वेम्बू यांचे उत्तर..
हर्ष गोयंका यांच्या एक्स पोस्टवर श्रीधर वेम्बू यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “भारताने तंत्रज्ञानात सुधारणा आणण्यासाठी १० वर्षांचे राष्ट्रीय अभियान विकसित करण्याची नितांत गरज आहे.” अमेरिका त्यांचे तंत्रज्ञान वापरण्यावर निर्बंध आणू शकते का? या अटकळीस त्यांनीही समर्थन दिले आहे. भारताकडे केवळ पर्याय म्हणून काम करण्यासाठी नव्हे तर चीनप्रमाणेच अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्थानिक उपाय आणि सॉफ्टवेअर तयार असणे आवश्यक आहे, असेही वेम्बू म्हणाले.
श्रीधर वेम्बू यांच्या पोस्टखाली अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारत-अमेरिका डिजिटल व्यापाराशी संबंधित टेक विश्लेषक म्हणून १५ वर्ष काम करणाऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, जर असे झाले तर मोठे आर्थिक पडसाद उमटू शकतात. NASSCOM ने वर्तविलेल्या भाकितानुसार, जर २०२५ मध्ये असे झाल्यास, भारतातील २०० बिलियन डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था कोसळू शकते. ५०० मिलियन वापरकर्त्यांना गमावण्याची वेळ येऊ शकते. तसेच ६० टक्के डिजिटल जाहिरातीचा महसूल बुडू शकतो.
देशी ॲप्सना थंड प्रतिसाद
भारताने काही प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. पण भारतातून त्याला थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गुगल मॅप्ससाठी मॅपमायइंडिया कडून मॅपल्स मॅप हे ॲप विकसित करण्यात आले आहे. पण त्याचा तितका वापर होताना दिसत नाही. व्हॉट्सॲपसाठी अराताई हे नवीन ॲप वेम्बू यांच्या कंपनीने लाँच केले आहे. हे हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
