ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे साहित्य संमेलनात प्रतिपादन

विश्वाचे रहस्य साध्या, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वैज्ञानिक साहित्य लिहिले जाणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केले. साहित्य संमेलनातील शं. ना. नवरे सभामंडपात नारळीकर यांच्यासह ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, लेखिका मंगला नारळीकर आदी उपस्थित होते.

विज्ञानावर आधारित कथा किंवा इतर लेखन करणे अवघड असल्याचा गैरसमज आहे. नव्या लेखकांनी वैज्ञानिक संज्ञा नीट समजून घेऊन प्रतिभेच्या सहाय्याने त्या मांडल्या तर वैज्ञानिक दृष्टिकोन रूजण्यास मदत होईल. त्यासाठी लेखकांनी त्या त्या विषयातील वैज्ञानिकांचीही मदत घ्यावी. त्यातून विज्ञानाचा प्रसार होण्यास मोलाची मदत होईल, असे नारळीकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिकत असतानाची एक आठवण सांगितली. थोर विचारवंत ई. एम. फॉस्टर यांनी तेव्हा कुतुहलापोटी माझ्याकडून वैज्ञानिक संज्ञा समजून घेत त्यावर आधारित ‘मशीन स्टॉप्स’ नावाची विज्ञानकथा लिहिली. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित ती रंजककथा मानली जाते, असे नारळीकर म्हणाले.

ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांनी कोकण ते मुंबई असा आपला शिक्षण, त्यानंतर चित्रकारितेचा प्रवास उलगडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर यांनी केले.