अनेक वर्ष मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या गावांना कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट करून पुन्हा या गावांना विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे. त्यामुळे या गावांचा समावेश महापालिकेत होणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  
या निवेदनावर मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, कल्याण पूर्वचे आमदार जगन्नाथ शिंदे, गणपत गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार या उद्देशातून ग्रामस्थांनी या भागात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊन दिल्या नाहीत. या गावांची कल्याण डोंबिवलीत पालिकेत समाविष्ट होण्याची तयारी नाही. त्यामुळे जोर जबरदस्तीने या गावांना पालिकेत सहभागी करू नये. १८ गावांची स्वतंत्र नगरपालिका, अंबरनाथ तालुक्यातील ९ गावांची नगरपंचायत आणि नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावांना नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करून या गावांना नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. या गावांची नगरपालिका, नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी आहे. त्यामुळे या गावांमध्ये जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर ग्रामस्थांकडून या निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. हा विचार करून या भागासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी आमदारांनी शासनाकडे केली आहे.

नऊ गावांची मागणी
२७ गावांच्या गटात सहभागी असलेल्या अंबरनाथजवळील नऊ गावांना कल्याण-डोंबिवली पालिकेचा भौगोलिक व प्रशासनाच्या दृष्टीने कोणताही लाभ नाही. या गावांना तहसीलदार, प्रांत, पंचायत समिती, शेतीविषयक सुविधांसाठी नियमित अंबरनाथ येथे जावे लागते. दळणवळणाच्या दृष्टीने अंबरनाथ सोयीचे पडते. केडीएमसीत ही गावे सहभागी केली तर कर पालिकेत भरायचा आणि शेतीविषयक कामांसाठी अंबरनाथला फे ऱ्या मारायच्या, अशी ओढाताण या भागातील रहिवाशांची होईल. त्यामुळे नऊ गावांना शक्य असेल तर अंबरनाथ पालिकेत समाविष्ट करा, अन्यथा या गावांची नगरपंचायत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी बळीराम तरे यांच्या पुढाकाराने आमदार किसन कथोरे यांच्याकडे केली आहे.