एकीकडे शहरात मोठे क्रीडांगण बांधण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली असली तरी बदलापूर पूर्व येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले बालोद्यान आणि वाचनालय मात्र धूळ खात पडून आहे. बालोद्यानाचा उकिरडा झाल्याने सध्या त्याला चक्क टाळे लावण्यात आले असून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

बदलापूर पूर्वेकडे तलाठी कार्यालयाजवळ काही वर्षांपूर्वी बालोद्यान निर्माण करण्यात आले होते. मुले उद्यानात खेळतील आणि त्यांच्या पालकांना वृत्तपत्र वाचता येतील, अशा संकल्पनेतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या बालोद्यानाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता. वाचनालयाचा उपयोगही चांगला होत होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे बालोद्यान म्हणजे अक्षरश: उकिरडा झालेला आहे. सध्या उद्यानाला टाळे ठोकले असून त्याचे प्रवेशद्वारही जीर्ण झाले आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकाने या बालोद्यानाची निर्मिती केली, त्यांच्याच पत्नी या प्रभागाच्या नगरसेविका असूनही त्याकडे त्यांचे लक्ष नाही.

या बालोद्यानाला लागूनच पालिकेने लाखो रुपये खर्च करून चौक सुशोभित केलेला असून हे उद्यान आणि वाचनालय मात्र दुर्लक्षित झालेले पाहायला मिळते. या उद्यान आणि वाचनालयाकडे लक्ष देऊन त्याची दुरवस्था दूर करावी आणि नागरिकांना विशेष करून लहान मुलांना मनसोक्त खेळता यावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बालोद्यान आणि वाचनालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. तरीही नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच लहान मुलांच्या सोयीसाठी आपण प्राधान्याने लक्ष देऊ , असे त्यांनी सांगितले.

– प्रवीण कदम, मनपा अधिकारी.