सुभाष तुपे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागासाठी सध्या तरी उल्हास नदी आणि एमआयडीसीच्या बारवी धरणाव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नाही. प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्यांमुळे बारवी विस्तारीकरण योजना रखडली आहे. अलीकडेच जिल्हा नियोजन बैठकीत या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळी जिल्ह्य़ातील सर्व स्थानिक प्राधिकरणांनी बारवी प्रकल्पग्रस्त सर्व कुटुंबांतील एकाला नोकरी देण्याचा निर्णयही घेतला. कारण विस्तारीकरणानंतर बारवी धरणाचा जलसाठा जवळपास दुपटीने वाढणार असून त्याचा लाभ ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागालाच होणार आहे. काळू आणि शाई प्रकल्प रखडल्याने ठाणे जिल्ह्य़ातील भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सध्या तरी बारवीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

’ बारवी धरणात सध्या किती जलसाठा होऊ शकतो, सध्या धरणात किती टक्के पाणी आहे ?
१९७२ मध्ये बांधण्यात आलेल्या बारवी धरणाची पाणी साठवण क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ती १२२.८५ दशलक्ष घन मीटर इतकी होती. पाण्याची निकड लक्षात घेता महामंडळाने धरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम १९८६ मध्ये पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता १७८.५८ दशलक्षघनमीटर झाली. पाण्याची वाढीव मागणी व भविष्यातील गरज लक्षात घेता महामंडळाने १९९८ मध्ये धरणाची उंची वाढविण्याचे तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. तिसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर धरणाची पाणी साठवण क्षमता ३४०.४८ दशलक्षघनमीटर इतकी होणार आहे.
सध्या बारवी धरणात ६२.८७ मीटर जलसाठा (१३८.६२ दशलक्ष घनमीटर) आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच धरण भरले होते. गेल्या वर्षी १८ सप्टेंबर रोजी धरणाची पातळी ६५.८६ मीटर असून १८३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. मुंबईमध्ये पाणीकपात लागू केली असली तरी ठाणे जिल्ह्यात पाणीकपात करावी लागणार नाही, असे मला वाटते. परतीच्या पावसात बारवीच्या जलसाठय़ात आणखी वाढ होईल. त्यामुळे येथे जादा पाणीकपात लागू करण्याची शक्यता नाही.
’बारवी धरणातून कोणत्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. दरदिवसाचे पाणीपुरवठय़ाचे प्रमाण काय आहे?
बारवी धरणातून उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली गावठाण, मीरा भाईंदर या प्रमुख शहरांना पाणीपुरवठा केला जातो. दरदिवसाला उल्हासनगरला १७० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. ३४ दशलक्ष लिटर्स पाणी डोंबिवली गावठाण परिसर, मीरा भाईंदरला ५० दशलक्ष लिटर्स, ठाणे- ११० दशलक्ष लिटर्स, नवी मुंबई- ८० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. साधारण प्रमाण सांगायचे झाले तर ८० टक्के घरगुती वापरासाठी तर २० टक्के पाणी औद्योगिक वसाहतींना पुरविले जाते.
’यंदा ४० टक्के पाणीकपात करावी लागेल, असे वाटते का ?
गेले काही दिवस पडत असलेला पाऊस पाहता बारवीच्या जलसाठय़ात निश्चितच वाढ होईल. सध्या १५ टक्के पाणीकपात लागू आहेच. पावसाळ्यात उल्हास नदीतून थेट पाणी उचलले जाते. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बारवी धरणाची पातळी खालावण्याचा प्रश्नच नसतो. सप्टेंबरच्या अखेरीस त्याबाबत आढावा घेतला जाईल.
’आत्तापासून जादा पाणीकपात सुरू केली तर पुढील जून-जुलैपर्यंत बारवी धरणातील पाणी शहरांची गरज भागवेल ?
पाणीकपात लागू केल्यास नक्कीच जून-जुलैपर्यंत बारवी धरणातील पाणीसाठा शहरांची गरज भागवू शकेल. उल्हास व बारवी नदीतून या धरणात पाणीसाठा केला जातो. तसेच बारवी धरण परिसरात पाऊस पडत नसला तरी भीमाशंकर, मुरबाड या पट्टय़ात पाऊस मुलबक होत असल्याने त्याचा फायदा या धरणातील पाणी साठय़ाला होतो. परतीचा पाऊस लांबल्याने पाऊस राहिला तर नदीतून पाणी आपणास मुबलक मिळेल. त्यामुळे १५ ऑक्टोंबपर्यंत धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार नाही.
’धारणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे का? त्यामुळे धरणात एकूण किती पाणीसाठा वाढणार आहे?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९९८ मध्ये धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले. धरणाच्या सांडव्याची उंची वाढविण्यात येणार होती. मात्र २००९ ते २०१२ या कालावधीत प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने हे काम स्थगित ठेवावे लागले होते. सांडव्याचे काम पूर्ण होत आले असून ११ स्वयंचलित दरवाजे धरणात बसविण्यात येणार आहे. या धरणाची उंची वाढल्याने ६८.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढू शकतो.
’मुरबाडमधील तीन-चार गावांमधील विस्थापितांचा प्रश्न मार्गी लागला का? त्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
बारवी धरण विस्तार योजनेअंतर्गत ६ गावे व ५ संलग्न पाडे बाधीत होत होती. त्यातील तोंडली १, तोंडली २, माहेघर १, माहेघर २ व संलग्न पाडे, काचकोली १, काचकोली २ व संलग्न पाडे, कोळेवडखळ, सुकाळवाडी, मानिवली १, मानिवली २ या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तोंडली व माणिवली वगळता इतर गावांचे ९० टक्के पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यामुळे प्रकल्पग्रस्त नवीन जागी स्थलांतरित होणे अशक्य होते. ६० कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर पावसाळा संपताच वरिष्ठ स्तरावर बैठक बोलावून मार्ग काढला जाईल व लवकरच धरणाचे काम पूर्णत्वास येईल असा विश्वास आहे.
’पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
पाण्याचा अपव्यय टाळा, नळाच्या तोटय़ा वेळच्या वेळी बदलाव्यात. टाक्यांची, पाण्याच्या पाइपलाइनची गळती थांबवा अशा स्वरूपाचे आवाहन यापूर्वीही महामंडळाच्या वतीने वारंवार नागरिकांना करण्यात येते. मात्र गरजेपुरतेच पाणी वापरा. एका दिवसात पाणी शिळे होत नाही. नागरिक दुसऱ्या दिवशी आलेले पाणी भरून ठेवण्यासाठी आदल्या दिवशीचे पाणी ओतून देतात. तसे करू नका. शिवाय कपडे धुण्याचे यंत्र व बाथरूममधील फ्लॅशला भरपूर पाणी वाया जाते. त्याचा शक्य तेवढाच वापर करा, असे आवाहन यानिमित्ताने करावे लागते.