बुद्धीला आव्हान देणारी कोडी सोडवायला सर्वच हुशार मंडळींना आवडते. याच सदरात आपण यापूर्वीही अशा प्रकारच्या कोडय़ांची अ‍ॅप्स पाहात आलो आहोत. आज आपण पाहणार असलेले अ‍ॅपही कोडय़ांवर आधारित असले तरी त्यात थोडा वेगळेपणा आहे. बहुतेक वेळा आपण जेव्हा कोडे सोडवतो त्या वेळी सोडवलेल्या कोडय़ाचा व्यवहाराशी फारसा संबंध नसतो. त्यामुळे त्या कोडय़ाबद्दल मित्रमंडळी किंवा घरच्यांशी चर्चा करून झाली की तो विषय तिथेच थांबतो.

परंतु  Brilliant.org यांनी बनवलेले ब्रिलियंट (Brilliant) हे अ‍ॅप वैशिष्टय़पूर्ण आहे. https://play.google.com/store/apps/details?id=org.brilliant.android त्यांच्या मताप्रमाणे वर्गातील व्याख्याने ऐकून किंवा व्हिडीओ पाहून जेवढे ज्ञान पदरात पडते त्यापेक्षा त्या विषयावरील संकल्पनात्मक कोडी किंवा प्रश्न सोडवून विषयाचे आकलन अधिक चांगले होऊ  शकते. या विश्वासातून त्यांनी नंबर थिअरी, कॉम्प्युटर सायन्स, दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र, लॉजिक, प्रॉबॅबिलिटी यांसारख्या गणित, विज्ञान आणि इंजिनीअरिंगच्या १५ विषयांवरील हजारो प्रश्न तयार केले आहेत.

उदाहरणार्थ, गाडी ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने तोंड करून गाडीत बसलेल्या प्रवाशाने वरती सरळ रेषेत उडवलेले नाणे त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाच्या मांडीवर पडले तर ती गाडी एकसमान वेगाने धावते आहे की तिचा वेग वाढतो आहे की कमी होतो आहे? हे तुम्हाला ठरवायचे आहे. (गाडीचा डबा वातानुकूलित असून हवाबंद आहे.) न्यूटनचे गतीविषयक नियम वापरून या उदाहरणाचे उत्तर काढता येते हे आपल्यापैकी बहुतेकांना ज्ञात आहेच.

काही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आकडेमोड करावी लागते. त्यासाठी तुम्हाला तीन संधी दिल्या जातात. वेळाची मर्यादा नसते. तुम्हाला योग्य उत्तर न मिळाल्यास त्याचे उत्तर पायरी पायरीने स्पष्टीकरणासह दिले जाते. हे अ‍ॅप या प्रश्नावर इथेच थांबत नाही तर इतर कोणी अन्य पद्धतीने हा प्रश्न सोडवून, अपलोड केलेली स्पष्टीकरणे तुम्हाला वाचता येतात. तसेच तुम्हाला तुमचे मत मांडण्याची मुभा आहे. त्यामुळे एकाच प्रश्नावर किती विविध पद्धतीने विचार करता येतो हे आपल्याला कळू शकते.

वर्तमानपत्रात जसे रोज सोडवण्यासाठी शब्दकोडे दिले जाते तसे या अ‍ॅपमधे “आजच्यासाठी तीन प्रश्न” तुम्हाला दिले जातात. हे या अ‍ॅपचे आणखी एक वैशिष्टय़. तुमची प्रश्न सोडवण्याची क्षमता जशी वाढत जाते तशी काठिण्य पातळीही वाढत जाते.

या अ‍ॅपबद्दलच्या माहितीनुसार हे अ‍ॅप ३५ लाख लोकांनी डाऊनलोड केलेले असून न्यूयॉर्क टाइम्ससारख्या नामवंत वृत्तपत्रांनी याचे कौतुक केले आहे. हे अ‍ॅप वापरून आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणाऱ्यांमधे विद्यार्थी आणि उत्साही मंडळीशिवाय ऑलिंपियाड चँपियन्स, संशोधक आणि व्यावसायिक यांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे.

मनाली रानडे manaliranade84@gmail.com