20 November 2017

News Flash

जलद अँड्रॉइड

आपला स्मार्टफोन वेगाने कसा काम करू शकेल याबाबतील काही टिप्स.

 नीरज पंडित | Updated: August 22, 2017 2:06 AM

स्मार्टफोन

आपला स्मार्टफोन अनेकदा कमी वेगाने काम करू लागतो. तर अनेकदा आपल्याला मेमरी लो असा संदेश येतो. या सर्वामुळे आपला स्मार्टफोन वापराचा वेग कमी होतो. यामुळे अनेकदा ऐन कामाच्या वेळी आपल्याला अ‍ॅप सुरू होण्याची वाट पाहावी लागते. या सर्वात आपला स्मार्टफोन वेगाने कसा काम करू शकेल याबाबतील काही टिप्स.

अ‍ॅप कॅचे

आपल्या फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स असे आहेत की ज्याचा वापर आपण फार क्वचित करतो. पण ते अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये असणेही महत्त्वाचे ठरते. यामध्ये मोबाइल पाकिटांचे अ‍ॅप्स असतील किंवा विमान, हॉटेल आरक्षण करणारे अ‍ॅप्स असतील. याचा वापर आपण कधीतरी करतो. पण त्याचा फायदा नक्कीच होतो. अशा कमी वापरातील तसेच वापरातील अ‍ॅप्सचे कॅचे डेटा आपण नियमित उडविला पाहिजे. त्यामुळे आपल्या मोबाइलच्या रॅमचा वापर नियंत्रित होऊन मोबाइल वेगाने काम करू शकतो. हे करण्यासाठी तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप इन्फोमध्ये जा व प्रत्येक अ‍ॅप सुरू करून तेथे दिलेल्या क्लिअर कॅचे डेटा या पर्यायावर क्लिक करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या अ‍ॅप छायाचित्र आणि व्हिडीओ अ‍ॅपमध्ये कॅचे जमा होण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे खास करून या अ‍ॅप्सचा कॅचे डेटा नियमित उडविणे आवश्यक आहे.

मेमरी क्लीअर करा

अँड्रॉइडमध्ये व्यवस्थापनाचे कौशल्य खूप चांगले आहे. ही प्रणाली अनावश्यक अ‍ॅप आवश्यकता नसताना आपोआप बंद करतात. पण या सर्वामुळे तुमच्या फोनच्या रॅमवर येणारा ताण कमी होत नाही. आता प्रत्येक लाँचरमध्ये प्रणालीची मेमरी कमी करण्याचे पर्याय दिलेले असतात. जर तुमच्या फोनमध्ये ते नसेल तर तुम्ही मेमरी क्लीनिंग अ‍ॅप डाउनलोड करून घ्या. पण ते करत असताना केवळ रॅम क्लीअर करणारे अ‍ॅप्सच डाउनलोड करा. अन्यथा तुम्ही दुसरे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड केल्यास तुमचा फोन जलद होण्याऐवजी अधिक धिमा होऊ शकतो.

अ‍ॅपची लाइटर आवृत्ती वापरा

तुम्हाला आवश्यक असलेल्या अ‍ॅप्सची लाइटर आवृत्ती उपलब्ध असेल तर तुम्ही ती आवृत्ती डाउनलोड करा आणि वापरा. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, ओपेरा यांसारख्या अ‍ॅपची लाइटर आवृत्ती उपलब्ध आहे. लाइटर आवृत्तीच्या अ‍ॅपमुळे तुमच्या मोबाइल डेटाचा वापर कमी होतो आणि बिलही कमी येते. तसेच तुमच्या मोबाइलच्या रॅमचा वापरही कमी होतो.

अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी विचार करा

गुगल प्ले स्टोअरवर लाखो अ‍ॅप उपलब्ध आहेत. पण यातील सर्वच अ‍ॅप चांगल्या उद्देशाने बनविलेले असतात असे नाही. यामुळे आपल्याला आवश्यक असलेले अ‍ॅप्सच डाउनलोड करावेत. आपल्या मित्राने लिंक पाठवली म्हणून अ‍ॅप डाउनलोड करावे असे करू नका. कारण अनेक अ‍ॅप्स हे फेक असतात. ते तुमच्या मोबाइवर ताबा मिळवण्यासाठी तयार केलेले असतात. तसेच अनेक अ‍ॅप्स तुमच्या मोबाइलमधील माहिती चोरी करण्यासाठी वापरली जातात. काही दिवसांपूर्वीच गुगलने प्ले कंट्रोल प्रोटेक्ट टूल विकसित केले आहे. ज्याचा वापर तुम्ही अ‍ॅपच्या स्कॅनिंगसाठी करू शकता. याचा वापर करून तुम्ही तुमचा फोन अधिक जलद काम करू शकता. तसेच अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हताही तपासून पाहू शकता.

फॉरमॅट एसडी कार्ड

जर तुमचा स्मार्ट फोन सातत्याने बंद होत असेल तर त्यासाठीच्या विविध कारणांमध्ये तुमच्या फोनमध्ये करप्ट असलेले एसडी कार्डाचे कारणही असू शकते. यामुळे तुमचे एसडी कार्ड फॉरमॅट करून पाहा. यामध्ये अनेकदा अँड्रॉइड प्रणालीमधील अनावश्यक फाइल्स शिरकाव करतात. यामुळे तुमच्या फोनच्या वेगावर परिणाम होत असतो.

अ‍ॅप अपडेट ओन्ली ओव्हर वायफाय

अनेकदा आपल्या मोबाइलमध्ये अ‍ॅप अपडेट करण्याची सूचना येत असते. यामध्ये जर आपण ऑटो अपडेटचा पार्याय निवडला तर ते अ‍ॅप आपोआप अपडेट होत असतात. यामध्ये अनेकदा तुमच्या फोनमधील फाइल्स, छायाचित्र, व्हिडीओज या सर्व गोष्टी अपडेट होत असतात. ही अपडेटची प्रणाली तुम्ही केवळ वायफायशी जोडलेले असतानाच वापरा. जेणेकरून तुमचे इंटरनेटचे बिल नियंत्रित होईल तसेच तुमच्या नकळत अ‍ॅप्स अपडेट होत राहणार नाहीत. तसेच मोबाइल डेटासाठी बॅकग्राउंड डेटाही बंद करून ठेवावा. तसेच तुम्ही ऑटो सिंकचा पर्याय बंद ठेवा. केवळ कॉन्टॅक्ट्स सिंक ठेवल्यास तुम्ही नव्याने कॉन्टॅक्ट अ‍ॅड केल्यावर ते गुगलशी सिंक होतील. याचबरोबर फोटो आणि व्हिडीओ सिंकिंग ऐच्छिक ठेवा. जर सिंकिंग होत असेल तर फोनचा काम करण्याचा वेग मंदावतो.

होमस्क्रीनवर मर्यादित अ‍ॅप्स ठेवा

तुम्ही तुमच्या होमस्क्रीनवर मर्यादित अ‍ॅप्स ठेवा. अगदी एकही अ‍ॅप ठेवले नाही तरी चालेल. कारण यामुळे अ‍ॅपच्या डिरेक्टरीत आणि होमस्क्रीन अशा दोन्ही ठिकाणी तुमच्या अ‍ॅपच्या आयकॉनसाठी आवश्यक असलेली मेमरी खर्ची होते. यामुळे अनेकदा अ‍ॅप सुरू होण्यास अनेकदा वेळ लागतो. ही अडचण विशेषत: गेमिंग अ‍ॅपच्या वेळी जाणवते.

नीरज पंडित @nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com

First Published on August 22, 2017 2:06 am

Web Title: how to make android phone fast
टॅग Android Phone