आतापर्यंत ८९ टक्के करोनाबाधित आजारातून बरे झाल्याची नोंद

ठाणे : शहरात करोनाचा प्रादुर्भाव अनेक भागात नियंत्रणात येत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्य़ांवर पोहचले आहे. रुग्ण बरे होण्याच्या यादीत ठाणे शहर संपूर्ण राज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या स्थानावर आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये खाटा रिकाम्या राहण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यानंतर शहरात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत होते. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून शहरात १८ दिवस टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात मोठय़ा प्रमाणावर चाचण्या तसेच रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली. सद्य:स्थितीत ठाणे शहरात दिवसाला तीन हजारांहून अधिक चाचण्या होत असून प्रतीजन चाचण्यांची संख्याही बरीच मोठी आहे. रुग्णशोध आणि विलगीकरण मोहिमेचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला असून शहरातील रुग्ण संख्या दररोज सरासरी दोनशेपर्यंत नियंत्रित होऊ लागली आहे.

जास्त देयके आकारणाऱ्या खासगी कोविड रुग्णालयांना महापालिकेने दट्टय़ा दिला होता आणि रुग्णांसाठी औषधे खरेदी करून त्यांच्या उपचारावर भर दिला होता. परिणामी, शहरातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. देशामध्ये रुग्ण बरे होण्यामध्ये दिल्ली राज्य पहिल्या स्थानावर असून त्याखालोखाल ठाणे शहराचा क्रमांक लागत आहे. याशिवाय, संपूर्ण राज्यात ठाणे महापालिका रुग्ण बरे होण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

२३,६३२ एकूण रुग्ण

२०,९८९ (८९ टक्के) बरे झालेले रुग्ण

१८८५ उपचार सुरू असलेले रुग्ण

७५८ मृत्यू

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

८९ टक्के ठाणे

८१ टक्के मुंबई

७८ टक्के पुणे</p>

८२ टक्के नवी मुंबई</p>

८५ टक्के कल्याण-डोंबिवली

राज्य रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के 

दिल्ली ७१ टक्के

महाराष्ट्र ५० दिवसांचा लढा

’ करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्य़ावरून ८९ ते ९० टक्क्य़ांपर्यंत आणण्यासाठी ५० दिवसांचा अवधी लागला असून त्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना कराव्या लागल्या आहेत.

’ करोना चाचण्यांची संख्या वाढविणे, रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचार देणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे विलगीकरण, उपचारासाठी खाटांची संख्या वाढविणे,  अशा उपाययोजना करण्यात आल्या.

’ रुग्णांना तात्काळ उपचार मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले.  महापालिकेची विविध पथके, रुग्णालय प्रशासन या सर्वाच्या मदतीमुळेच हे शक्य झाले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.