पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने बदलापूरजवळील कोंडेश्वर कुंडात पाण्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या सूचना देऊनही बेभान तरुणाईला रोखायचे कसे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बदलापूरजवळील कोंडेश्वरच्या कुंडात आनंद घेण्यासाठी कळव्यावरून आलेल्या रोशनी दिघे (२०) या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आपल्या मैत्रिणींसह कोंडेश्वरच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी रोशनी आली होती.

मात्र पाण्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने रोशनीचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पावसाळी पर्यटन म्हटले की बदलापूरजवळील कोंडेश्वरच्या कुंडात पाण्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक बदलापूरकडे वळतात. गेल्या काही वर्षांत येथे अनेक तरुण-तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पोलीस, प्रशासन वारंवार पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देत असतात. मात्र पर्यटक अशा सूचनांकडे कानाडोळा करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या बेभान तरुणाईला रोखायचे कसे, असा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिला आहे. मुख्य कुंडाजवळ काळजी घेण्याच्या आणि धोकादायक क्षेत्राची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहे. मात्र तरीही याकडे तरुणींनी दुर्लक्ष केले होते. दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे जाळी लावण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येते आहे. मात्र पर्यटकांनीही आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.