News Flash

३७२ वृक्ष धारातीर्थी!

गेल्या तीन महिन्यांत ठाणे महापालिकेच्या हद्दीतील ३७२ वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अशास्त्रीय वृक्ष छाटणी, काँक्रीटीकरणाचा परिणाम

रस्ते काँक्रीटीकरणाच्या रेटय़ात कमकुवत बनलेली मुळे आणि अशास्त्रीय पद्धतीने केलेली फांद्यांची छाटणी यामुळे ठाणे शहरातील वृक्षसंपदा धोक्यात सापडली आहे. पावसाळय़ापूर्वी फांद्या छाटणीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत असले, तरी गेल्या तीन महिन्यांत ठाणे महापालिकेच्या हद्दीतील ३७२ वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद आहे. तसेच १७९ वृक्ष कोसळण्याच्या बेतात असल्याचे पालिकेच्याच आपत्ती व्यवस्थापन विभागाची आकडेवारी सांगते.

अशास्त्रीय पद्धतीने वृक्ष छाटणी, झाडांभोवतीचे काँक्रीटीकरण हेच वृक्ष उन्मळून पडण्याचे ठोस कारण असल्याचे वृक्ष अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. तीन महिन्यात उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या मोठय़ा संख्येविषयी वृक्ष अभ्यासकांकडून चिंता व्यक्त  करण्यात येत असून, आधीच मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड सुरू असलेल्या ठाण्यात नैसर्गिक आपत्तीत झाडांचा बळी जात असल्याने पर्यावरण अभ्यासकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

पावसाळ्यात झाडे उन्मळून पडू नयेत यासाठी दर वर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर वाढलेल्या फांद्या छाटण्याचे काम महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून करण्यात येते. जून महिन्याच्या शेवटी शहरात वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र वृक्ष पडू नयेत यासाठी हिवाळ्यात- नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत झाडांना पालवी फुटण्याआधी फांद्या कापणे हे शास्त्रीयदृष्टय़ा योग्य असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात येत होते. ठाणे महानगरपालिकेतर्फे होणाऱ्या वृक्ष छाटणीत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत नसल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमींकडून केल्या जात आहेत. कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने वृक्ष छाटणी करत असून रस्त्यावर वाढलेल्या एकाच बाजू्च्या फांद्या कापण्यात येत असल्याचे वृक्ष अभ्यासकांकडून सांगण्यात येत होते. यंदा जून महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसात शहरात काही परिसरात तीसपेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली होती. जुलै महिन्यात पडलेला मुसळधार वादळी पाऊस यामुळे शहरात नौपाडा, कोपरी, उथळसर, वर्तकनगर, मुंब्रा, कळवा, रायलादेवी, लोकमान्यनगर, माजिवडा, मानपाडा या ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या.

तीन महिन्यात पडलेल्या वृक्षांची संख्या मोठी असून हे चित्र चिंताजनक आहे. शहरात अशास्त्रीय पद्धतीने केलेली वृक्ष छाटणी, मुळांभोवतीचे काँक्रीटीकरण यासाठी महत्त्वाचे कारण आहे. भविष्यात अशाच प्रकारे अभ्यासाशिवाय वृक्ष छाटणी होत राहिल्यास वृक्ष पडण्याच्या संख्येत वाढ होईल.

– प्रा. डॉ. नागेश टेकाळे, वृक्ष अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:08 am

Web Title: 372 trees are dead in thane
Next Stories
1 डोंबिवलीतील रेल्वे पादचारी पूल कमकुवत
2 खड्डेमुक्त रस्त्यावर मॅरेथॉनची धाव
3 डोंबवलीत नियमबाह्य़ विद्यार्थी वाहतुकीला चाप
Just Now!
X