आग ओकणाऱ्या सूर्यामुळे लाहीलाही होणाऱ्या शरीराला आस असते ती मान्सूनच्या आगमनाची. यंदा तर तीन महिन्यांपासून उन्हाच्या झळांनी जीव नकोनकोसा झाला आहे. त्यामुळे कधी एकदा आकाशात काळय़ा tv08ढगांची गर्दी होऊन पाण्याच्या वर्षांवाने वातावरण थंड होतेय, याची चातकासारखी प्रतीक्षा केली जात आहे. पण ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळय़ात पाणी तुंबून, विद्युतपुरवठा खंडित होऊन, रस्त्यांवर खड्डे पडून शहरवासीयांची उडणारी त्रेधातिरपीटही दरवर्षीचीच बोंब आहे. दरवर्षी पावसाळय़ाच्या आधी महिनाभर ‘मान्सूनपूर्व’ कामे उरकल्याचे दावे केले जातात आणि तरीही ऐन पावसाळय़ात या कामांतील ‘घोटाळा’ उघडा पडून वास्तव समोर येते. याच पाश्र्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांतील मान्सूनपूर्व परिस्थिती आणि पावसाळय़ातील संभाव्य स्थितीचा घेतलेला आढावा.
 केवळ देखावाच!
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नालेसफाईची कामे अनेक वर्षांपासून ठरावीक ठेकेदार, ठरावीक रकमेला फिरत्या खुर्चीवरील अधिकाऱ्यांकडून देण्यात येतात. यावर्षीही सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून ही नालेसफाईही उरकण्यात येणार आहे. नाले सफाईचे कितीही दावे केले गेले, तरी कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे पावसाळ्यात तुंबतात, असे चित्र आहे.
कल्याण-डोंबिवलीतील वेगवेगळ्या प्रभागांमधील नाल्यांची तसेच छोटय़ा गटारांची सफाई करण्यासाठी महापालिकेकडून सुमारे २५ ते ३० लाखाचे ठेके दिले जातात. हे ठेकेदार मजूर संस्थाचालक असतात. स्थानिक नगरसेवक, अधिकाऱ्यांना हाताशी धरून सफाईचे काम मिळवलेले असते. त्यात काही मजूर संस्था या नगरसेवकांचा जोडधंदा असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. हे चालक प्रभागातील गटारसफाई करताना जिथे मॅनहोल आहे त्या गटाराच्या दोन्ही बाजूकडील दहा ते पंधरा फूट अंतरातील गाळ काठीने काढतात. त्यानंतरच्या पुढील भागात त्यांना जाता येत नाही किंवा गटारात उतरता येत नाही. त्यामुळे गटाराची सफाई अर्धवट अवस्थेत सोडली जाते.
महापालिकेचे आतापर्यंत ३० टक्केच नालेसफाईचे काम झाले असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. उर्वरित सत्तर टक्के काम एकदा पाऊस सुरू झाला की हाती घेण्यात येते. कारण नालेसफाई, गटारेसफाई केले तरी लोक नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे थांबत नाहीत. त्यापेक्षा पाऊस सुरू झाला की एकदमच कचरा, गाळ काढणे शक्य होते, असा दावा अधिकाऱ्यांचा आहे.  
तुंबणारे भाग
विठ्ठलवाडी, शिवाजी चौक परिसर, बेतुरकरपाडा, वालधुनी परिसर, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भाग.
पाणी साचण्याची ठिकाणे
महाराष्ट्रनगर, कोपर, भोपर, देवीचापाडा, गरिबाचावाडा, कुंभारखाण पाडा, टिटवाळा, मांडा भागातील बेकायदा चाळींचे परिसर.

भगवान मंडलिक
नालेसफाईतली हातचालाखी!
