पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर जास्त गुन्हे

ठाणे : करोनाकाळात संपूर्ण प्रशासकीय, पोलीस यंत्रणा व्यग्र असतानाही भ्रष्टाचाराची प्रकरणे डोके वर काढत आहेत. ठाणे जिल्ह्य़ात गेल्या दीड वर्षांत लोकसेवकांनी लाच घेतल्याची ३३ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये महापालिका कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी यांची संख्या जास्त आहे. पालिकेच्या विविध विभागांतील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी, कंत्राटांत टक्केवारी मिळवण्यासाठी किंवा पोलीस ठाण्यात तक्रार मागे घेण्यासाठी समोरील व्यक्तीकडून लाच मागितल्याचे समोर आले आहे.

कोविड काळात शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजाला एक प्रकारची मरगळ आली असली तरी गेल्या वर्ष-दीड वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्य़ात विविध सरकारी कार्यालयात लाचखोरीची ३३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी सर्वाधिक गुन्हे हे विविध महापालिका तसेच पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आले आहेत. दाखल )गुन्ह्य़ांपैकी १२ गुन्हे हे विविध महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात तर, नऊ गुन्हे हे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात आहेत. जिल्ह्य़ातील मोठी महापालिका असलेल्या ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात १२ पैकी पाच गुन्हे दाखल आहेत.

काही महिन्यांपूर्वी टीएमटी बस थांब्यावरील जाहिरात ठेकेदारीत पैसे लाटल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही आजी-माजी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. तसेच करोना रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यात कारवाई थांबविण्यासाठी लाच मागणाऱ्या सात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘आमच्याकडे लोकसेवकांची तक्रार आल्यास आम्ही सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करत असतो. तसेच लाचेचे प्रकार टाळण्यासाठी दरवर्षी जनजागृतीही करण्यात येत असते,’ असे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी म्हटले.