16 December 2017

News Flash

हवा में उडता जाये

कुठल्या प्रकारची ड्रोन्स विकत घेता येऊ  शकतात याचं उत्तर म्हणजे कुठल्याही प्रकारची असंच आहे.

पुष्कर सामंत | Updated: July 25, 2017 4:34 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ड्रोनविषयीची जुजबी माहिती आपण गेल्या भागात पाहिली. पण ड्रोनविषयची माहिती व्यापक आहे. आणि त्याहीपेक्षा हे ड्रोन कॅमेरा हाताळणं जरा जिकिरीचं आहे. बाजारात सध्याच्या घडीला अनेक प्रकारची ड्रोन्स उपलब्ध आहेत. पण शिकाऊ  किंवा नवशिक्यांनी शक्यतो क्वाडकॉप्टरचा वापर करावा.

क्वाडकॉप्टरना सामान्यत: इंग्रजी एक्स किंवा एच अक्षरांची फ्रेम असते. विश्वसार्ह आणि उडवण्यास तुलनेने सोपं आणि स्थिर म्हणून क्वाडकॉप्टरकडे बघितलं जातं. साधारण एक किलोपर्यंतचं वजन व्यवस्थित पेलण्याची तसंच १०-१५ किमी प्रतितास इतक्या वेगाचे वारे वाहत असतानाही उडण्याची क्षमता  क्वॉडकॉप्टरमध्ये  असते. क्वाडकॉप्टरविषयी अधिक जाणून घेण्याआधी त्याची विविध अंगं बघू या.

ड्रोनचे भाग – फ्रेम, मोटर्स, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर (ईएससी), फ्लाइट कंट्रोल बोर्ड, रेडिओ ट्रान्समीटर आणि रिसीव्हर, प्रोपेलर्स, बॅटरी आणि चार्जर हे कुठल्याही क्वॉड्राकॉप्टरचे महत्त्वाचे भाग आहेत.

ट्रान्समीटर/रिमोट कंट्रोल – ड्रोनला किंवा क्वाडकॉप्टरला उडवण्यासाठी तसंच सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करण्यासाठी कंट्रोलचा वापर केला जातो.

प्रोपेलर्स – पायलटच्या आज्ञांनुसार हे प्रोपलर्स फिरतात आणि ड्रोन हवेत उड्डाण करतं. प्रोपेलर्सच्या फिरण्याच्या वेगानुसार क्वॉडकॉप्टरची हालचाल होत असते.

कॅमेरा – बहुतांश क्वॉडकॉप्टर्स ही कॅमेरासहित येतात. तर काहींना वेगळा कॅमेरा जोडण्याची सुविधा असते. त्यामुळे सुरुवातीला कॅमेरा काढून ड्रोन उडवण्याचा सराव करावा. जेव्हा क्वॉडकॉप्टर उडवण्याचा सराव करत असाल तेव्हा काही गोष्टी लक्षात घ्या.

* पहिल्यांदाच उडवत असाल तर लोक, गाडय़ा, इमारती, घरं यांच्यापासून लांब मोकळ्या जागी उडवण्याचा सराव करा. काही दिवस, महिने सतत सराव केल्यानंतर क्वॉडकॉप्टरवर बऱ्यापैकी हात बसतो.

* मागे सांगितल्याप्रमाणे जिथे सराव करणार आहात तिथल्या कायदे-नियमांचा आधी अभ्यास करा. आणि त्याचं पालन करूनच क्वॉडकॉप्टर उडवा.

* ज्याप्रमाणे स्कूटर, गाडी चालवण्याचं प्रशिक्षण घेताना सुरुवातीला सावकाश चालवण्यास शिकवतात तसंच क्वॉडकॉप्टरच्या बाबतीतही आहे. संथपणे, सावकाश चालवायला शिकलं की मग ड्रोनवरचा कंट्रोल पक्का होतो.

* गर्दी असणाऱ्या भागात शक्य तो ड्रोन उडवू नका. अनेक ठिकाणी तसं करणं बेकायदेशीर आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते धोकादायक ठरू शकतं. त्याशिवाय ५०० फुटांपेक्षा वर आणि विमानतळाच्या आसपास उडवू नका. तसंच क्वॉडकॉप्टर उडवण्याआधी हवामानाची स्थिती बघा.

* क्वॉडकॉप्टरला जोडलेल्या कॅमेरासोबत काही प्रयोग करा. त्यावरचे सेटिंग्ज बदलून कुठल्या प्रकारचा फोटो, व्हिडीओ चांगल्या प्रकारे चित्रित होतो ते बघा. याबाबतीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रोन उडवण्याआधी याबाबत निश्चिती करा. म्हणजे कुठल्या प्रकारचा फोटो, व्हिडीओ हवा आहे, कुठल्या अँगलने तो चित्रित करायचा आहे हे आधीच ठरवा आणि मग त्याचा अवलंब करा. यातून दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे क्वॉडकॉप्टरचा वापर नेटका होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरी वाचते. सराव झाल्यानंतर क्वॉडकॉप्टर उडवण्याआधी खालील गोष्टी नक्की तपासून बघा

* जर का कॅमेरा जोडलेला असेल तर त्यामध्ये एसडी कार्ड आहे की नाही याची चाचपणी करा.

* ट्रान्समीटर, क्वॉडकॉप्टरची बॅटरी चार्ज आहे ना हे तपासून पाहा.

* बॅटरी घातल्यानंतर ती बरोबर पद्धतीने घातली असल्याची खात्री करून घ्या.

* प्रत्येक प्रोपेलर व्यवस्थित आहे ना याचीही खात्री करून घ्या.

*  क्वॉडकॉप्टरचा कुठलाही भाग, पार्ट सैल नाही ना हेसुद्धा एकदा तपासून बघा.

* ट्रान्समीटर सुरू करण्यापूर्वी थ्रोटल म्हणजे सामान्यत: डावी स्टिक (रिमोट कंट्रोलची) खालच्या बाजूला आहे ना ते तपासून बघा.

* क्वॉडकॉप्टरपासून तीन-चार फुटांवर उभं राहून मग ऑपरेशनला सुरुवात करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, क्वॉडकॉप्टरची प्रोपेलर्स धारदार आणि वेगवान असतात. त्यामुळे त्यामध्ये बोट, हात घालण्याचा खोडसाळपणा करू नका.

कुठल्या प्रकारची ड्रोन्स विकत घेता येऊ  शकतात याचं उत्तर म्हणजे कुठल्याही प्रकारची असंच आहे. पण सुरुवातील उडवण्यास, हाताळण्यास सोपी क्वॉड्राकॉप्टर्स विकत घेणं सोयीचं ठरेल. खाली त्यापैकी काहींचे ब्रॅण्ड्स, नावं, किमती देत आहोत. तसंच कुठून विकत घेता येऊ  शकतात याच्या वेबसाइट्सही देत आहोत.

याव्यतिरिक्तही अनेक ड्रोन कॅमेराज बाजारात उपलब्ध आहेत. तसंच ड्रोन आणि कॅमेरा असं वेगवेगळंही विकत घेता येऊ  शकतं. नवशिके असाल तर नीट चौकशी करून सुरुवातीला स्वस्त किमतीचे ड्रोन कॅमेरा घेणं सोयीचं ठरेल.

 

First Published on July 25, 2017 4:25 am

Web Title: quadcopters best for beginners
टॅग Drones,Quadcopters