नीलेश पानमंद
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांकडे वर्षभर ढूंकनही पाहत नसलेल्या महापालिका प्रशासनाला पावसाळा तोंडवर येऊन ठेपल्यावरच या नाल्यांच्या साफसफाईची आठवण येते. मात्र, याचा फटका ठाणेकरांना मुसळधार पावसानंतर हमखास बसतो. सुदैवाने यंदा पालिका प्रशासनाने जरा आधीपासून नालेसफाईची कामे सुरू केल्याने आतापर्यंत ६० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. मात्र, या कामांसाठी दिलेली मुदत संपायला मोजके तीन दिवस उरले असताना उरलेल्या ४० टक्के नाल्यांची सफाई पूर्ण होणार का, हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सफाई झालेल्या नाल्यांचे चित्र पाहिले तर हा कामांचा देखावाच असल्याचे अधिक जाणवते.
दरवर्षी जून महिना उजाडून पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे पूर्ण होत नाहीत. परिणामी शहरातील विविध नाले तुंबण्याचे प्रकार घडतात आणि नाल्याशेजारील घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होते. त्यामुळे वर्षांतून दोनदा नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर थेट यावर्षीच्या मेमध्येच नालेसफाईची मोहीम सुरू झाली. याला कारण पालिकेने थकवलेली ठेकेदारांची बिले. मे महिन्यातील कामांची बिले न दिल्याने ठेकेदारांनी डिसेंबरमध्ये नालेसफाईच्या कामांत सहभागच घेतला नाही. त्यामुळे पालिकेचा निर्णय हवेतच विरला.
एप्रिल उजाडत आल्यानंतर ठेकेदार माघार घ्यायला तयार नसल्याने पालिका प्रशासनाने त्यांची रक्कम देऊन पुढच्या नालेसफाईची प्रक्रिया उरकली. सध्या ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातील सुमारे ३०६ नाल्यांची ५९ ठेकेदारांमार्फत साफसफाईची कामे करण्यात येत असून, त्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
शहरात सुमारे ११७ किमीचे ३०६ नाले आहेत. आतापर्यंत ६० टक्के नालेसफाई झाली असून उर्वरित ४० टक्के नालेसफाई शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. काहीवेळेस ठेकेदार ८० टक्के नालेसफाई करतात आणि उर्वरित २० टक्के कचरा पहिल्या पावसात वाहून जाण्याची वाट पाहतात. याचा फटका किती बसतो हे पावसाळा सुरू झाल्यानंतरच कळू शकेल, तरीही इंदिरानगर, मानपाडा, वंदना, महात्मा फुलेनगर, कळवा व मुंब्रा परिसरातील काही नाले तुंबून आसपासच्या घरात पाणी शिरू नये म्हणून नाल्यांच्या सफाईकडे बारकाईने लक्ष दिल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

बदलापूर, अंबरनाथमध्येही रखडकथाच!
संकेत सबनीस
कुळगांव-बदलापूर नगरपालिकेने पावसाळ्यात होणारी कोंडी रोखण्यासाठी कंबर कसली असून नालेसफाई व अंतर्गत गटारे स्वच्छ करण्याच्या कामांना शहरात सुरुवात केली आहे. मात्र, यंदा १८ मेपर्यंत असलेल्या निवडणुकांमुळे नालेसफाईच्या कामांना उशीर झाला आहे. याचा फटका किती बसतो, ते पावसाळय़ातच समजू शकेल.
