बेकायदा मिरवणूकप्रकरणी ४३ गुन्हे 

 ठाणे : गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाईची तयारी ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी ३५ मंडळांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविले आहेत. या मंडळांवर गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत.

याशिवाय विनापरवाना मिरवणूक, बेकायदा ध्वनिक्षेपक लावणे आणि प्रदूषणाबाबतचे नियम पायदळी तुडविणाऱ्या ४३ मंडळांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना ध्वनी पातळीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये दहा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक मंडळांनी आवाजाच्या पातळीचे नियम पायदळी तुडविले. या संदर्भात ठाणे पोलिसांनी काही ठिकाणी स्वत:हून, तर काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनंतर ध्वनिमापक यंत्राच्या साहाय्याने आवाजाची पातळी मोजली होती. या तपासणीमध्ये ३५ मंडळांनी आवाजाच्या पातळीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. या मंडळांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविले आहेत. ध्वनी प्रदूषणासंबंधीचे गुन्हे दाखल करण्याचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत.

कारवाईचे प्रस्ताव

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशी पाच परिमंडळे आहेत. ठाणे परिमंडळातील ८, कल्याण परिमंडळातील ५, उल्हासनगर परिमंडळातील २० आणि वागळे इस्टेट परिमंडळातील दोन असे कारवाईचे ३५ प्रस्ताव पोलिसांनी तयार केले आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या विभागांचा उल्हासनगर परिमंडळात समावेश आहे. या परिमंडळात कारवाईचे सर्वाधिक प्रस्ताव आहेत.