नायगावच्या कलाकाराकडून टाळेबंदीत बेरोजगारीवर मात

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : टाळेबंदीत रोजगार गमावून बसलेल्या नायगाव येथील रूपेश पंडित यांनी आपल्या कलात्मक प्रतिभेला वाव देत बेरोजगारीवर मात केली आहे. मुळात रंगभूषाकार असलेल्या रूपेशने या काळात मिळालेल्या रिकाम्या वेळात जुन्या आणि टाकाऊ  वस्तूंना नवीन रूप देत आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत. यातून त्याला चांगले पैसेही मिळत आहेत.

सिनेसृष्टीत रंगभूषाकार म्हणून काम करणारा नायगावचा रूपेश पंडित या तरुणाचाही टाळेबंदीमुळे रोजगार हिरावला गेला होता; पण अशाही परिस्थितीत खचून न जात त्याने स्वत:मधील प्रतिभेच्या जोरावर टाळेबंदीच्या काळात उपजीविकेचा वेगळा मार्ग शोधला आहे.

घरात आपल्या आठवणीसाठी जपून ठेवलेल्या जुन्या वस्तू कोणी फेकून दिल्या असतील किंवा कोणी आठवण म्हणून ठेवून दिल्या असतील, तर त्या वस्तूंना एक नवीन रूप देण्याचे काम रूपेश करत आहे. त्याची सुरुवात त्याने आपल्या घरातूनच केली आहे. यासाठी त्याने घरातील जुन्या बाटल्या, जून मेज, मोबाइलचे बॉक्स, झाडाचे खोड, प्लास्टिकचे जुने डबे या वस्तूंपासून त्याने नवनवीन आकर्षक अशा कलाकृती तयार केल्या आहेत.

विशेष म्हणजे टाकाऊ  वस्तूंपासून निर्माण केलेल्या रूपेशच्या या शोभिवंत वस्तूंना मोठी मागणीही आहे. रंगाविष्काराचा छंद जोपासण्यासाठी सुरू केलेल्या या कामातून रूपेशच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला आहे.

या कामात रूपेशला त्याचे मित्रही मदत करीत आहेत. त्यातून त्याला चांगले पैसेही मिळू लागले आहेत. रूपेश आता नैराश्य झटकून तरुणांना सकारात्मक विचार करण्याचे आवाहन समाजमाध्यमातून करत आहे.

टाळेबंदीचा काळ हा रिकामे बसण्याचा नसून अंतर्मुख होऊन आपल्यातील सुप्त कौशल्यांना विविध प्रकारे वाव देण्याचा आहे, असे मी समजतो. टाळेबंदीमुळे काय होईल, असा नकारात्मक विचार न करता आपल्यामध्ये कोणती कला दडून आहे, ते शोधा. या कलेला वाव द्या. यातून बाहेरच्या करोनाला आणि मनातल्या दडपणाच्या करोनाला मात देता येईल.

– रूपेश पंडित, नायगाव, रंगभूषाकार