मतदानासाठी आलेल्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या गर्दीने नागरिक त्रस्त; कर्जत महामार्गावर पाच तास प्रचंड वाहतूक कोंडी

विधान परिषेदेच्या एका जागेसाठीच्या निवडणुकीमुळे अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांच्या अनेक कामांवर याआधीही परिणाम झाला होता. आता मतदानाच्या वेळीही अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाबाहेरील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडीने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी येथे मत टाकले. या निवडणुकीत मतांची फाटाफूट रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांना गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवकांना ठाण्याहून अंबरनाथ तहसील कार्यालयात आणण्यात आले. या वेळी मत टाकायल्या आलेल्या अनेक नगरसेवकांना घेण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. या समर्थकांनी तहसीलदार कार्यालयाबाहेरच सर्व वाहने उभी केल्याने सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत कर्जत महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले. याआधीही बदलापुरातील नालेसफाईसाठीची सभा सोडून सर्व नगरसेवकांनी गोवा गाठल्याने सभा तहकूब करावी लागली होती.

सध्या कल्याण-बदलापूर रस्त्यावर अंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी विजेची, रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत असते. त्यात आज नगरसेवक समर्थकांनी केलेल्या गर्दीने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. अंबरनाथचा उड्डाणपूल ते अंबरनाथ पोलीस ठाण्यापर्यंत वाहन निघण्यासाठी अर्धा तास लागत होता.

दरम्यान, तहसीलदार कार्यालयात पार्किंगला बंदी असल्याने कार्यालयाच्या बाहेरच अनेकांनी गाडय़ा पार्क केल्याने रस्त्याच्या दुतर्फा गाडय़ांचे पार्किंग क्षेत्र तयार झाले होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या कडेला पाìकग अशा परिस्थितीमुळे नागरिकांना या भागातून मार्ग काढणेही मुश्कील झाले होते.

कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान

अनेक मुद्दय़ांमुळे गाजत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात शांततेत मतदान पार पडले. मतपत्रिकेवरील क्रमांक, त्याचे छायाचित्र काढले जाईल, या भीतीने मतदारांना मतदानगृहात कोणतीही वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र कडक पोलीस बंदोबस्त असल्याने मतदान शांततेत पार पडले.