भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ ठरवून या ग्रंथाला संकुचित करू नका. तो वैश्विक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीत लिहून क्रांती केली. गीतेचे अध्ययन स्त्रिया आणि क्षुद्रांना करता येत नव्हते. ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे ते शक्य झाले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी जोशी बेडेकर महाविद्यालयात व्यक्त केले. तत्त्वज्ञान संशोधन केंद्र व समुपदेशन केंद्र आणि मराठी संशोधन केंद्र (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. मराठी संशोधन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

येशू ख्रिस्त तामीळ ब्राह्मण होता की ख्रिश्चन होता या वादाने अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी समाजासाठी काय केले ते पाहणे महत्त्वाचे आहे. मुळात हे पुस्तक १९४६ मध्ये विविध पुराव्यांसह प्रसिद्ध झाले. त्यावर आता चर्चा करण्याचे काहीच कारण नाही. त्या त्या काळातील संतांना जातीधर्माच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भगवद्गीता व संतसाहित्याचे नाते’ या विषयावर बोलताना डॉ. सदानंद मोरे यांना विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात उत्तर देताना येशू ख्रिस्ताच्या बाबतीतच नव्हे, तर अनेक महापुरुषांच्या बाबतीत विविध दंतकथा प्रचलित असतात. त्यावर संशोधकांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनेक गोष्टी सापडतात. ज्यामुळे समाजातील लोकांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा गोष्टींना दूर सारायला हवे असे त्यांनी सांगितले.

सध्या समाजात संशोधकांची परंपरा लुप्त होत असल्याचे सांगत डॉ. प्रदीप कर्णिक यांनी तरुण संशोधक निर्माण करणे हे मराठी संशोधन मंडळाचे उद्दिष्ट असून नव्या संशोधकांना सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन इतिहास लिहावयाचे असल्यास त्यासाठी साहित्य निर्माण करण्याचे कार्य मराठी संशोधन मंडळ करीत आहे, असे सांगितले.