फेसबुक हे वापरकर्त्यांमध्ये कितीही लोकप्रिय असले तरी, सोशल मीडियाचे हे व्यासपीठ अनेकदा वैतागवाणेही ठरते. विशेषत: आपली कोणतीही अपेक्षा नसताना ‘फेसबुक’वरून पाठवले जाणारे वाढदिवस, लाइव्ह व्हिडीओ किंवा कमेंटसारखे ‘नोटिफिकेशन्स’(सूचना.) बऱ्याचदा आपल्या नकळत आपण अशी अनुस्मारके (रिमाइंडर्स) पाठवण्याची परवानगी फेसबुकच्या अ‍ॅपला देऊन बसतो. परंतु नंतर त्यांचा आपल्या फोनवर असा काही मारा होतो की, ‘स्मरण नको पण अनुस्मारके आवरा’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. तुम्हालाही फेसबुकच्या रिमाइंडर्सचा असा अनुभव येत असेल तर खालील टिप्सचा अवलंब करून तुम्ही ही अनुस्मारके बंद करू शकता.

फोनवरील ‘रिमाइंडर्स’ बंद करण्यासाठी..

तुम्ही आयफोन किंवा आयपॅडवर फेसबुक अ‍ॅप वापरत असाल तर ‘नोटिफिकेशन’ बंद करण्यासाठी खालील कृती करा.

’ फेसबुकचे अ‍ॅप सुरू करा.

’ डाव्या हाताला खालील बाजूस असलेल्या ‘मोअर’ या बटनावर ‘टॅप’ करा.

’ ‘सेटिंग’वर क्लिक करा आणि अकाउंट सेटिंग सुरू करा.

’ अकाउंट सेटिंगमध्ये ‘नोटिफिकेशन’वर क्लिक करा. येथे तुम्हाला बर्थडे रिमाइंडर आणि लाइव्ह व्हिडीओ यासारखे नोटिफिकेशनचे पर्याय दिसतील. त्यातील अनावश्यक पर्याय बंद करा.

अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी.

* फेसबुक अ‍ॅप सुरू करा.

* अ‍ॅपच्या वरील बाजूस असलेले आडव्या तीन रेषांचे चिन्ह क्लिक करा.

* अकाउंट  सेटिंगमध्ये जा.

* तेथे ‘नोटिफिकेशन’चा पर्याय निवडून अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा.

‘गेम’चे नोटिफिकेशन कसे रोखाल?

वाढदिवस आणि लाइव्ह व्हिडीओखेरीज ‘कॅण्डीक्रश’, ‘८ बॉल पूल’ यासारख्या गेमचे किंवा इतर अ‍ॅपचे नोटिफिकेशनदेखील आपल्याला वारंवार येत असतात. हे ‘नोटिफिकेशन्स’ बंद करण्यासाठी फेसबुक अ‍ॅपच्या सेटिंग पेजवर जा. तेथे तुम्हाला पुन्हा फेसबुकवर ‘लॉगइन’ करावे लागले. तेथे ‘गेम अ‍ॅण्ड अ‍ॅप नोटिफिकेशन’ या पर्यायापुढील ‘एडिट’चे बटन टॅप करा. त्यातून तुम्ही अनावश्यक नोटिफिकेशन रद्द करू शकता.