एमआयडीसीने अनधिकृत जोडण्या तोडल्या
अंबरनाथ शहराच्या हद्दीवरून काटई नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील एमआयडीसीच्या मोठय़ा जलवाहिनीतून पाणी चोरी करणाऱ्या चोरटय़ांवर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अखेर कारवाई केली आहे. या अंबरनाथ एमआयडीसी विभागातील २३ अनधिकृत जोडण्यांवर कारवाई केली असून यामुळे या भागातील पाणी चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने अंबरनाथ परिसरात ३० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी असूनही या भागातील पाणी चोरांनी मोठय़ा प्रमाणावर जलवाहिनीतून पाणी चोरण्याचा सपाटा लावला होता. काटई नाका ते पुणे दिशेला जाणाऱ्या मार्गावरून ६०० दशलक्ष पाणी वाहून नेणाऱ्या एमआयडीसीच्या तीन मोठय़ा जलवाहिन्यांमधून अंबरनाथ भागात ही पाणी चोरी होत होती. गाडय़ा धुण्याचे सव्‍‌र्हिस सेंटर, ढाबे, वीटभट्टय़ा, शेती आदींसाठी होणाऱ्या या पाणी चोरीवर कारवाई करण्याचे संकेत एमआयडीसीच्या अभियंत्यांनी यापूर्वी दिले होते. या आश्वासनाची पूर्ती करत एमआयडीसीचे अंबरनाथ भागातील कार्यकारी अभियंते राजेंद्र केंद्रे आणि उप अभियंता एस. अंबुरे यांनी बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस धडक कारवाई करत येथे पाईपलाईनला असलेल्या २३ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. अनेक जोडण्या या जमिनीखालून पाईप टाकून मुख्य जलवाहिनीतून घेण्यात आल्या होत्या. जेसीबीने खोदून तसेच काही ठिकाणी हे पाईप कुठून आले आहेत याचा शोध घेत या जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कारवाईत प्लास्टीकचे व लोखंडाचे पाईप जमा करण्यात आल्याचे एमआयडीसीच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.

नेवाळी ते काटई मार्गावर चोरी सुरूच
अंबरनाथ पुढील नेवाळी नाका ते काटई नाका या महामार्गावरून जाणाऱ्या जलवाहीनीतून पाणी चोरी अद्याप सुरूच आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी यावर काही दिवसांपूर्वी धडक कारवाई करत येथील मुख्य जलवाहीनीच्या अनधिकृत जोडण्या तोडल्या होत्या. मात्र या मार्गावरील बंद झालेली गाडय़ा धुण्याची सव्‍‌र्हिस सेंटर पुन्हा सुरू झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे एकदा झालेल्या कारवाईनंतरही पुन्हा याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.