 बदलापुरात कात्रप, शिरगांव, जोवेली, खरवई, बॅरेज रोड, हेंद्रेपाडा, बेलवली, मांजर्ली, जुनी नगर परिषद येथील नाला, होप इंडिया परिसरातील नाला, आपटेवाडी रामनगर परिसर तसेच स्टेशन रोडच्या रेल्वे लाइनला लागून असलेला भाग आदी ठिकाणी मोठे नाले असून शहरातील अंतर्गत भागात गटारे आहेत. शहरात या नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडण्याचे प्रकार होतात. हे नाले आकाराने मोठे असल्याने एवढय़ा कमी कालावधीत या नाल्यांची व अंतर्गत गटारांची सफाई करणे हे पालिकेपुढील आव्हान आहे. नव्या रचनेमुळे प्रभाग वाढले असून कचरा मात्र जुन्याच प्रभागांप्रमाणे उचलला जात आहे. त्यामुळे नवीन भागात कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी कचरा साठून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डासनिर्मूलनासाठी विशेष मोहीम
बदलापूर शहरात डासांचे प्रमाण सर्वात जास्त असून दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, चिकुनगुनिया तसेच अन्य साथीचे आजार उद्भवतात. यावर उपाय म्हणून यंदा पालिका मलेरिया डासअळीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आठवडाभर डासअळी निर्मूलन मोहीम राबवणार असून यात गटारे व नाले अशा डासांच्या प्रजनन होणाऱ्या ठिकाणी गप्पी मासे सोडणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी भाऊ निपुर्ते यांनी दिली.
पावसाळ्यापूर्वीची कामे उशिराने
बदलापूरप्रमाणे अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका यंदा झाल्या असल्याने तेथेही पावसाळ्यापूर्वीच्या कामांना उशीरच झाला असून अद्यापही पूर्ण क्षमतेने येथील कामे सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. नालेसफाई व अंतर्गत गटारांची सफाईही अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच शहरातील काही भागांत रस्ते काँक्रीटीकरणाची कामे अजूनही सुरू असून बी-केबिन परिसरातील रस्त्याचे काम काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे व रस्त्याचा काही भाग खोदलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे चिखल साचून राडा झाल्यास याचा फटका वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे.  
पाणी साचण्याची ठिकाणे
ठाणे महापालिका मुख्यालय परिसर, डॉ. अल्मेडा रोड, डेबोनेर सोसायटी, वंदना सिनेमागृहाजवळ, लालबहादूर शास्त्री मार्ग, राम मारुती रोड, गडकरी चौक, गोखले रोड, जिजामाता मंडई परिसर, मासुंदा तलाव, शिवाजी पथ, पंपिंग स्टेशन, चिखलवाडी, एम. जी. रोड, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, रिलायन्स फ्रेश, पंचामृत सोसायटीजवळ, घोडबंदर रोड, आयसीआयसीआय बँकेजवळ, विटावा रेल्वे पुलाखाली, दिवा गाव.

डोक्यावर टांगती तलवार
जयेश सामंत
ठाणे, कळवा, मुंब्राच नव्हे तर जिल्ह्य़ातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि आसपासच्या शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींना यंदाही पावसाळ्यात धोका आहे. पावसाळा तोंडावर येताच सर्वेक्षणाचा देखावा करत धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. दोन वर्षांपूर्वी मुंब्रा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेत ७४ निष्पापांचा बळी गेल्यानंतर ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ६१ इमारती या अतिधोकादायक ठरविण्यात आल्या होत्या. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी तातडीने हालचाली करून यापैकी काही इमारती तात्काळ रिकाम्या केल्या आणि येथील रहिवाशांना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेतील इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मुंब््रयातील सुमारे ५०० हून अधिक कुटुंबांना अशाप्रकारे ठाण्यातील वर्तकनगर परिसरात हलवण्यात आले. मात्र ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आपले काम संपले, अशा आविर्भावात ठाणे महापालिका प्रशासन वावरत आहे. ६१ पैकी जेमतेम पाच इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारती अजूनही उभ्या असून त्यापैकी काहींमध्ये रहिवाशांचे वास्तव्यही आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या पावसाळय़ातही इमारत दुर्घटनांचे भय कायम आहे.
