Smart Fridge : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपले आयुष्य खूप सोप्पे झाले आहे. सकाळच्या मोबाईलमधील अलार्मपासून रात्री घरातील लाईट बंद करण्यासाठी डिव्हाईसला ऑर्डर देण्यापर्यंत आपण दिवसभरात प्रत्येक कामासाठी अशा डिव्हायसेसवर अवलंबून असतो. कोणतीही गोष्ट सहजरित्या करण्यास आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतो. यापुढे आणखी कोणत्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध लागेल? काही वर्षांनी आणखी अपग्रेड झालेले तंत्रज्ञान विकसित झालेले असेल असे अनेक विचार तुमच्याही मनात येत असतील. भविष्यातील आणखी विकसित तंत्रज्ञानाची प्रचिती देणारी एक बाब समोर आली आहे.

स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही यानंतर आता लवकरच स्मार्ट फ्रिज लाँच होणार आहे. हा स्मार्ट फ्रिज स्वतःच तुमच्यासाठी खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकेल असा असणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने अनेक डिव्हाइस आपली रोजची कामं करण्यात मदत करतानाचा अनुभव तुम्ही घेतला असेल. हेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर आता फ्रिजमध्ये देखील मिळणार आहे. हा स्मार्ट फ्रिज नक्कीच गृहिणींना मदत करणारा ठरेल.

आणखी वाचा : ड्युअल सिममध्ये एअरटेलचे कार्ड वापरताय? फक्त नंबर चालू ठेवायचा असेल तर सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते जाणून घ्या

खूप दिवसांपासून यावर सुरू होते काम
२०१६ मध्ये सॅमसंगने असे तंत्रज्ञान असणारा फ्रिज लाँच केला होता. फ्रिजवर स्क्रिन लावण्याचा विचार २००० पासून सुरू झाला होता. काही ठिकाणी असे फ्रिज वापरले जातात, पण याची संख्या फार कमी आहे. आता सॅमसंग ने स्मार्ट फ्रिज बनवण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. असे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सॅमसंगचे प्रयत्न सुरू आहेत. ॲमेझॉन देखील अशाच एका प्रोजेक्टवर काम करत आहे.

कसे असेल हे तंत्रज्ञान?

  • या तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फ्रिजकडुन खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली जाईल.
  • सर्वात आधी फ्रिजमध्ये असणाऱ्या खाद्यपदार्थांची एक लिस्ट तयार केली जाईल.
  • त्यानुसार तुमचे आवडते खाद्यपदार्थ लक्षात ठेवले जातील.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तुमच्या सवयींचा अंदाज लावला जाईल.
  • जर एखादा पदार्थ संपला तर फ्रिज स्वतःच त्याची ऑर्डर देईल.
  • ऑर्डर देण्यासाठी फ्रिज कोणत्याही ऑनलाईन मार्केटशी कनेक्टेड असेल.