भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज (सोमवार) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला, तर किमान ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे पालकमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

या दुर्घटनेतील मृत व्यक्तींमध्ये १) झुबेर खुरेशी(३० वर्ष) २)फायजा खुरेशी(५वर्ष) ३)आयशा खुरेशी(७वर्ष) ४)बब्बू(२७वर्ष) ५) फातमा जुबेर बबु (२वर्ष),६) फातमा जुबेर कुरेशी (८वर्ष),७) उजेब जुबेर (६ वर्ष),८) असका आबिद अन्सारी (१४ वर्ष),९) अन्सारी दानिश अलिद (१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (२८ वर्ष) यांचा समावेश आहे.

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचाव कार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.