सुमारे ४२ दिवसांची उन्हाळी सुटी संपवून सोमवारी पालिकेत परतलेले आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३१ मेपूर्वी शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच उरले असताना अशी कारवाई प्रभावीपणे होईल का, याबाबत शंका आहे. त्यातच येथे राहणारे रहिवासी पुनर्वसन झाल्याखेरीज घरे सोडण्याची शक्यता नाही. अशा वेळी पोलीस बळाचा वापर केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पण मग या सर्वाची कल्पना असताना गेले वर्षभर महापालिका प्रशासन झोपा काढत होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर दर सहा महिन्यांनी कळवा, मुंब्रा, ठाण्यातील किसननगर, लोकमान्यनगर भागातील इमारतींचे सर्वेक्षण केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली.
मात्र प्रत्यक्षात तसे झाल्याचे दिसत नाही. गेल्या वर्षभरात एखाद, दुसरा अपवादवगळला तर एकाही अतिधोकादायक किंवा धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यात आलेली नाही. असे असताना पावसाळ्याच्या तोंडावर इमारती पाडा, असे आदेश देऊन प्रशासन केवळ कारवाईचा देखावा करण्याची शक्यताच जास्त आहे.
*ठाणे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या : १०४६. ( प्रत्यक्षात हा आकडा अडीच हजाराच्या घरात आहे.)
*अतिधोकादायक इमारतींची संख्या : ५७. (मुंब्रा : १८१, तर कळव्यात : ७३ इमारती कारवाईच्या फेऱ्यात)
*वागळे इस्टेट परिसरात सर्वाधिक ४७१ इमारती धोकादायक
*२५ हजारांहून अधिक इमारती अनधिकृत
*मुंब्रा परिसरातील ९० टक्के इमारती बेकायदा
*लोकमान्यनगर भागातील ९५ टक्के बांधकामे बेकायदा
*कल्याण-डोंबिवली शहरात एकूण बेकायदा इमारतींचा आकडा : ७८ हजार १८४.  त्यापैकी ७५० इमारती धोकादायक. एकूण एक लाख १० हजार अनधिकृत बांधकामांची प्रकरणे वादात
*उल्हासनगर शहरात एकूण एक लाख ५० हजार मालमत्तांपैकी एक हजार २५ इमारती बेकायदा. त्यापैकी ३८१ इमारती धोकादायक. एकूण ८५० इमारती वाढीव चटईक्षेत्रानुसार कायदेशीर होण्याच्या प्रक्रियेत. परंतु दंड भरला नसल्याने अद्याप बेकायदा असा शिक्का.

आकडेवारी किती खरी?
शहरातील बेकायदा इमारतींचा टक्का साधारणपणे ६० टक्क्य़ांच्या घरात आहे. या इमारतींच्या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले होते. खरे तर ज्या इमारतीचे वयोमान ३० वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, तसे होत नसल्याने महापालिकेनेच असे परीक्षण करून घ्यावे, असा मुद्दा पुढे आला. परीक्षणासाठी गेलेल्या अभियंत्यांना इमारतीचा पाया किती खोल आहे हेच सापडत नसल्याने पुढे अशा परीक्षण मोहिमेचे तीनतेरा वाजले. कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये जमिनी बळकावून उभ्या राहिलेल्या ८० टक्क्य़ांहून अधिक इमारतींचे नकाशे उपलब्ध नाहीत. बांधकाम परवानगी घेतली नसल्याने वास्तुविशारदाचे आराखडे असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे पाया किती खोल खणला गेला आहे, जोत्याचे बांधकाम किती मजबूत आहे यासंबंधीचे परीक्षण करण्यासाठी ठोस अशी माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे वर जे दिसते आहे त्यावरून धोकादायक किंवा अतिधोकादायक अशी वर्गवारी केली जात आहे. लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात बानो नावाची इमारत कोसळून त्याखाली १५ पेक्षा अधिक रहिवाशांना प्राण गमवावे लागले. महापालिकेच्या लेखी ही इमारत धोकादायक ठरविण्यात आली नव्हती. त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल म्हणतात त्याप्रमाणे ५८ अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करून स्वतचे समाधान करून घेतल्यासारखे होईल, परंतु धोका पूर्णत टळला आहे असे म्हणता येणार नाही.