जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून बदलापुरात दुर्मीळ मराठी भाषेच्या ग्रंथांचा संग्रह असलेल्या ‘स्वायत्त मराठी विद्यापीठा’चे शुक्रवार, २७ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या निमित्ताने २६ ते २८ फेब्रुवारी असे तीन दिवस संकल्पपूर्ती संमेलन संजीवनी मंगल कार्यालय, बदलापूर (पू.) येथे होणार असल्याची माहिती या विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी दिली. श्रीधर पाटील हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून यानिमित्ताने तीन दिवस मराठी भाषेचा जागर होणार आहे.
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता तेलवणे टॉवर, बदलापूर (पूर्व) येथे मराठी शब्दरत्नांचे प्रदर्शन व ग्रंथदालनाचे उद्घाटन उद्योजक दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी, लेखक श्याम भुर्के, रवींद्र गुर्जर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या विद्यापीठाचा मुख्य लोकार्पण सोहळा २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषादिनी संजीवनी मंगल कार्यालय, बदलापूर (पू.) येथे होणार असून पहिल्या सत्रात ‘मराठीची कहाणी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण श्रीराम केळकर व दीपाली केळकर करणार आहेत. ‘दुसऱ्या सत्रात मराठीचे खरे मारेकरी कोण?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी भूषविणार असून भानू काळे, नागनाथ कोतापल्ले, वसंत आबाजी डहाके, मोनिका गजेंद्रगडकर आणि मीना वैशंपायन सहभागी होणार आहेत. २८ फेब्रुवारीला सकाळी १० ते ११.१५ या वेळेत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत प्रा. मिलिंद जोशी घेणार आहेत.
त्यानंतर प्रसिद्ध अनुवादक उषा कुलकर्णी व विरूपाक्ष कुलकर्णी यांना डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते गौरववृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांची प्रकट मुलाखत डॉ. रेखा देशपांडे व रविप्रकाश कुलकर्णी घेणार आहेत. मराठी भाषेच्या या जागरात सर्व मराठीप्रेमींनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी, विश्वस्त श्याम जोशी व स्वागताध्यक्ष श्रीधर पाटील यांनी केले.