Aditya L1 Mission Sun Photos : चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौरमोहीम हाती घेतली आहे. इस्रोने आदित्य एल-१ हे यान सूर्याच्या दिशेनं पाठवलं आहे. भारताच्या या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. आदित्य-एल१ ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो काढून इस्रोला पाठवला आहे. हे सर्व फोटो २०० ते ४०० नॅनोमीटर व्हेवलेन्थमधील आहेत. याद्वारे तुम्हाला सूर्याचं ११ वेगवेगळ्या रंगांमधलं रूप पाहायला मिळेल.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी लाँच केलं. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवलं आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, आदित्य-एल१ चा SUIT पेलोड २० नोव्हेंबर रोजी चालू करण्यात आला होता. या टेलिस्कोपने सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरचे फोटो काढले आहेत. फोटोस्फेयर म्हणजेच सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फेयर म्हणजे सूर्याच्या बाह्य वातावरणातील पातळ थर, जो पृष्ठभागापासून २००० किलोमीटर दूर आहे. आदित्य-एल१ ने याआधी ६ डिसेंबर रोजी सूर्याचे काही फोटो क्लिक केले होते. ते पहिलेच लाईट सायन्स फोटो होते. परंतु, यावेळी फुल डिस्क फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग आणि त्याचं शांत रूप दिसतंय. या फोटोंच्या माध्यमातून इस्रोचे वैज्ञानिक सूर्याचा अभ्यास करू शकतील.

पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडियन, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर ऑब्जर्व्हरी, तेजपूर युनिव्हर्सिटी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी मिळून हा SUIT बनवला आहे.

हे ही वाचा >> भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य एल-१ हे अवकाशयान सूर्य आणि पृथ्वीदरम्यान असलेल्या एल-१ बिंदूपर्यंत जाणार आहे. एल-१ बिंदूवरून सूर्याचा अभ्यास केला जाईल. लाँचिंगपासून एल-१ बिंदूपर्यंतचा प्रवास हा जवळपास ११० दिवसांचा आहे. एल-१ बिंदूवर पोहोचण्यासाठी परिस्थितीनुसार बदल आणि सुधारणा करण्यासाठी ट्रॅकिंग केले जात आहे. जानेवारी २०२४ च्या मध्यात आदित्य एल-१ मोहिमेचा शिलेदार सूर्याच्या कोरोनातील एल- १ पॉइंटवर पोहोचेल.