गणेशाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण पसरलेले आहे. हे वातावरण स्मार्टफोनवरही पाहावयास मिळते आहे. गणपतीच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या मोबाइलच्या होमस्क्रीनवर गणपतीचे छायाचित्र आणले आहे, तर अनेकांनी गणपतीची गाणी डाऊनलोड केलेली आहेत. यानिमित्ताने मोबाइलवर विविध अ‍ॅप्स आणि गेम्सही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊ या.

गणेश लाडू कॅच
अँड्रॉइड फोनवर चालणारा हा गेम नावातच सर्वकाही सूचवतो. या गेममध्ये गणपती
एक-एक लाडू टाकत जातो. तो लाडू आपण झेलायचा असतो. आपण जेवढे लाडू झेलू तेवढे पॉइंट्स आपल्याला मिळत जातात. या गेमचा आकारची अगदी कमी म्हणजे १.४ एमबी आहे. यामुळे आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करण्यासाठी जास्त जागा लागत नाही. या गेममध्ये गणपतीची विविध रूपेही पाहावयास मिळतात. यामुळे गणेशदर्शनाबरोबर खेळण्याचा अनोखा अनुभव आपल्याला या गेममधून मिळतो. अशाच प्रकारचा गेम गणेश रनर नावाने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे.

गणेश रिंगटोन
गणपतीची विविध गाणी, भजन, रिंगटोन आणि वॉलपेपर्स या अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामधील गाणी आपल्याला पाहिजे ते गाणे किंवा भजन रिंगटोन म्हणून सेव्ह करता येऊ शकते. याशिवाय गणपतीचे फोटोही यामध्ये डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

गणपती लाइव्ह वॉलपेपर
गणपतीचे लाइव्ह वॉलपेपर्स उपलब्ध करून देणारे हे अ‍ॅपही गुगल प्लेवर उपलब्ध झाले आहे. यामध्ये विविध फीचर्स असलेले मनमोहक वॉलपेपर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वॉलपेपर्समध्ये डे आणि नाइट मोड देण्यात आला आहे. यामध्ये विविध धून देण्यात आल्या आहेत, तर विविध मंत्रही देण्यात आले आहेत. यामध्ये गणपतीची अ‍ॅनिमेटेड पूजाही करता येते. याशिवाय तुम्हाला हवे तसे वॉलपेपर सेट करण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे.

गणेश भजन
गणपतीच्या विविध भजनांचा संग्रह विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही सजवलेली गणेशमूर्ती वॉलपेपर म्हणूनही सेट करू शकता.

गणेश मंत्र

या अ‍ॅपमध्ये तुम्हाला जेवढय़ा वेळा गणपतीचा मंत्र पठण करायचा असेल त्याची सेटिंग करून ठेवली म्हणजे त्या मंत्राचे पठण करण्यासाठी लागणारा वेळ किती याचे सर्व मापक तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. यात तुम्ही एकदा पठण केल्यावर ओके म्हटले की उलटी गणती सुरू होते. यात ११, २१, ५१, १०८ अशी विविध मापके तुम्हाला सेट करून ठेवता येऊ शकतात.

सहस्रगणक
या अ‍ॅपमध्ये तुम्हाला सहस्रावर्तन करण्यासाठी मापके देण्यात आली आहेत. यामध्ये तुम्ही सहस्रावर्तन करण्यासाठी किती जण बसला आहात, एका आर्वतनाला किती वेळ लागतो यानुसार गणती सुरू होते आणि तुम्हाला सहस्रावर्तन झाल्यावर त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते.

डान्सिंग गणेश
या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या विविध आरत्यांपैकी तुम्हाला आवडेल ती आरती सुरू केली की त्या आरतीवर नाचणारा गणपती पाहण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेली आहे.