शहरातील ५५ धोकादायक इमारती पालिका पाडणार

अंबरनाथ : शहरातील धोकादायक इमारती पाडण्याच्या कामाला मंगळवारी अंबरनाथ नगरपालिकेने सुरुवात केली आहे. शहरात एकूण ८८ धोकादायक इमारती असून त्यातील ५५ मोडकळीस आलेल्या इमारतीं पाडल्या जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

भिवंडीतील धोकादायक इमारत कोसळून झालेल्या अपघतानानंतर उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींबाबत सुरू असलेल्या कारवाईची माहिती पालिकांकडून मागवली आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी कल्याण आणि उल्हासनगर महापालिकेने धोकादायक इमारतींच्या पाडकामाला सुरुवात केली होती. मंगळवारी अंबरनाथ नगरपालिकेनेही शहरातील धोकादायक आणि त्यातही मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पाडकामास सुरूवात केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या पाहणीनुसार अंबरनाथ शहरात एकूण १७१ धोकादायक इमारती आहेत. तर त्यातील ८० बांधकांमांचा समावेश अतिधोकादायक इमारतींच्या यादीत आहे. यातील ६ इमारती रिकाम्या आहेत. तर, १५ इमारती या रिकाम्या करून त्यांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील ३० इमारतींचे रचनात्मक परीक्षण शिलल्क असल्याची माहिती पालिकेच्या नगररचना विभागाने दिली आहे. या यादीतील ५५ अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने या इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रेल्वे स्थानक रस्त्यावर पालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या एका दुमजली इमारतीपासून पाडकामाला सुरुवात करण्यात आली. नगरपालिकेचे अधिकारी, पाडकामाची यंत्रणा आणि पोलिसांच्या उपुपरिस्थतीत या कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाई सुरू होताच काही व्यापारी आणि नागरिकांनी या कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र पालिकेने आपली कारवाई सुरूच ठेवली. ही कारवाई यापुढेही कायम सुरू राहणार असून यादीतील ५५ इमारतींचे पाडकाम येत्या काही  दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. तर नागरिकांनी अशा धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या कराव्यात, असे आवाहनही डॉ. रसाळ यांनी केले आहे.