News Flash

दुषित पाण्यामुळे कल्याण आगार ‘आजारी’

आगारातील कर्मचाऱ्यांना कावीळ, पोटाचे विकार यांसारखे गंभीर आजार होत आहेत.

स्वच्छतागृहातील पाण्याचा जलवाहिन्यांमध्ये निचरा

कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील स्वच्छतागृहातील मलमूत्राचा निचरा जमिनीखालून गेलेल्या जलवाहिन्यांमध्ये होत असल्याने, कल्याण आगारातील पाण्याच्या टाक्यांमध्ये प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे आगारातील कर्मचाऱ्यांना कावीळ, पोटाचे विकार यांसारखे गंभीर आजार होत आहेत.

कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानकाजवळ मुख्य वर्दळीच्या रस्त्याला खेटून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहे. या आगाराबाहेरील मुख्य रस्ता पालिकेकडून सीमेंटचा करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली. रस्त्याची उंची वाढल्याने आगारात बस, प्रवाशांचा प्रवेश करतानाचा भूभाग खाली गेला आहे. आगारात मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाच्या आजूबाजूने आगाराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या गेल्या आहेत. आगारात प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यामुळे स्वच्छतागृहाचा तितकाच वापर होतो. त्यामुळे बाहेरील स्वच्छतागृहाची चेंबर भरून वाहतात. या वाहत असलेल्या मलमूत्र मिश्रित पाण्याचा निचरा काही प्रमाणात जलवाहिन्यांमध्ये होतो. हेच पाणी आगाराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत जाते. त्यामुळे टाकीतील पाणी प्रदूषित होते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून हा प्रश्न उद्भवला आहे. आता रस्त्याची उंची वाढल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील जलवाहिन्या अन्य भागातून वळविणे, स्वच्छतागृहाखालील चेंबरची डागडुजी करण्याशिवाय पर्याय नाही. आगार आणि पालिका प्रशासनाच्या एकत्रित सहकार्यातून हा प्रश्न सुटणार आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या दूषित पाण्यामुळे अनेक कर्मचारी आगारातील पाणी पित नाहीत. आगारात येणाऱ्या प्रवाशांना हा प्रकार माहिती नसल्याने त्यांना या पाण्याची चव चाखावी लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:25 am

Web Title: bad water problem in kalyan
टॅग : Kalyan
Next Stories
1 पदवीधर शिक्षकांच्या पगारातील वसुली रोखणार
2 चंद्रकांत डोंगरकर यांचे निधन
3 महिला हे बिरुद लावण्याची गरज नाही
Just Now!
X