इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांपुढे या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषत: फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या प्रचलित समाजमाध्यमांचा वापर करून केल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर समाज माध्यमांवरील सायबर धोक्यांची जाणीव करून देणारा हा लेख

समाज माध्यमांचा वाढता वापर स्वागतार्ह आहे. मात्र, या माध्यमांतून होणाऱ्या वापरकर्त्यांच्या माहितीचोरीचे प्रकारही वाढत चालले आहेत. यातील प्रत्येक प्रकरण गंभीर नसले तरी, काही प्रकरणांचा तपास करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणांची मदत घ्यावी लागते. परंतु, या यंत्रणांच्याही मर्यादा स्पष्ट आहेत. अशा वेळी वापरकर्त्यांनेच सजग राहून समाज माध्यमांवरील धोके समजून घेणे आवश्यक आहे.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

संवाद वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अवश्य केला पाहिजे. मात्र, त्यावर फोटो किंवा अन्य खासगी माहिती ठेवणे पूर्णपणे योग्य राहणार नाही. विशेषत: फोटो अपलोड करताना हात जरा आखडता घेतला पाहिजे. अन्यथा अपप्रवृत्तींच्या हाती ही माहिती वा छायाचित्रे गेल्यास वापरकर्त्यांला त्याचा मोठा धोका संभवतो.

सोशल मीडियावरील विशेषत: फेसबुकवरील अनेक खाती बनावट असतात. या खात्यांच्या माध्यमातून कुणाचीही छायाचित्रे वा माहिती प्रसारित केली जाते. त्यामुळे विश्वासार्ह खात्यावरून आलेली माहितीच नेहमी शेअर करत राहा. फेसबुकवर कुणाचीही ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ कबूल करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या प्रोफाइलमधील माहिती अवश्य तपासून पाहा. अनेकदा आपल्या ओळखीच्या नावाच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीचे छायाचित्र असलेल्या खात्याकडून आलेली ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ तुमच्यासाठी सापळा असू शकतो. अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या प्रस्तावांना नकार द्याच. परंतु, ओळखीच्या व्यक्तीकडून येणाऱ्या प्रस्तावांचीही योग्य पडताळणी करूनच त्यावर निर्णय घ्या.

तुमची खासगी माहिती, छायाचित्रे सरसकट सार्वजनिक करू नका. मुळात खासगी आयुष्यातील छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित करताना भान राखा. त्याचप्रमाणे ही छायाचित्रे ठरावीक आणि विश्वासार्ह व्यक्तींसोबतच शेअर करा. आपल्या कुटुंबातील विशेषत: लहान मुला-मुलींची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवरून प्रसारित करण्याची अनेकांना हौस असते. मात्र, ही हौस महागात पडू शकते. फेसबुकवरून शेअर झालेल्या अशा छायाचित्रांच्या आधारे शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना अनेकदा उघड झाल्या आहेत. त्यामुळे मुलांची खासगी वा गोपनीय माहिती उघड होईल, अशी छायाचित्रे शेअर करणे शक्यतो टाळा.

सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती नमूद करताना सर्वच तपशील नोंदवू नका. विशेषत: जन्म तारीख, शाळा, आई-वडिलांची नावे अशा प्रकारची माहिती हॅकर मंडळींसाठी आयते कुरण ठरू शकते. या माहितीचा वापर करून हॅकर तुमच्या आर्थिक व्यवहारांचा छडा लावू शकतात व त्यात फेरफारही करू शकतात. अनेक जण नेटबँकिंगचे पासवर्ड आपली जन्म तारीख किंवा आईवडिलांचे नाव ठेवतात. अशा वेळी फेसबुक किंवा अन्य कोणत्याही समाजमाध्यमावरून मिळालेली तुमची माहिती हॅकरना तुमचे बँक खाते हॅक करण्यासाठी व त्यातून रक्कम लंपास करण्यासाठी मदत करू शकते.

सायबर गुन्हे म्हणजे काय?

संगणक, मोबाइल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्‍सचा गैरवापर करून एखादी व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोहचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा.

सायबर गुन्ह्यांचे प्रकार

वैयक्तिक स्वरूपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), हॅकिंग (डिनायल ऑफ सव्‍‌र्हिस), अश्लील मजकूर म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या भाषेत ‘पोर्नोग्राफी’, कॉपीराइट व बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन आदी गुन्हे सायबर गुन्हा या प्रकारात मोडतात.

सुरक्षित ब्राऊजिंगसाठी..

*  मोबाइल बँकिंगचा वापर करताना ‘स्क्रीन लॉक’चा पर्याय सक्रिय ठेवा.

* बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती (उदा. खाते क्रमांक, एटीएम पिन, नेटबँकिंग पासवर्ड इ.) आपल्या मोबाइलमध्ये स्टोअर करून ठेवू नका.

* सोशल मीडियाचा वापर करताना ‘मालवेअर’पासून सावध राहा. कोणत्याही प्रकारच्या अनोळखी वा संशयास्पद लिंक, जावा फाइल, फ्लॅश प्लेअर फाइल डाऊनलोड अथवा रन करू नका.

* बँक किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पासवर्डची नोंद करताना केवळ तुम्हालाच माहीत असेल अशा सांकेतिक अंक व अक्षरांचा वापर करा. जन्म तारीख, स्वत:चे नाव किंवा इतरांना सहज माहीत करून घेता येईल, अशा प्रकारचे पासवर्ड ठेवू नका.

* संगणक वा मोबाइलवरून समाज माध्यमे किंवा नेटबँकिंगवर ‘लॉगइन’ करताना ब्राऊजरसाठी विचारण्यात येणारा ‘रिमेंबर पासवर्ड’चा पर्याय नेहमी बंद ठेवा.

* सार्वजनिक ठिकाणच्या संगणकांवरून ब्राऊजिंग केल्यानंतर ‘ब्राऊजिंग हिस्ट्री’ आणि ‘कुकीज’ हटवायला विसरू नका.

* ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ वापरताना ‘इनप्रायव्हेट ब्राऊजिंग’ या सुविधेचा वापर करा.

*  संशयास्पद ई-मेल खुले करू नका वा त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

सायबर कायदा काय?

* अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंड विधानाच्या २९२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊ  शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.

* माहिती तंत्रज्ञानाचे कलम ६६ हे संगणकाशी संबंधित गुन्ह्य़ांसाठी वापरले जाते.  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६६ (अ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

*  ‘आयडेंटिटी थेफ्ट’ म्हणजे ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल ६६(क) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ  शकते.

*  ‘प्रायव्हसी’च्या उल्लंघनाबद्दल ६६(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ  शकते.

* आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल ६७(अ) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ  शकते.

*  अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६७ (ब) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

– योगेश हांडगे,

लेखक पुणे इन्सिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी ह्य़ा संस्थेत सहाय्यक प्राध्यापक आहेत.