झपाटय़ाने बदलत असलेल्या तंत्रविश्वात सुरू वर्ष आभासी वास्तवाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचा प्रत्यय आपल्याला तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून येतच आहे. आभासी वास्तवाला महत्त्व देत अनेक उत्पादने बाजारात आली आहेत. यामध्ये गेम्सचा विशेष भरणा आहे. नेत्रदीपक असे हे सर्व गेम्स अनुभवण्यासाठी आपल्याला एक चष्मा परिधान करावा लागतो. त्याच्या मदतीने आपण आभासी विश्वात पोहोचतो. अर्थात या उपकरणाला तंत्रज्ञानाच्या भाषेत व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट असे म्हणतात. सध्या बाजारात अशा विविध हेडसेट्सनी गर्दी केली आहे. तसेच याला चांगली मागणीही आहे. पाहूयात काही हेडसेट्स.
झेब्रॉनिक्स
झेब्रॉनिक्सने बाजारात आणलेला व्हीआर हेडसेटचे हार्डवेअर हे सर्व प्रकारच्या मोबाइलना जोडता येणार आहे. हा हेडसेट वापरण्यासाठी आपल्याला आपल्या फोनमध्ये गुगल कार्डबोर्ड हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर क्यूआर कोडच्या माध्यमातून आपण हेडसेट आणि आपला फोन जोडू शकतो. कार्डबोर्ड या अ‍ॅपमध्ये व्हीआरवर आधारित अ‍ॅप्स आणि गेम्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये थ्रीडी गेम्सचे कलेक्शन्स आहेत. यामुळे आपल्याला आभासी जगातील नावीन्यपूर्ण गोष्टी उपलब्ध होतात. चेन्नईस्थित या कंपनीने तयार केलेला हा हेडसेट इतरांपेक्षा जरा हटके असून या हेडसेटच्या माध्यमातून आभासी जगात वावरताना कोणतीही अडचण जाणवत नाही. अनेक हेडसेट वापरत असताना आपल्याला अनेकदा खाली छोटीशी पोकळी राहते व आजूबाजूच्या गोष्टी दिसतात; पण या हेडसेटच्या बाबतीत असे घडत नाही. याचबरोबर अनेक हेडसेट हे डोळय़ांना किंवा चेहऱ्याला टोचणारे असतात. मात्र झेब्रॉनिक्स या कंपनीने याची काळजी घेत हेडसेटच्या सर्व बाजूंना मऊ अशी उशी दिली आहे. तसेच डोक्यात लावता यावा असा पट्टाही देण्यात आला आहे. यामुळे हेडसेट आपल्या चेहऱ्यावर पक्के बसतात आणि आपण वास्तवातील विश्वातून पूर्णत: आभासी जगात जाऊ शकतो. याशिवाय या हेडसेटमध्ये आपण जे पाहात आहोत त्याचा फोकस अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे आपण आभासी जगातील चित्र हेडसेटमध्येच अधिक जवळून किंवा लांबून पाहू शकतो. हेडसेटमध्ये फोन ठेवण्यासाठी देण्यात आलेली जागा अगदी सुरक्षित असून त्या जागेत फोन ठेवल्यामुळे कोणताही धोका जाणवत नाही. तसेच या जागेत आपण सहा इंच स्क्रीन असलेला कोणताही फोन ठेवू शकतो.
किंमत: १४०० रुपये असून स्नॅपडील या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे.

पीट्रोन
नेत्रदीपक अशी वैशिष्टय़े आणि आकर्षक रचनेमुळे पीट्रोन या कंपनीचा हेडसेट चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये तुम्हाला हाय डेफिनेशन गेमिंगचा चांगला अनुभव घेता येऊ शकतो. हे उपकरण वापरण्यासाठी आपल्याला डोळय़ांनी नियंत्रण करावे लागते. आपली नजर हीच आपल्या संपूर्ण मोबाइलवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. आपल्याला मोबाइलमधील एखादा पर्याय निवडायचा असेल तर आपल्याला आपली नजर त्या पर्यायाकडे घेऊन जावी लागते. मग आपण तो पर्याय निवडू शकतो. हे वापरण्यासाठी आपल्याला आपला फोन हेडसेटमध्ये देण्यात आलेल्या फोनसाठीच्या जागेत ठेवावा लागतो.
किंमत : १४९९ रुपये

अ‍ॅग्नुस
हा हेडसेटही वापरकर्त्यांच्या दृष्टीने सुलभ अशा रचनेत बनविण्यात आला आहे. कमी किमतीत जास्तीत जास्त फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. झेब्रॉनिक्सप्रमाणेच हाही कुलपॅडच्या मदतीने चालतो आणि आपल्याला आभासी जगातील अ‍ॅप्स, गेम्स आणि व्हिडीओज उपलब्ध करून देतो. या हेडसेटच्याही चारही बाजू चामडय़ाने मऊ करण्यात आल्या आहेत. यात फोकस अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधा देण्यात आली असून विशेष बाब म्हणजे यात हेडफोन जॅक देण्यात आला आहे. यामुळे आपण हेडफोन लावून व्हिडीओचा किंवा गेमचा आवाज ऐकू शकतो. यामध्ये उच्च दर्जाचे ऑप्टिकल लेन्सेस वापरण्यात आल्या आहेत. यामुळे दृश्यानुभव अधिक दर्जेदार होतो.
किंमत : २४९९ रुपये. हा हेडसेट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

आयरुस प्ले
यामध्ये अद्ययावत प्रॉडक्शन तंत्रज्ञानाधारित लेन्सेसचा वापर करण्यात आला आहे. यातील चित्र अधिक दर्जेदार दिसावे यासाठी व्हॅक्यूम लॉन वापरण्यात आला आहे. यामुळे आपल्याला आभासी जगातील पात्रांशी, वस्तूंशी किंवा गेम्समधील पात्रांशी अधिक जवळीक साधता येते. यामध्ये फोकस अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे चष्मा असलेली व्यक्तीही अधिक चांगल्या प्रकारे आभासी जगातील चित्रफिती पाहू शकते. या हेडसेटला हेडफोन जॅक नसल्यामुळे आपल्याला मोबाइलमधील आवाज मोठा ठेवून चित्र पाहावे लागते, जेणेकरून आपण त्याचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकू.
किंमत : २४९९ रुपये असून हे हेडसेट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

डोमो एनहान्स
हा हेडसेट सर्वात स्वस्त असून यामध्ये थ्रीडी व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी अनुभवता येणे शक्य आहे. हा हेडसेट सर्व स्मार्टफोनसोबत काम करू शकतो. हा हेडसेट वापरताना आपला अँड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोनवर कंपनीचे एक अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुमचा फोन हेडसेटशी जोडला जातो. यामध्ये आय ट्रॅकिंग तंत्रज्ञानाऐवजी हेड ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे आपल्याला एखादा पर्याय निवडण्यासाठी संपूर्ण चेहरा हलवावा लागतो. हा हेडसेट गुगल कार्डबोर्डसारखाच विकसित करण्यात आला असून कार्डबोर्डमध्ये अनुभवता येणारे सर्व अ‍ॅप्स आणि व्हिडीओज याही अ‍ॅपच्या माध्यमातून अनुभवता येऊ शकतात.
किंमत : १२९० रुपये. हा हेडसेट फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
– नीरज पंडित
@nirajcpandit
Niraj.pandit@expressindia.com