Jio Network Down: रिलायन्सच्या जिओचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मोबाइल वापरकर्त्यांना नेटवर्क मिळत नाही आहे. त्यामुळे युजर्सनी याची तक्रार सोशल मीडियावर मांडली. आज सकाळी ११ वाजून १५ मिनिटांच्या आसपास जिओचं नेटवर्क गेलं. त्यानंतर ही बातमी करेपर्यंत नेटवर्क आलेलं नाही. आतापर्यंत मुंबईत १० हजाराहून अधिक लोकांनी नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच अनेक लोक सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांना ट्रोल करत आहेत.
भारतात मोबाइल नेटवर्कच्या अचूकतेबाबत डाऊन डिटेक्टर या संकेतस्थळावर माहिती दिली जाते. या संकेतस्थळावर सध्या जिओच्या नेटवर्कबाबत किती लोक तक्रारी करत आहेत. याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी १२. १८ मिनिटांपर्यंत १० हजाराहून अधिक लोकांनी नेटवर्क नसल्याची तक्रार दिली. यापैकी ६७ टक्के लोकांनी मोबाइलला सिग्नल नसल्याचं म्हटलं. तर १९ टक्के लोकांनी इंटरनेट नसल्याची तक्रार दिली. तर १४ टक्के लोकांनी जिओ फायबरची अडचण सांगितली.
मुंबई आणि महाराष्ट्रात आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती विसर्जन होत आहे. आज सकाळीच लालबागचा राजा आणि इतर मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले. लाखो गणेश भक्त आज विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. अशावेळी जिओ सारख्या मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीचे नेटवर्क डाऊन झाल्यामुळे अनेकांना अडचणी उद्भवत आहेत.
जिओने काय सांगितले?
दरम्यान जिओ कंपनीकडून नेटवर्कच्या समस्येबाबतचे स्पष्टीकरण समोर आले आहे. जिओच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई आणि लगतच्या परिसरातील नेटवर्क युजर्सना अडचणी येत होत्या. मात्र आता या अडचणी दूर केलेल्या असून जिओचे नेटवर्क पुर्वरत करण्यात आले आहे.
दरम्यान जिओचे नेटवर्क गेल्यानंतर साहजिकच युजर्सनी सोशल मीडियावर याचा राग काढण्यास सुरुवात केली. अनेक मिम्स पोस्ट करत मुकेश अंबानी यांना ट्रोल केले.
रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी हे अशावेळी ट्रोलर्सचे लक्ष्य बनतात. इतर कंपन्यांचे युजर्स व्हायरल मिम्स सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा पोस्ट करून ट्रोलिंग करत आहेत.
डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार जिओ डाऊन झाले असले तरी एअरटेल, व्हीआय, बीएसएनएल या कंपन्यांचे नेटवर्क सुरळीत सुरू आहे.